Skip to content

Mobile Nasta Tar Essay in Marathi Language || भ्रमण ध्वनी नसता तर Nibandh

bhraman dhwani naste tar essay marathi

Mobile Nasta Tar

Bhraman Dhwani Naste Tar : भ्रमण ध्वनी नसता तर

नुकत्याच एका कार्यक्रमाल गेलो होतो. एका कुटुंबाचे स्नेहसंमेलन होते. घरात शे-दीडशे माणसे होती. पण कसलाही आवाज किंवा गडबड गोंधळ नव्हता. मला आश्चर्य वाटले. कार्यक्रम म्हणजे हास्य विनोदाचे फवारे, लहान मुलांचा आरडा ओरडा, मोठ्यांचे हास्याचा गडगडाट काहींच नाही. कारण एकच- प्रत्येकाच्या हातात मोबाईल होता आणि मान खाली घालून खाता खाता प्रत्येक जण त्यावर कांही न कांही करत होता. लहान मुले व्हिडीओ गेम खेळत होती,मोठी माणसे व्हाटस् अॅप वर चॅट करणे, फोरवर्ड करणे आणि आलेले मेसेजेस एकमेकांना दाखवणे असे उद्योग करीत होते. बायका युट्यूब वरील रेसिपी पाहत होत्या.बाहेर आलो तर एक बांधकामावरील मजूर आणि एक घरकाम करणारी बाई कानाजवळ फोन नेऊन मोठ्या मोठ्याने बोलत जात होते. एक बाईकस्वार बाईक चालवता चालवता कानाला फोन लावून मान आणि गालाच्या मध्ये फोन ठेऊन बोलत होता. एका कारमध्ये मालक कार चालवता चालवता इअर फोनवर बोलत होता. सगळेजण बोलत होते पण एक दुसऱ्याशी नाही तर फोनवरच्या तिसऱ्याशी! काय ही विकासाची प्रचंड उलथापालथ!

सॅम पित्रोदा ने दूरसंचार क्षेत्रात प्रधान मंत्र्यांना मदत म्हणून जे कार्य केले त्याचे दुष्परिणाम म्हणून आपल्या लोकांनी फोनचा बेतालपणे वापर सुरु केला. सुधारणा आणि विकास हि शाप की वरदान असा वादविवाद झाला असता तर ह्या संदर्भात सुधारणा ह्या शाप म्हणूनच सगळ्यांचे एकमत झाले असते.इतका लोकांना त्याचा त्रास होऊ लागला आहे. पण ‘तुझे माझे जमेना अन तुझ्यावाचून करमेना अशी परिस्थिती झाली आहे. एखादा दिवस असा उजाडला की जगातील सर्व भ्रमणध्वनी गायब झाले तर? किंवा सॅम पिद्रोडा ने टेलेकम्युनिकेशन ऐवजी दुसऱ्या क्षेत्रातच लक्ष घातले असते तर?

पूर्वी कम्युनिकेशन म्हणजे संपर्कासाठी काहीही सोय नव्हती. अगदी पूर्वी तार पाठवून तातडीचे संदेश दिले जायचे. किंवा पोस्ट खात्यात फोन यायचा आणि पीपी म्हणजे पर्सन टू पर्सन असा संदेश दिला जायचा .त्यासाठी पोस्टात एक रनर असायचा आणि फोन आला की तो पळत जाऊन त्या व्यक्तीला, जिला फोन आला आहे तिला घेऊन यायचा आणि असे प्रत्यक्ष बोलणे व्हायचे. पण हे अगदी निकड पडली तरच. एरवी पांच पैशाचे पोस्टकार्ड! नंतर दूरसंचार निगम आले आणि प्रत्येक घरी केबलच्या सहायाने फोन आले. त्यांना लॅंडलाईन म्हणत. पण हा फोन पण मिळण्यास वर्ष वर्ष प्रतीक्षा यादीत रहावे लागत असे. त्यावेळी फक्त पोलिसांकडे वॉकी टॉकी असा हातात घेऊन बोलण्याचा फोन असे. त्यामुळे गुन्ह्याचा शोध घेणे सोपे जायचे. म्हणजे गुन्हेगार पळून जात असेल तर फोनवरून पुढच्या पोस्ट ला सूचना दिल्या जायच्या.

हळूहळू मोबाईलचा उदय झाला पण फक्त अतिश्रीमंत लोकांकडेच प्रतिष्ठेचे लक्षण म्हणून. तेंव्हा हातात महागाचा फोन घेऊन आपल्याकडे लोक कसे असूयेने आणि डोळे विस्फारून बघत आहेत हे बघत बघत श्रीमंत लोक किंवा हौशी लोक बोलायचे.तो मोबाईल कृष्णधवल असे आणि त्यात फक्त फोन करणे,आणि संदेश देणे एव्हड्याच बाबी होत्या.

ह्याचावर पण सुधारणा होऊन स्मार्ट फोन आले आणि भारतातील लोकांचे विश्वच बदलून गेले. सगळ्या जागतिक कंपन्यांनी भारतीय लोक पटकन गळाला लागतात हे हेरून मोठ्या प्रसिद्ध लोकांच्या जाहिरातीद्वारे लोकांच्या गळ्यात महागडे फोन टाकले. एकाचे बघून दुसरा असे सर्व त्यांचे गुलाम झाले. स्मार्ट फोनवरील अप्लिकेशन सर्वांना आवडू लागले. चाटिंग करणे,व्हिडिओ काढणे आणि व्हाटस् अॅप वर सगळ्यांकडे फिरविणे हा सरसकट लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांचा आवडता छंद झाला आणि हेच खरे काळजीचे कारण बनले.

भ्रमणध्वनी घेऊन कुठेही जाऊन आपल्याला आपल्या लोकांशी संपर्क करता येतो हे खरे अत्यंत सोयीचे आहे. कारण रात्री बेरात्री घराच्याना काळजी वाटू नये म्हणून संपर्क राहतो. संकटात, अपघातात किंवा कुणी आजारी झाल्यास फोन सारखे दुसरे कुठलेही साधन उपयोगाचे नाही. जर फोन नसता तर रस्त्यावर अपघातात कुणी सापडले तर तडफडून तेथेच जीव जायचा पण घरच्यांना उशिरा कळायचे.सैनिकांच्या घराच्या लोकांना कधी तरी का होईना पण आपल्या जवानाशी बोलता येऊ लागले. मुली घराबाहेर निर्धास्तपणे हिंडू लागल्या. कारण केंव्हाही घरचे फोन करून त्यांची ख्याली खुशाली विचारू शकत, तसेच कोणी गुंड त्रास द्यायला लागला तर पोलीस हेल्प लाईन वर मदत मागता येऊ लागली.तसेच बरेचसे गुन्हेगार पण मोबाईलच्या कॉल रीडिंगवरून पकडता येऊ लागले.

खेड्यापाड्यात नवीन विचारांचे वारे वाहू लागले. स्वस्त फोन येऊ लागल्याने सर्वांना फोन घेणे परवडू लागले. भ्रमणध्वनी नसता तर दूरदूर च्या खेड्यांपर्यंत टेलिफोनने तारा केंव्हा टाकल्या असत्या आणि फोन कधी सुरु केले असते ह्याची शाश्वतीच नव्हती. त्यामुळे भारतातील ग्रामीण जनता वीस पंचवीस वर्षांनी प्रगत झाली.कांही हुशार मुलांनी जगात काय चालले आहे हे नेटवर्कने जाणून घेऊन आपली प्रगती केली. तसेच आपले शोध पण जगात धावून पेटंट मिळविले. पण हे नेटवर्कमुळे शक्य झाले.जर भ्रमणध्वनी नसता तर हे शक्य झाले नसते. कारण सगळ्यांना कॉम्प्युटर आणणे परवडत नाही. भ्रमणध्वनी नसता तर असंख्य माहितीच्या खजिन्याला आपण मुकलो असतो. आपण पूर्णपणे पोस्टावर अवलंबून राहिलो असतो आणि आपली पत्रे उशिराने मिळाली असती तर आपण खूप कांही गमावले असते.

हि सगळी चांगली कारणे झाली ज्यामुळे भ्रमणध्वनी नसता तर आपले किती नुकसान झाले असते ह्याची. आता ह्याच नाण्याची दुसरी बाजू पाहू. कुठले ही साधन जसे उपयोगी असते तसेच हानिकारक पण असू शकते. जसे चाकूने भाजी कापतो पण गुंड त्याच चाकूने खुन पण करतो.अणुचा शोध मानव जातीच्या विकासासाठी लावला पण आता ते मानव संहाराचे एक प्रमुख शस्त्र झाले आहे. तसेच भ्रमणध्वनीचा वापर कांही लोक अनैतिक कामांसाठी आणि दुरुपयोग करण्यासाठी करतात. प्रवासात एक अत्यंत उपयोगी म्हणून लोक भ्रमणध्वनी नेतात आणि सहलीच्या ठिकाणी अति उत्साहाच्या भरांत सेल्फी काढतात. हे वेड इतके जास्त झाले आहे की धोकादायक ठिकाणी, इमारतींवर, डोंगराच्या कडांवर, समुद्राच्या पाण्यात कुठेही सेल्फी काढायला जातात आणि हकनाक प्राण गमावून बसतात.त्यांना ह्याची पण तमा नसते की आपले कोणीतरी काळजी करणारे घरी आहेत. किती दु:खाचा डोंगर कोसळतो त्या आईबापांवर! तसेच कांही समाजविघातक लोक मोबाईलमध्ये काही चित्रण करून चांगल्या मुलींना त्रास देतात त्यांची बदनामी करतात .किंवा बदनामीच्या भीतीने त्यांना वाईट कर्म करण्यास प्रवृत्त करतात. हे पण संहारक उपयोग आहेत.

तसेच आणखी एक म्हणजे तुम्ही कोणाला निकडीने फोन करीत असाल आणि त्याला तुमच्याशी संभाषण नसेल करायचे तर तो नाना प्रकारे त्याचा फोन बंद करून ठेऊन तुम्हाला टाळतो. अशा तऱ्हेने कुठल्या ही शोधासारखे भ्रमणध्वनीचे पण चांगले आणि वाईट परिणाम आहेतच. फक्त ते कसे वापरायचे हे ठरविणे आपल्यावर आहे.

Click Here for the Full List of Essays on Marathi.TV

Mobile Nasta Tar in Marathi Language Essays

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *