Skip to content
Home » Essay in Marathi Language » My Hobby Essay in Marathi | Maza Avadata Chand, My Favourite Hobby

My Hobby Essay in Marathi | Maza Avadata Chand, My Favourite Hobby

hobbies avadta chand

My Hobby Essay in Marathi

माझा आवडता छंद :

रोजच्या धकाधकीच्या जीवनातून माणसाला काही करमणूक हवी असे वाटते. प्रत्येकाचे करमणुकीचे विचार वेगळे असतात. तरी पण बऱ्याच डॉक्टर आणि मानसशास्त्रज्ञ यांच्या मते जीवनातले ताण तणाव आणि त्या अनुषंगाने येणारे मधुमेह, हाय ब्लड प्रेशर, हायपरथायरॉइडिज्म आणि हृदय विकार अशा रोगांना सामोरे जाण्या पेक्षा एखाद्या छंदात मन रमवले तर खूप फायदा होतो. कोणाला वाचनाचा, कोणाला गायनाचा, कोणाला काही वस्तू किंवा स्टॅम्प वगैरे गोळा करण्याचा, कोणाला फोटोग्राफीचा असे छंद असतात. मला मात्र छंद आहे तो म्हणजे भटकंतीचा! मला भटकंती, भ्रमंती अतिशय आवडते.

स्फूर्ती

लहानपणी पु.ल.देशपांडे यांचे ‘अपूर्वाई’ आणि ‘पूर्वरंग’ वाचल्यानंतर त्या देशांबद्दल त्यांनी इतके सुंदर वर्णन केले की प्रवासाने एवढा आनंद होतो हे तेव्हाच समजले. त्यानंतर गो.नी.दांडेकर यांचे ‘कुण्या एकाची भ्रमण गाथा’ हातात पडली. त्यातून आपला देश सुद्धा किती वैविध्यपूर्णतेने नटलेला आहे हे कळले. म्हणून मी प्रथम पायी भटकंतीचा निर्णय घेतला. त्यालाही मिलिंद गुणाजीच्या ‘भटकंती’ या लेखमालेची प्रेरणा होती.

माझ्या सारख्याच मुला मुलींचा ग्रुप मिळून आम्ही ट्रेकिंग, म्हणजे किल्ले, गड यांची पायी भटकंती सुरु केली. आणि मला निसर्गाचा अनमोल खजिना सापडला. आम्ही सुट्टीच्या दिवशी जवळ पासचे छोटे-छोटे डोंगर, गड, किल्ले, येथे सहलीला जायला सुरुवात केली. एक हॅव्हरसॅक, पाण्याची बाटली आणि हंटर शूज एवढ्या छोट्याशा भांडवलावर आम्ही आमचा हा छंद जोपासू लागलो. तेव्हापासून आमची तब्येत ठणठणीत व्हायला लागली आणि आठवडाभरच शीण एका दिवसात जाऊन आम्ही पुन्हा नव्या उत्साहाने कामाला लागायला लागलो.

भटकंतीच का?

दुसरा कुठलाही छंद तुम्हाला फक्त मानसिक विरंगुळा देतो. तोही फक्त तुमच्या एकट्या पुरता असतो. मला भटकंतीत कितीतरी जिवाभावाचे मित्र मैत्रिणी मिळाले आणि निसर्गाचे मैत्र आणि अद्भुत खजिना मला बघायला मिळाला. माझे निसर्गावरचे प्रेम कितीतरी पटीने वाढले. खरच किती किमयागार आहे हा निसर्ग, तुमच्या चित्त वृत्तींना प्रसन्न करणारा! मला निसर्गाची सगळी रूपे मनात साठवून ठेवावीशी वाटतात. कुठल्याही संगीतापेक्षा समुद्राची गाज, रोरावणाऱ्या महापूराच्या पाण्याचा घन गंभीर नाद, खळाळून जमिनीवर पडणार्या धबधब्याचा रौद्र नाद, जसे रूद्राचे तांडव नृत्य चालू आहे, केदारेश्वरातील भीम कुंडातून उसळणाऱ्या पाण्याचा फेसाळ लोट, गोमुखामध्ये उगम पावणाऱ्या गंगेचे प्रचंड वेगाचे मंत्रमुग्ध करणारे रूप अशी पाण्याची रूपे आणि व्हॅली ऑफ फ्लॉवरमधील असंख्य फुलांची रंगांची उधळण माझ्या मनातील अनमोल थवा आहेत.

जीवघेण्या कडक उन्हामध्ये रक्तवर्णी लाल, गुलाबी, पिवळे आणि पांढरे फुलांचे मोहक दर्शन देणाऱ्या बोगनवेली, पळस, बहावा, गुलमोहर इत्यादी झाडे डोळ्यांना थंडावा देतात. हिवाळ्यातील पानगळ झाडल्यानंतर येणारी तांबूस पानांची आंब्याची पालवी आणि मोहर नवजीवनाची स्फूर्ती देते. श्रावणात पारिजातक, जाई, जुई, मोगरा ही सुवासिक फुले रस्त्यावर मनमोहक गालीचा पसरवितात. हे सगळे बाघितले की आपण आपले राग, लोभ, मद, मत्सर या सहा रिपुंना आठवत सुद्धा नाही. फक्त निसर्ग आणि आपण असे अद्वैत निर्माण होते. त्यामुळे मन उल्हसित होते.

या भटकंतीने मला कितीतरी वेगवेगळे अनुभव दिले. दिल्लीच्या प्रवासात मला बसल्या-बसल्या झोप लागत असतांना मांडीवर माझे डोके घेऊन थोपटणारी पंजाबी बाई म्हणजे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि कच्छ पासून पश्चिम बंगाल पर्यंत आई या एकाच नात्याचे प्रतिक वाटली. हेमकुंड साहिब गुरुद्वारा जवळ इंदिरा तालने (तलाव) अतिशय उंचावर असलेल्या धुक्यानी वेढलेल्या पर्वतावर ध्यानस्थ बसलेल्या ऋषीमुनींची आठवण करून दिली. मला रेल्वे स्टेशन, बस स्टेशन आणि लोकल स्टेशन इथे पण बसून लोकांचे निरीक्षण करायला आवडते. प्रवासात तुम्हाला हा एक मजेदार अनुभव येतो. मी दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन स्टेशनवर गाडीची वाट बघताना तेथील माकडांचा खेळ पाच तास बघत आपले मनोरंजन करून घेतले. मुंबईच्या दादर लोकल स्टेशन वर बसल्यावर एक-एक लोकल येऊन गेल्या नंतर पोत्यातून धान्य पडावे तसे माणसांचे लोंढे, भाजी विक्रेत्यांचा आरडा ओरडा, गिर्हाईक हेरण्याची बेरकी नजर, घराकडे लगबगीने धावणारे लोक हे सगळे बघताना आपण पण मनाने धावायला लागतो.

मला कुठल्याही वाहनाने प्रवास करायला आवडतो. रेल्वेचा एक-दोन दिवसांचा प्रवास असला की तो एक बर्थ आपले जीवन बनून जाते. आणि जीवनात येणाऱ्या प्रत्येक नात्याप्रमाणे एकेका स्टेशन वर तऱ्हे-तऱ्हे चे लोक भेटतात, गोष्टी करतात आणि त्यांचे स्टेशन आल्यावर उतरून जातात. जीवनातही असेच असते ना? मित्र-मैत्रिणी, नाती-गोती तेव्हड्या वेळा पुरते आपले जीवन व्यापतात आणि तेवढा सहवास संपला की नियतीच्या आदेशाने आपल्यापासून दूर जातात. रेल्वे गाडीचा रात्रीच्या वेळी निर्जन ओसाड प्रदेशातून जातानाचा गूढ आवाज त्यात कर्णकर्कश्य भोंगा मन आणखी गूढ बनवतो.

बसमध्ये मला घाटाचा प्रवास खूप आवडतो. खिडकीतून दिसणारे दरी आणि डोंगराचे नयन रम्य रूप मनाला भावते. रोंरावत जाणारे ट्रक्स त्यांचे भोंगे, ह्याने मन गुंगून जाते. आपण जर उंचावर असलो तर खाली रस्त्याची नागमोडी रेषा डोळ्यांना सुख देते. आणि जर पावसाला असला तर बघायलाच नको! कडेकपारीतून उड्या मारत उसळत येणारे झरे एक वेगळाच नाद निर्माण करतात. विमान प्रवासामध्ये खालील दिसणारी छोटी-छोटी घरे आणि बागा हे दृश्य खूप मनोहरी दिसते.

भटकंती करताना मी फोटो कधीही काढत नाही. ह्या निसर्ग सौंदर्याचे निर्जीव कागदात रूपांतर करण्यापेक्षा मी ते अमूल्य क्षण मनात साठवते. माझ्या आयुष्यातील आनंदाचा हा फार मोठा अमोल ठेवा आहे.

Click Here for the Full List of Essays on Marathi.TV

Majha Avadata Chand / Hobbies and Interests

My Favourite Hobby Essay in Marathi Language Nibandh

1 thought on “My Hobby Essay in Marathi | Maza Avadata Chand, My Favourite Hobby”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *