Skip to content

Coconut Tree Information in Marathi | नारळाच्या झाडाची माहिती

coconut tree essay information marathi

Coconut Tree Information in Marathi

Naral / नारळ माहिती

  • भारतात पुरातन काळापासून नैसर्गिक उपचार आणि झाडांचे उपयोग याबद्दल बहुमोल शास्त्राची परंपरा आहे. आपले वेद आणि पुराण यामध्ये झाडे आणि त्यांचे उपयोग यावर खूप संशोधन केलेले आहे. त्या दृष्टीने झाडांना देव कार्यात महत्व देऊन सामान्य जनतेला तिचा फायदा करवून दिला आहे.
  • नारळ हे विषुववृत्तीय आणि उष्ण कटिबंधातील मुख्यत: समुद्र किनारी आणि लगतच्या भागात वाढणारा वृक्ष आहे. हा वनस्पती शास्त्राप्रमाणे अंजियोस्पर्म वर्गात मोडणारे आणि अरेकसी कुळातील कोकोस जातीतील वृक्ष आहे. वनस्पती शास्त्राप्रमाणे याचे नाव आहे कोकोस नुसिफेरा (cocos nucifera).
  • भारतातून वास्को द गामाने पहिल्यांदा हे फळ युरोपाला नेले. नारळ हे इतर फळांपेक्षा त्यातील पाण्यामुळे वेगळे फळ आहे. कोवळ्या नारळात, म्हणजेच शहाळ्यात भरपूर पाणी असते. नंतर त्याचे पाणी कमी होऊन मलईचे खोबऱ्यात रूपांतर होते.
  • नारळाला उष्ण हवामान साधारण २८ ते ३७ डिग्री सेल्सियस आणि थंडीत १२ डिग्री सेल्सियस लागते. भरपूर सूर्यप्रकाश आणि खूप पाऊस अंदाजे वर्षाला १५०० ते २५०० मिलीमीटर लागतो. त्याच प्रमाणे आर्द्रतेचे प्रमाण ७० ते ८० टक्क्यांपर्यंत लागते. म्हणूनच की काय नारळाची समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात लागवड होते.

नारळाचे प्रकार :

  • नारळाची झाडे दोन प्रकारची असतात. एक अतिशय उंच जी कोंकण किनाऱ्यावर दिसतात आणि दुसरे बुटके जे मलबारी किंवा मलेशियन जातीचे असतात आणि ५ ते ६ वर्षांत फळे देतात. नारळाची पाने ४ ते ६ मीटर लांब असतात आणि अणकुचीदार असतात.
  • नारळाच्या फळाचे ३ विभाग असतात – शेंड्या, कवटी आणि खोबरे (exocarp, mesocarp, endocarp). नारळाची मुळे तंतुमय आणि वाढणारी असतात. झाडाला फुलांचा गुच्छ येतो. त्यात स्त्री पुष्प आणि पुरुष पुष्प एकाच गुच्छात असतात. त्यामुळे परागीभवन त्यातच होते.
  • भारतात नारळ सर्वात जास्त केरळ राज्यात पिकतो. पण तामिळनाडुचे नारळ गुणांनी त्याच्यापेक्षा चांगले असतात. केरळ व तामिळनाडुच्या व्यतिरिक्त आंध्रप्रदेश, कर्नाटक,पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि गोवा या ठिकाणी सुद्धा नारळ पिकतात. तीन बाजूने समुद्राने वेढलेला असल्यामुळे भारत नारळ उत्पादनात जगात तिसरा आहे.

Uses of Coconut Tree in Marathi / नारळाचे उपयोग :

  • सर्वांगाने मानवाला उपयोगी पडणाऱ्या ह्या अद्भुत झाडाला पुराणात संस्कृत मध्ये ‘कल्पवृक्ष’ म्हणजेच इच्छिलेली फळ देणारा वृक्ष असे म्हटले आहे. मलेशिया मध्ये सुद्धा या झाडाला ‘पोकॉक सेरीबु गुना’ म्हणजेच हजारो उपयोगाचे झाड आणि फिलीपाइन मध्ये या झाडाला ‘ट्री ऑफ लाइफ’ म्हणजेच जीवनाचे झाड असे म्हणतात. नारळामध्ये अतिशय मौल्यवान पौष्टिक द्रव्ये असतात.

१०० ग्राम खोबरे घेतले तर त्यात असतात :

  • उष्मांक ३५४ किलो कॅलरी;
  • कार्बोहायद्रेट १५.२३ ग्राम;
  • साखर ६.२३ ग्राम;
  • फायबर ९.०० ग्राम;
  • फॅट (चरबी) ३३.४९ ग्राम;
  • सॅच्युरेटेड फॅट २९.६९८ ग्राम;
  • मोनो सॅच्युरेटेड फॅट १.४२५ ग्राम;
  • पॉली अन सॅच्युरेटेड फॅट ०.६० ग्राम.

खाण्यामध्ये नारळाचे उपयोग :

  • नारळात प्रोटीन, विटामीन सी, विटामीन ई आणि विटमीन के, मिनरल्स, कॅल्शियम, कॉपर, मॅग्नेशियम, मँगॅनीज, फॉस्फोरस, पोटॅशियम, सोडीयम, सेलेनियम आणि झिंक भरपूर प्रमाणात असतात.
  • फळाच्या विविध अवस्थांचे विविध उपयोग आहेत. शहाळ्याचे पाणी औषधी असते. आजाऱ्याला किंवा ज्यांची पचन शक्ती अशक्त आहे, त्यांना हे पाणी म्हणजे अमृत आहे.
  • खोबरे स्वयंपाकात निरनिराळ्या तऱ्हेने उपयोगात येते. दक्षिण भारतात इडली, डोसे यांच्या बरोबर चटणी सारखे किंवा सांबार मध्ये एक घटक म्हणून वापरतात. ओल्या खोबऱ्याची मिठाई किंवा लाडू बनवतात. तसेच नारळी पाक आणि नारळी भात यासाठी पण ओले खोबरे वापरतात. ओले खोबरे आणि गूळ यांचे मिश्रण घेऊन त्याचे तांदूळाच्या किंवा गव्हाच्या पीठात मिसळून मोदक करतात आणि हळदीच्या पानावर तांदूळाच्या पीठात उकडून पान पोळी बनवतात.
  • खोबऱ्याचे तेल बऱ्याच ठिकाणी तळण्यासाठी वापरतात. त्याच प्रमाणे संपूर्ण भारतात डोक्याला लावायच्या तेलात खोबरेल तेलाचा नंबर पहिला आहे. मासे खाणाऱ्या लोकांच्या स्वयंपाकात खोबरे हा एक महत्त्वाचा घटक आहे. माशाच्या आमटीला खोबऱ्याचे वाटण वापरतात
    तसेच कोकम रसाबरोबर ओल्या नारळाचे दूध घालून सोल कढी केली जाते. ती पौष्टिक आणि पित्त शामक असते.
  • नारळाच्या खोडा मध्ये खाच पाडल्यावर बाहेर पडणाऱ्या द्रवाला नीरा असे म्हणतात. सूर्योदयापूर्वी घेतल्यास गोड लागते. नंतर त्याची फसफसून ताडी बनते. त्यापासून पाम वाईन बनवतात. तसेच झाडातून बाहेर पडणाऱ्या द्रवाचा गूळ आणि साखर पण बनवितात.
  • नारळाच्या फुलापासून पण एक चविष्ट पदार्थ बनवितात. नारळाचे तेल साबणामध्ये, मॉइश्चरायझर आणि डिटर्जंट मध्ये वापरले जाते.

Naralache Fayde / नारळाचे व्यापारी उपयोग :

  • नारळाच्या फळाच्या तिन्ही भागांचे उपयोग आहेत. खोबरे अन्न आणि तेल ह्यामध्ये उपयोगी आहे. कवटी [हस्क] चा उपयोग शोभिवंत वस्तु डेकोरेशन व पेय पिण्यासाठी होतो. एका ऑलिंपिक मध्ये त्याचा उपयोग पेयासाठी झाला आहे. तसेच संगीतात घोड्यांच्या टापांचा आवाज काढण्यासाठी केला गेला आहे. बाहेरच्या तंतुमय शेंड्या फर्निचरच्या गाद्या आणि पायपुसणे, ब्रश, दोरखंड इत्यादि साठी वापरतात. कंपोस्ट खतामध्ये पण ह्याचा वापर होतो. नारळाच्या फांद्यांपासून झाडू, केरसुणी बनवितात. मुळे माऊथवॉश आणि जुलाबावर औषध म्हणून वापरतात.
  • हिंदू धर्मात पूजेत नारळाला महत्त्वाचे स्थान आहे. लक्ष्मी आणि सत्यनारायण पूजेत नारळ लागतोच. तसेच तीन डोळे असल्याने त्याला शंकराचे प्रतीक मानतात. त्यातही एकच डोळा असेल तर तो नारळ शुभ मानतात.
  • असा हा कल्पवृक्ष नारळ मानव जातीला देवाचे वरदान आहे.

Naralache Mahatva / Uses of Coconut Tree in Marathi Language / Coconut Water Benefits Wikipedia

1 thought on “Coconut Tree Information in Marathi | नारळाच्या झाडाची माहिती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *