Skip to content
Home » Essay in Marathi Language » Majhi Aaji Essay in Marathi Language || Maji Aji, Mazi Aaji Nibandh

Majhi Aaji Essay in Marathi Language || Maji Aji, Mazi Aaji Nibandh

mazi aaji marathi essay

My GrandMother Essay in Marathi

माझी आजी निबंध

शुभम करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा | शत्रूबुद्धी विनाशाय दिपोज्योती नमोस्तुते|

संध्याकाळी देवापुढे दिवा लावून माझी आजी आपली सुरेल आवाजात सांज आरती करते. उदबत्तीचा सुवास घरभर पसरतो आणि तुपाच्या दिव्यातील वात मंद प्रकाशात फडफडत असते. सगळ्या देवांच्या मुखावर तो मंद प्रकाश पसरतो आणि देवांच्या सात्विक मूर्तींबरोबर माझी आजी पण इतकी सात्विक दिसते की तिच्या कडे बघतच राहावे असे वाटते. माझी आजी म्हणजे माझ्या बाबांची आई माझ्या मनातला एक सुंदर ठेवा आहे. ती माझी हक्काची दौलत आहे ज्याच्यावर माझा आणि फक्त माझा हक्क आहे. माझी आजी माझे सर्वस्व आहे. ती माझी मैत्रीण आहे, माझी शिक्षक आहे, माझी मोठी आई आहे आणि माझे बाबा पण आहे. तिचे आणि माझे एक सुंदर विश्व आहे.

करारी व्यक्तिमत्व :

माझी आजी खूप रुबाबदार दिसते. ती उंच, गोरीपान आणि धारदार नाकाची आहे. ह्या वयात पण तिला एकही सुरकुती नाही आहे. साधी स्वच्छ सुती किंवा रेशमी साडी आणि ब्लाऊज, केसांची वेणी किंवा अंबाडा आणि डोळ्याला चष्मा असे तिचे रूप आहे. त्यामुळे ती खूप करारी वाटते. ती ठाम मतांची आहे. तिला नीटनेटके रहायला आवडते आणि आम्हालाही ती तसेच रहायला लावते. ती मोजकेच दागिने घालते. पण त्यात तिचा चोखंदळपणा दिसून येतो. ती कधी मोत्याचे तर कधी सोन्याचे दागिने घालते. पण उगाच भरपूर दागिने घालून त्यांचे प्रदर्शन करायला तिला आवडत नाही. “साधी राहणी आणि उच्च विचारसरणी” असे तिचे आयुष्याबद्दलचे तत्व आहे. तिने सर्व मुलांना वाढवून आणि चांगले शिक्षण देऊन मोठे केले आहे. ती स्वत: पण चांगली शिकलेली आहे. त्यामुळे आम्हीपण शिकून खूप मोठे व्हावे असे तिला वाटते. ती जे काही सांगते ते आमच्या भल्यासाठीच असते हे आम्हाला नक्की माहित आहे म्हणून आम्ही कोणीही तिचा शब्द मोडीत नाही.

वात्सल्यसिंधू आजी:

आजी जरी करारी असली तरी मनातून अत्यंत प्रेमळ आहे. तिचे प्रेम ज्यांना लाभले ते खूप भाग्यवान! आम्ही नातवंड आजीचे खूप लाडके आहोत. आमच्यासाठी ती काहीही करायला तयार असते. ती आमच्याबरोबर पत्ते खेळते, चेस ,साप शिडी, व्यापार इत्यादी खेळ आम्हाला सुट्टी लागली की खेळते. त्या खेळांमध्येही तीच जिंकते. पण मुद्दाम आम्हाला जिंकून देते. त्यामुळे सुट्टी लागली की आम्हाला कुठेही बाहेर जावे लागत नाही. आमच्याबरोबरची मुले पाळणाघरात राहतात पण आजीमुळे आम्हाला घराचे सुख मिळते. आम्हाला शाळेतून आल्याबरोबर गरम खायला देते. आजी खूप छान छान पदार्थ बनवते. त्यामुळे शाळेत आमचा डबा बाकीचेच मुले खातात. मग आजी आम्हाला वेगळा डबा देते. तिच्या लाड करण्यावर आई चिडते आणि म्हणते ,तुम्ही लाडावून ठेवले आहे मुलांना तेंव्हा ती हसून म्हणते अग, मुलांना अस एक तरी स्थान असाव की तिथे सगळं त्यांच्या मनासारखे व्हावं. नाहीतर ती मुले बंडखोर होतात.

डॉक्टर आजी :

आजीला जसे मुलांचे मानसशास्त्र माहित आहे, तसेच लहान मुलांच्या आजारावर घरगुती औषधे पण खूप माहित आहेत. घरात लहान मुल आले की त्याचा सगळा ताबा तिच्याकडे असतो. त्याला तेल लावून चांगले चोळून अंघोळ घालणे, सर्दी,पडसे, खोकला यावर काढा देणे, औषधी गुटी देणे अशी सगळी काळजी ती घेते. त्यामुळे आई अगदी निर्धास्त असते. तिच्यामुळे आम्हाला कोणालाच डॉक्टर कडे जावे लागत नाही आणि आमच्या सर्वांच्या तब्येती अगदी मस्त आहेत. आम्हालाच काय, आजूबाजूच्या लोकांना पण तिच्या ज्ञानाचा फायदा होतो. ती हे पोस्टल कोर्स करून शिकली पण आहे पण ती कोणाकडूनही पैसे घेत नाही. आमच्या कामवाली बाईला ती आधी खायला देते आणि बरे नसले तर औषध देतेच पण ताजे गरम खायला देते. ती तिला ओरडते पण कारण ती स्वत:च्या तब्येतीकडे लक्ष देत नाही म्हणून. अशी ती माणुसकी पण जपते.

समाजसेविका :
आजीला हा समाज सेवेचा वारसा तिच्या आई वडीलांकडून आला. ते पण डॉक्टर होते आणि त्यांनी गरीबांना फुकट औषधे दिली. तसेच कितीतरी गरीब मुलांना घरी ठेवून शिकविले. आजीने पण खूप गरीब पण हुशार विद्यार्थ्यांना शिकविले. त्यांची फी भरली. त्यापैकी कितीतरी मुले डॉक्टर, इंजिनियर झालेली आहेत. ते अजून आजीला मानतात आणि तिला भेटायला येतात. ती सगळ्यांना आवडते. तिच्या खूप ओळखी आहेत. माणसांची तिला खूप आवड आहे. त्यामुळे आमच्या कडे खूप लोक येतात. ती सगळ्यांना सल्ला देते. मार्गदर्शन करते. ती सुख दु:खाच्या पलीकडे विचार करते. ती म्हणते दु:खाचा विचार करूनच माणूस जास्त दु:खी होतो. म्हणून ती दु:खी माणसाला समजाविते. पण अर्थात विचारले तरच. ती म्हणते कुणाच्याही खाजगी बाबतीत आपण विचारू नये. ती आईला पण कधीही असे कर किंवा तसे कर असे सांगत नाही. जमलच तर मदतच करते. ती सगळ्यांना मदत करते. अडी अडचणीला धावून जाते. श्रमाने पैशाने ती मदत करते. आणि ह्याचा कुठेही बोभाटा करीत नाही.

मला तर माझी आजी ही एक आदर्श व्यक्ती वाटते. ज्या मुलांना आजी नसते त्यांची मला खूप दया येते. माझे मित्र मैत्रिणी तर तिला पळवून नेण्याच्या गोष्टी करतात. मग ती अगदी गोड हसते. आणि त्यांना पण खाऊ देते.
अशी आहे माझी गोड गोड आजी!

Click Here for the Full List of Essays on Marathi.TV

Majhi Aaji Essay in Marathi Language Wikipedia

Essay on My Grandmother in Marathi Story

2 thoughts on “Majhi Aaji Essay in Marathi Language || Maji Aji, Mazi Aaji Nibandh”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *