Skip to content
Home » Tips Information in Marathi » Jayant Narlikar Information in Marathi, Essay, Nibandh & Wikipedia l जयंत नारळीकर यांची माहिती

Jayant Narlikar Information in Marathi, Essay, Nibandh & Wikipedia l जयंत नारळीकर यांची माहिती

jayant narlikar mahiti

Jayant Narlikar Information in Marathi

जयंत नारळीकर यांची माहिती / निबंध

आपल्या भारत देशाने जगाला अनेक गणितज्ञ आणि खगोल वैज्ञानिक दिले आहेत. अशा थोर असामी पैकी एक आहेत डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याप्रमाणेच हे एक थोर शास्त्रज्ञ तर आहेतच पण उत्तम लेखकही आहेत. त्यांनी फक्त विज्ञान विषयावर गंभीर पुस्तकेच नाही लिहिली तर विज्ञानाची छटा असलेल्या कादंबऱ्या सुद्धा लिहिल्या आहेत.

डॉ नारळीकरांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर मध्ये झाला. त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर वाराणसीतील बनारस हिंदू विश्वविद्यालय येथे गणित विभागाचे प्रमुख होते आणि आई सुमती नारळीकर या संस्कृत विषयात पारंगत होत्या. त्यामुळे लहान पणापासूनच त्यांच्यावर गणित आणि संस्कृतचा प्रभाव राहिला आणि या विषयात त्यांनी सहज प्रभुत्व मिळवले. डॉ. नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसीतच झाले आणि १९५७ साली त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयातून विज्ञान विषयाची पदवी मिळवली. या परीक्षेत ते सर्वात प्रथम आले होते. त्यानंतर त्यांनी ब्रिटनच्या केंब्रीज विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. १९५९ साली त्यांनी गणित विषयात बी. ए. ची पदवी मिळवली आणि ते सिनीअर रँग्लर सुद्धा होते. १९६० साली त्यांनी खगोलशास्त्रात टायसन मेडल मिळवले. डॉक्टरेटचे शिक्षण घेत असतानाच त्यांना १९६२ मध्ये स्मिथ हे बक्षीसही मिळाले. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ सर फ्रेड हॉईल यांच्या मार्गदर्शनाखाली १९६३ मध्ये त्यांनी पी. एच. डी. पूर्ण केली. डॉ. नारळीकरांनी आपल्या अफाट बुद्धीमत्तेने फ्रेड हॉईल यांना प्रभावित केले होते. त्यांनतर ते बेरी रामसे यांचे सहकारी म्हणून किंग्ज कॉलेज येथे राहिले आणि येथेच त्यांनी १९६४ मध्ये खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र या विषयात एम. ए. केले. त्यांनी १९७२ पर्यंत रामसे यांचे सहकारी म्हणून काम केले. दरम्यान १९६६ साली त्यांचा मंगला सदाशिव राजवाडे यांच्याशी विवाह झाला. त्यांना गीता, गिरीजा आणि लीलावती नावाच्या तीन मुली आहेत.

१९६६ साली फ्रेड हॉईल यांनी ‘इन्स्टिटय़ूट ऑफ थिऑरॉटीकल ऍस्ट्रॉनॉमी’ नावाची संस्था सुरु केली ज्याच्या स्थापनेत डॉ. नारळीकरांनी महत्वाची भूमिका बजावली. १९६६ पासून १९७२ पर्यंत ते या संस्थेत कार्यान्वित होते. या दोन्ही शास्त्रज्ञांनी मिळून गुरुत्वाकर्षणावर एक सिद्धांत मांडला ज्याला ‘हॉईल – नारळीकर सिद्धांत’ असे म्हणतात. तो सिद्धांत सांगतो कि, वस्तूच्या कणांचे अंतर्गत वस्तुमान हे त्या वस्तूतील सर्व कणांच्या एकत्रित कार्याची परिणीती असते.

१९७२ साली नारळीकर मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर) येथे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. टीआयएफआरमध्ये ते सैद्धांतिक खगोलशास्त्रीय ग्रुपचे मुख्य अधिकारी होते. १९८८ मध्ये भारतीय विद्यापीठ अनुदान कमिशनने पुण्यात खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र साठी आंतर-विद्यापीठ केंद्राची (आययूसीएए) स्थापन केली आणि नारळीकर आययूसीएएचे संस्थापक – संचालक झाले. १९८१ मध्ये नारळीकर जागतिक सांस्कृतिक परिषदेचे संस्थापक सदस्य झाले. नारळीकर हे त्यांच्या विश्वनिर्मितीशास्त्र मधील कार्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी लोकप्रिय बिग बॅंग मॉडेलसाठी मांडलेले पर्यायी मॉडेल विशेष प्रसिद्ध आहे. ते काही काळ आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाच्या विश्वनिर्मितीशास्त्र आयोगाचे अध्यक्ष होते. एनसीईआरटी (शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद) द्वारे प्रकाशित होणारी विज्ञान आणि गणित या विषयाची पुस्तके विकसित करण्यासाठी जबाबदार सल्लागार गटाचे अध्यक्ष म्हणून नारळीकर यांची नियुक्ती झाली होती.

डॉ. जयंत नारळीकर एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेतच सोबतच ते एक प्रभावी लेखक सुद्धा आहेत. त्यांनी अनेक विज्ञानकथा लिहून मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. वामन परत आला, अंतराळातील भस्मासुर, कृष्णमेघ, प्रेषित, व्हायरस, यक्षाची देणगी, टाईम मशीनची किमया, याला जीवन ऐसे नाव असे अनेक कथासंग्रह त्यांनी प्रसिद्ध केले आहेत जे वाचकाला अगदी सुरवातीपासून शेवटच्या पानापर्यंत खिळवून ठेवतात. यक्षाची देणगी या त्यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळाला आहे. याशिवाय त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. आकाशाशी जडले नाते, विमानाची गरुडझेप, गणितातील गमतीजमती, विश्वाची रचना, विज्ञानाचे रचयिते, नभात हसरे तारे यासारखी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली ज्यामुळे साध्या सोप्या भाषेत सामान्य माणसाला विज्ञान आणि गणित सारखे विषय समजावता येतील. डॉ. नारळीकरांची ही पुस्तके म्हणजे कधीही न आटणारा ज्ञानाचा झरा आहे आणि कितीही वेळा वाचली तरी या पुस्तकांचा वीट येत नाही. पण त्यांचे साहित्यिक कार्य मराठी पुरतेच मर्यादित नाही तर ते इतर भारतीय भाषांमधील गणित आणि विज्ञान विषयांची पुस्तके आभ्यासाच्या दृष्टीने सुयोग्य बनविण्याचे कामही करत आहेत.

अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्यांचे काम पाहून त्यांचा विविध प्रकारे सन्मान केला आहे. १९६५ साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार देऊन आणि २००४ मध्ये पद्मविभूषण हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. या सोबत त्यांना डॉ. भटनागर स्मृती पारितोषिक, एम. पी. बिरला सन्मान तसेच फ्रेंच ऍस्ट्रॉलॉजिकल सोसायटीचे पिक्स ज्यूल्स जेन्सन यासारखे अनेक सन्मान त्यांना प्रदान करण्यात आले आहेत. डॉ. नारळीकर लंडनच्या रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सहाधिकारी आहेत तसेच इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी आणि थर्ड वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थांचे ते अधिछात्र आहेत. इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीद्वारे देण्यात येणारे इंदिरा गांधी पारितोषिक सुद्धा त्यांना देण्यात आले आहे. वैज्ञानिक विषयातील त्यांचे साहित्य पहाता, विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी त्यांना १९९६ साली युनेस्कोने कलिंग पारितोषिक दिले आहे.

असा हा थोर शास्त्रज्ञ इतक्या उपलब्धी नंतरही अंतरिक्ष विज्ञान क्षेत्रात अविरत कार्य करत आहेत. भारताच्या भावी पिढीला गणित आणि विज्ञान विषयांची ओढ लावण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत.

Information about Jayant Narlikar in Marathi Language Wikipedia, Scientist Information & Biography

3 thoughts on “Jayant Narlikar Information in Marathi, Essay, Nibandh & Wikipedia l जयंत नारळीकर यांची माहिती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *