Home » Tips Information in Marathi » Raigad Fort Information in Marathi, रायगड Raigad Killa Essay

Raigad Fort Information in Marathi, रायगड Raigad Killa Essay

Raigad Fort Information in Marathi

रायगड माहिती

 • महाराष्ट्राचा इतिहासात रायगड किल्ल्याला महत्वाचे स्थान आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगातील हा किल्ला अतिशय प्रेक्षणीय आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाडपासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर हा किल्ला असून त्याची समुद्रसपाटीपासून उंची सुमारे २८५१ फूट आहे.

इतिहास

 • रायगडाला पूर्वी ‘रायरी’ असे संबोधले जाई तर युरोपीय लोक त्याला पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत. चारी बाजूनी डोंगरांनी वेढलेला असल्याने रायगड जिब्राल्टर प्रमाणेच जिंकण्यास कठीण होता. गडाच्या उत्तर-पूर्वेला काळ नदी आहे तर पश्चिमेला गांधारी नदी आहे. तसेच पूर्वेला लिंगाणा, आग्नेयला राजगड, दक्षिणेकडे प्रतापगड, मकरंदगड, उत्तरेला कोकणदिवा दिसतात.
 • तसेच या ठिकाणापासून मुंबई, पुणे, सातारा ही स्थाने सारख्याच अंतरावर आहेत. सागरी दळणवळणासाठी सुद्धा हा प्रदेश उत्तम होता. म्हणूनच शिवाजी महाराजांनी रायगडलाच राजधानी बनविले. रायगडाला रायरी, इस्लामगड, नंदादीप, जंबुद्वीप, तणस, राशिवटा, बदेनूर, रायगिरी, राजगिरी, भिवगड, रेड्डी, शिवलंका, राहीर आणि पूर्वेकडील जिब्राल्टर अशा विविध नावांनी ओळखले जाते.
 • पाचशे वर्षापूर्वी रायगड फक्त डोंगरच होता. निजामशाहीच्या काळात याचा उपयोग कैदी ठेवण्यासाठी होई. मे, १६५६ मध्ये महाराजांनी यशवंतराव मोरेंकडून रायरी ताब्यात घेतली. कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमदचा खजिना लुटून त्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला.

ऐतिहासिक घटना

 • रायगड अनेक ऐतिहासिक गोष्टींचा साक्षी आहे. त्यातील एक म्हणजे महाराजांचा राज्याभिषेक. राज्याभिषेकाच्या विधी पूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानी मातेचे दर्शन घेऊन, तीन मण सोन्याचे छत्र देवीला अर्पण केले होते. ६ जून, १६७४ रोजी शनिवार या दिवशी निश्चलपुरी गोसावी याच्या हस्ते राजसभेत राज्याभिषेक केला गेला. २४ सप्टेंबर १६७४, रोजी पुन्हा वैदिक पद्धतीने राजांचा पुन्हा राज्याभिषेक झाला.
 • ४ फेब्रुवारी, १६७५ रोजी संभाजी राजांची मुंज रायगडावरच करण्यात आली. त्यानंतर आठ दिवसांनी त्यांचा प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी विवाह संपन्न झाला. रायगडाने अनुभवलेली सर्वात दुखद घटना म्हणजे ३ एप्रिल, १६८० रोजी झालेला महाराजांचा मृत्यू. त्यानंतर १६ फेब्रुवारी, १६८१ रोजी संभाजी राजांचा राज्याभिषेक रायगडावरच झाला.

रचना

 • हिरोजी इंदुलकर यांनी आपले संपूर्ण कौशल्य पणाला लावून हा किल्ला बांधला आहे. या किल्ल्यावर राजसभा, राजनिवास, न्यायसभा, कल्याणसभा, विवेक सभा, दारु कोठारे, अंबरखाने, मंत्र्यांची निवासस्थाने, कचेऱ्या, नगरपेठ, किर्तीस्तंभ, तलाव, मंदिरे, खलबतखाना, हत्तीशाळा, अश्वशाळा, वस्त्रागार, रत्नागार, जगदीश्वर प्रासाद, करमणुकीची स्थाने अशी अनेक बांधकामे केली गेली होती. तसेच संरक्षण दृष्टीने डोंगराचे कडे तासलेले आहेत, भक्कम तटबंदी आणि बुलंद बुरुज उभारले गेले होते. तसेच अनेक चोरवाटाही बनविल्या गेल्या होत्या. गडाला जवळपास १४५ पायऱ्या आहेत. गड चढायला सुरुवात केल्यावर उजव्या बाजूस खुबलढा बुरुज आहे जिथून पायथ्याच्या खिंडीवर नजर ठेवली जात असे.
 • बुरुजाशेजारी ‘चित् दरवाजा’ होता परंतु आता तो उध्वस्त झाला आहे. चित्दरवाज्याने नागमोडी रस्त्याने पुढे गेल्यावर दोन पडक्या इमारती दिसतात ज्यातील एक सैनिकांची जागा व दुसरी धान्याचे कोठार होते. पुढे मदनशहाचे थडगे आहे जे मशीदमोर्चा म्हणून ओळखले जाते आणि एक मोठी तोफसुद्धा आहे. शिवाय थोड्या अंतरावर खडकात खोदलेल्या तीन गुहाही आहेत.
 • इथून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला टकमक टोक आणि उजव्या बाजूला हिरकणी टोक दिसते. आपल्या तान्ह्या बाळासाठी रात्रीच्या वेळी दुर्गम असा कडा चढून आलेल्या हिरकणीचे नाव कड्याला देवून शिवाजी महाराजांनी तिचा सन्मान केला होता. महादरवाज्याकडे जाण्याची दुसरी वाट नाना दरवाज्यातून जाते जी अतिशय कठीण आहे. या दरवाज्याचे दुसरे नाव ‘नाणे दरवाजा’ असे आहे. याचा अर्थ छोटा दरवाजा असा होतो. दरवाज्यावर दोन कमानी आहेत तसेच पहारेकऱ्यांसाठी दोन देवड्या आहेत.
 • गडाच्या महादरवाज्याची बांधणी अतिशय मजबूत अशा काळ्या दगडांनी बनविलेली आहे. दरवाज्याच्या कमानीवर सिंहसदृश्य प्राणी कोरलेले आहेत. महादरवाज्याच्या बाहेरच्या बाजूस सुंदर कमळे कोरलेली आहेत ज्याचा अर्थ ‘श्री आणि सरस्वती’ नांदत आहेत असा होतो.
 • महादरवाज्याला एक ७५ फूट उंचीचा व दुसरा ६५ फूट उंचीचा असे दोन मोठे बुरुज आहेत. तसेच तटबंदीमध्ये थोड्या थोड्या अंतरावर ‘जंग्या’ म्हणजेच गडावरून शत्रूंवर हल्ला करण्यासाठी छिद्रे ठेवलेली आहेत. महादरवाज्याच्या आतल्या बाजूला पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. महाद्वारापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी उभारलेली आहे.

प्रेक्षणीय स्थळे

 • महाद्वारातून पुढे गेल्यानंतर हत्ती तलाव दिसतो. गजशाळेतील हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होई. तेथून काही अंतरावर गंगासागर तलाव आहे. महाराज्यांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानांची तीर्थे याच तलावात टाकली होती म्हणूनच याचे गंगासागर असे नामकरण झाले. हा तलाव आजही रायगडाला पाणी पुरवितो.
 • गंगासागराच्या दक्षिण दिशेला दोन उंच स्तंभ आहेत. या नक्षीदार स्तंभांना पूर्वी पाच मजले होते. स्तंभांच्या पश्चिम बाजूला असलेल्या भिंतीत पालखी दरवाज्याकडे जाणाऱ्या पायऱ्या लागतात. पालखी दरवाज्यातून बालेकिल्ल्यात प्रवेशचा मार्ग आहे. पालखी दरवाज्यातून एक सरळ मार्ग मेणा दरवाज्यापर्यंत जातो. उजव्या बाजूला राण्यांच्या महालांचे भग्न अवशेष दिसतात. मेणा दरवाज्यातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करता येतो.
 • त्यापुढे राजांचा वाडा व राणीवसा आहे. त्यानंतर पूर्वेकडे तोंड असलेला सिंहासनाचा चौथरा आहे. येथे शिवाजी महाराजांचे बत्तीस मण सोन्याचे रत्नजडीत सिंहासन होते. तसेच येथे सुंदर नक्षीकाम केलेली मेघाबंडरी आहे. राजसभा सुमारे २२० फूट लांब व १२४ फूट रुंद आहे. समोरच नगारखाना आहे. नगारखाना व सिंहासनामधील अंतर बरेच असूनही नगारखान्याजवळ बोललेले सिंहासनाजवळ चांगले एकू येते.
 • नगारखान्याकडून डावीकडे ‘होळीचा माळ’ ची जागा आहे जिथे शिवछत्रपतींचा भव्य पुतळा स्थापन केला आहे. पुतळ्यासमोर शिवकालीन बाजारपेठेचे भग्न अवशेष दिसतात. पेठेच्या दोन रांगामध्ये एकूण ४४ दुकाने असून मध्ये सुमारे चाळीस फूट रुंदीचा रस्ता आहे. महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूला शिरकाईदेवीचे देऊळ आहे. आता जे देऊळ आहे ते मूळ देऊळ नसून मावळकर नावाच्या इंजिनिअरने बांधले आहे. पण देवळातील मूर्ती मात्र मूळ मूर्तीच आहे.
 • बाजारपेठेच्या खालच्या बाजूला ब्राह्मणवस्ती, व ब्राह्मणतळे यांचे अवशेष आहेत तसेच जगदीश्वराचे भव्य मंदिर आहे. मंदिरात नंदीची सुबक परंतु भग्न मूर्ती, मध्यभागी कासव व हनुमानाची उंच मूर्तीसुद्धा आहेत. मंदिराच्या पायऱ्यांच्या खाली एक शिलालेख कोरलेला आहे. मंदिरापासून थोड्या अंतरावर महाराजांची समाधी आहे. येथे काळ्या चिऱ्याचे अष्टकोनी फरसबंदी जोते बांधले आहे. फरसबंदीच्या खाली पोकळीत शिवाजीमहाराजांची रक्षा आहे. तसेच शिवाजी महाराजांच्या वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधीही आहे ज्याने शिवाजीमहाराजांच्या चितेत उडी घेतली होती.
 • शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक घडामोडींचा साक्षी असणारा हा किल्ला आपल्याला नतमस्तक होण्यास भाग पाडतो.

1 thought on “Raigad Fort Information in Marathi, रायगड Raigad Killa Essay”

Leave a Reply

Your email address will not be published.