Skip to content
Home » Tips Information in Marathi » Mother Teresa Information in Marathi ll मदर तेरेसा माहिती

Mother Teresa Information in Marathi ll मदर तेरेसा माहिती

Social Worker Mother Teresa in Marathi

Mother Teresa Information in Marathi

मदर तेरेसा मराठी माहिती

  • कलकत्त्याच्या रस्त्यावर पडलेल्या महारोगी, गरीब, दिन दुबळ्या भिकार्‍यांना मायेने पांघरून घालणारी, त्यांची शुश्रुषा करणारी, पांढर्‍या साडीतील ती गोरी स्त्री कोण होती? आपण भिकार्‍यांकडे तुच्छतेने पाहतो, महारोग्यांपासून तर आपण चार हात दूरच जातो. त्या विरुद्ध परदेशातून चांगली घराची उब सोडून दिन दुबळ्यांच्या सेवेसाठी भारतात तेही कलकत्त्याच्या बकाल वस्तीत जाऊन सेवा करण्याचे शिवधनुष्य पेलले अशा ह्या मदर तेरेसा.
  • मदर तेरेसा मिशनरी म्हणून भारतात आल्या पण भारताच्याच होऊन राहिल्या. प्रत्यक्ष व्हॅटीकन सिटी मध्ये पोप फ्रान्सिस द्वारे संत म्हणून गौरवलेल्या जाऊन त्यांनी भारताची शान वाढविली. एका मिशनरी नन ते जगाची मदर हा प्रवास अत्यंत निष्ठेने आणि समर्पित भावनेने करून त्यांनी “जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा“ ही उक्ती सार्थ केली.
  • अल्बेनियासारख्या दूर देशातून येऊन का त्यांनी भारतातील गरीबातील गरीब, आसन्नमरण कुष्ठरोगी अशा वंचित आणि जगणे पाठ फिरविलेल्या लोकांची सेवा केली हा एक चमत्कारच होय. पण त्यात त्यांची संस्कार मिशनरी स्कूलची शिकवण आणि त्यांनी ऐकलेली मनोदेवतेची हाक हे ही कारण असेल.

जन्म आणि बालपण :

  • मदर तेरेसा ह्यांचे मूळ नाव अन्झेझे गोन्क्ष्हे बोजझीयू. त्यांचा जन्म अल्बेनियातील स्कोपजे मेसेडोनिया येथे 2६ ऑगस्ट १९१० रोजी झाला. निकोल आणि द्रानाफील बोझाद्झीयू ह्यांचे ती सर्वात लहान अपत्य. ती आठ वर्षाची असताना तिचे वडील वारले. ११ वर्षाची असताना पासून तिला मिशनरी आयुष्य आणि त्यांचे बंगालमधील कार्य ह्यांचे आकर्षण होते.
  • १५ ऑगस्ट १९२६ रोजी एका यात्रेला गेली असताना तिला प्रार्थना करतांना, तिने धार्मिक कार्यातच आयुष्य वेचावे असा साक्षात्कार झाला. अठराव्या वर्षी ऐन उमेदीत आणि तारुण्यात तिने घर सोडले आणि “सिस्टर ऑफ लोरेटो” आयर्लंड येथे मिशनरी होण्यासाठी आणि इंग्लीश शिकण्यासाठी गेली.

भारतात प्रवेश :

  • १९२९ साली ती भारतात दार्जिलिंग येथे कोन्व्हेंट शिक्षिका म्हणून रूजू झाली. येथेच २४ मे १९३१ ला तिने पहिली धार्मिक शपथ घेतली आणि थेरेसा डी लीसियुक्स ह्या मिशनऱ्यांच्या पालक संताचे नाव घेऊन अन्झेझेची “तेरेसा” झाली.
  • १९३७ साली त्यांनी लोरेटो कोन्व्हेंट मध्ये शिकवत असताना सोलेम शपथ घेतली. तेथे २० वर्षे शिकवीत असताना त्यांना हेड मिस्ट्रेसची पदोन्नती पण मिळाली. पण त्यांचे मन शिकवण्यात लागण्यापेक्षा आजूबाजूच्या दु:ख दारिद्र्य आणि रस्त्यावर होणारे मरण बघून गौतम बुद्धासारखी दुःखितांबद्दल कणव आणि अनुकंपा निर्माण झाली. त्यांनी त्या लोकांची सेवा करण्याचे व्रत घेतले आणि तसा त्यांना कोन्व्हेंट कडून आदेश मिळाला आणि त्या सिस्टर तेरेसा वरून मदर तेरेसा झाल्या.
  • तेरेसांनी निळ्या बोर्डरची स्वच्छ पांढरी साडी कलकत्ता साडीसारखी नेसायला सुरवात केली. त्यांनी भारतीय नागरिकत्व घेतले आणि थोडे वैद्यकीय ज्ञान संपादन करून त्या सेवेत रूजू झाल्या.
  • गुरु रवींद्रनाथ टागोरांनी लिहिल्याप्रमाणे “मै अकेला जा रहा था जानिबे मंजीलपर, लोग साथ आते गये कारवॉ बनता गया” तसे हळूहळू लोकांचे ह्या उदात्त सेवेकडे लक्ष गेले आणि स्वयंसेवकांची संख्या वाढायला लागली.
  • मदर तेरेसा ह्यांचे विशेष असे होते की त्या महारोग्यांची – ज्यांना सर्व जग तिरस्काराने पाहते, ज्यांना घरातून हाकलून रस्त्यावर सोडून दिले जाते झिजून झिजून मारण्यासाठी आणि यातना सहन करण्यासाठी, त्या महारोग्यांची त्या अत्यंत आपुलकीने सेवा करीत त्यांना औषध पाणी करीत, त्यांच्या जखमा पुसून कोरड्या करून मलम लावीत आणि दुर्दैवाने ते आसन्नमरण झाले तर त्यांचे मरण स्वच्छ आणि पवित्र वातावरणात देवाची प्रार्थना करीत शांततेने व्हावे आणि त्यांचा आत्मा देवाचरणी जावा अशी त्या योजना करीत. प्रत्येक धर्माच्या रोग्यांना त्यांच्या धर्माप्रमाणे अंतिम संस्कार केले जात. ह्यापेक्षा मानवतेची सेवा आणखी काय असू शकेल? हे करतांना सुरवातीला त्यांना भिक्षा मागावी लागली. शंका, अवहेलना आणि टीका ह्यांना तोंड द्यावे लागले. खूप वेळा सगळं सोडावे असे विचार आले पण त्यांच्या दृष्टीने ही त्यांच्या कर्तव्याशी प्रतारणा होती म्हणून त्यांनी नेटाने काम पुढे चालू ठेवले. प्रत्येक महानगरांमध्ये बकाल वस्ती आणि महारोगी, एड्सचे रोगी, गरीब आणि लुळे पांगळे भिकारी असतातच. तसे ते कलकत्त्याला पण होते आणि मदरने त्यांची भरभरून सेवा केली.

कामाचा विस्तार :

  • १९६० चा दशकात मदर तेरेसांनी महारोग्यांसाठी “शांतीनगर” हा आश्रम काढला. नंतर आसन्नमरण रोग्यांच्या सुखमय मरणासाठी “निर्मल हृदय” हा आश्रम काढला, अनाथ मुलांसाठी निर्मल शिशु भवन उघडले.
  • “मिशनरी ऑफ चॅरीटी ब्रदर्स” हा आश्रम काढला आणि त्याच्या खूप शाखा झाल्या. देश विदेशात त्याच्या शाखा पसरल्या. त्यात ४५० ब्रदर्स, ५००० सिस्टर्स आणि ६००० मिशन स्कूल्स, आणि धर्मशाळा १२० देशात विस्तारल्या. त्या म्हणत मी जरी जन्माने अल्बेनियन आणि नागरिकत्वाने इंडियन असले तरी मी जगाची आहे आणि माझे हृदय ख्रिस्तचरणी लीन आहे. त्यांना बंगाली, इंग्लीश, सर्बियन, आलेबेनियन आणि हिंदी भाषा येत होत्या आणि त्यात त्या प्रचुरतेने बोलत.
  • पाहता पाहता त्यांच्या कार्याचा पसारा १०० देशांमध्ये पसरला आणि “गरीबातील गरीब लोकांना मदत” हे ब्रीद वाक्य घेऊन ४५० केन्द्रातून सेवा होऊ लागली.

अभिमान आणि सन्मान :

  • अर्थात जगाने त्यांची दखल घेतलीच. भारताने त्यांना सर्वप्रथम पद्मश्री आणि नंतर भारतरत्न ह्या पदव्यांनी सन्मानित केले. त्यांना ‘जवाहरलाल नेहरू अवार्ड फॉर इंटरनॅशनल अन्डरस्टॅन्डींग’ हा सन्मान दिला, 5 रूपयांचे सन्मान नाणे काढले, त्यांना रामन् मॅगसेसे अवार्ड शांतता आणि आंतरराष्ट्रीय सलोख्यासाठी मिळाले.
  • पोप जॉन २३ ह्यांनी त्यांना शांतता पारितोषक दिले. तसेच शांतता आणि गरीब टाकलेल्या लोकांच्या सेवेसाठी त्यांना १९७९ मध्ये नोबेल पारितोषक मिळाले. ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, अमेरिका, बल्गेरिया, युगोस्लाविया ह्या देशांचे सन्माननीय नागरिकत्व मिळाले.
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्हॅटीकन सिटीतर्फे त्यांना सर्वोच्च संतपणाचा सन्मान मरणोत्तर मिळाला. एव्हडे मान सन्मान मिळूनही त्यांचे साधेपण तसेच राहिले. त्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरचे निरागस हास्य असंख्य रोग्यांना जीवदान देणारे ठरले. ते हास्य फक्त महात्मा गांधीच्याच चेहर्‍यावरील हास्याची बरोबरी करू शकते. कुणालाही पत्र लिहिताना शेवटी त्या “God Bless You” लिहित.
  • अशा ह्या अलौकिक संत मदर तेरेसा यांचे ५ सप्टेंबर १९९७ ला कलकत्त्यात निधन झाले. त्यांना स्टेट फ्युनरल दिले गेले. त्यांच्या सेवेचे त्यांच्या नंतरही अनुपालन चालू आहे.

Information About Mother Teresa in Marathi Language / Essay Quotes Wiki

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *