Sindhudurg Information in Marathi

सिंधुदुर्ग माहिती

 • भुईकोट आणि गिरिदुर्ग याप्रमाणेच सागरी मार्गावरील शत्रूंशी लढा देण्यासाठी शिवाजी महाराजांनी अनेक जलदुर्गसुद्धा बांधले. शिवाजीमहाराजांच्या राजवटीत बांधला गेलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्ग प्रकारतील आहे. महाराष्ट्रातील सिधुदुर्ग जिल्ह्यात मालवण नजीकच अरबी समुद्रात हा दुर्ग बांधला गेला आहे. २५ नोव्हेंबर, १६६४ रोजी किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली व १६६७ मध्ये बांधकाम पूर्ण झाले.
 • हा किल्ला आरमाराच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा होता. भारत सरकारने २१ जून, २०१० रोजी या किल्ल्याला संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले.

रचना व इतिहास

 • किल्ला सुमारे ४८ एकर जमिनीवर पसरला आहे आणि किल्ल्याला सुमारे तीन किलोमीटर लांबीची तटबंदी आहे. तट सुमारे ३० फूट उंचीचा असून रूंदी १२ फूट आहे. पश्चिम व दक्षिणेकडील तटाच्या पायात ५०० खंडी शिसे घातले गेले आहे व तटबांधणीला सुमारे ऐंशी हजार होन खर्च आला होता. तटबंदीवर जवळपास ५२ बुरुज असून ४५ दगडी जिने आहेत. तटावर ठिकठिकाणी तोफा ठेवण्याच्या जागा आणि शत्रूवर बंदुकांचा मारा करण्यासाठी जंग्या म्हणजे तटाला भोके ठेवलेली आहेत. तसेच सैनिकांसाठी पायखाने आहेत, जे छत्रपती शिवाजी महाराजांचा सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश ३०० वर्षापूर्वी देत असे.
 • येथे दूध विहीर, साखर विहीर व दही विहीर अश्या तीन दगडी विहीरी आहेत. या तीनही विहिरींना गोडे पाणी आहे. किल्ल्याच्या बाहेर समुद्राचे खारे पाणी आणि किल्ल्याच्या आत गोडे पाणी हा एक नैसर्गिक चमत्कारच आहे. शिवाय पाण्याचा अतिरिक्त साठा करण्यासाठी बांधलेला एक कोरडा तलाव सुद्धा आहे ज्याचा वापर सध्या पावसाळ्यात पिकवला जाणारा भाजीपाला व कपडे धुण्यासाठी होतो.
 • येथे शिवाजी महाराजांचे शंकररूपातील मंदिरही आहे, जे १६९५ साली शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र राजाराम महाराज यांनी बांधले होते. या मंदिराला ‘श्री शिवराजेश्वर’ मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिरात मूर्ती शेजारी दोन तलवारी, ढाल व जिरेटोप ठेवलेला आहे. किल्ल्याची पायाभरणी शिवाजी महाराजांच्या हस्ते झाली होती. आजही तो दगड मोरयाचा दगड नावाने प्रसिद्ध आहे. एका दगडावर गणेशमूर्ती, सूर्याकृती आणि चंद्राकृती कोरून त्या दगडाची महाराजांनी पूजा केली होती.
 • किल्ला बांधण्यासाठी सुमारे एक कोटी होन खर्च झाले व बांधणीचे काम जवळपास तीन वर्ष चालले. ज्या चार कोळ्यांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी जागा शोधली त्यांना इनामस्वरूप गावे दिली गेली.

प्रेक्षणीय स्थळे व वैशिष्ट्ये

 • सिंधुदुर्गचा किल्ला पूर्वाभिमुख आहे. महादरवाजा गोमुखी पद्धतीने बांधला गेला आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार दोन बुरुजांच्या मध्ये असे बांधले गेले आहे की प्रवेशद्वार लक्षातही येत नाही. दरवाजासमोर प्रांगण आहे परंतु शत्रू हत्तीच्या सहय्याने धडक मारू शकेल अशी जागा ठेवलेली नाही. समुद्रमार्गे गडावर गेले की एक उत्तराभिमुख खिंड दिसते. इथून आत गेल्यावर उंबराच्या फळ्यांपासून बनविलेला भक्कम असा दुर्गाचा दरवाजा लागतो.
 • उंबराचे लाकूड दीर्घकाळ टिकते याकारणास्तव उंबराच्या व सागाच्या लाकडाचा उपयोग करून हा दरवाजा बनविला गेला. येथून थोडे आत गेल्यावर एक छोटेसे मारुतीचे मंदिर लागते. येथेच दोन छोट्या घुमट्या आहेत ज्यापैकी एकामध्ये चुन्यावर उमटवलेले शिवाजीमहाराजांच्या डाव्या पायाचा व उजव्या हाताचा ठसा आहे. पुढे काही अंतरावर बुरुजावर जाण्याचा रस्ता आहे.
 • बुरुजावर पहाळणी केल्यास आजूबाजूचा जवळजवळ १५ मैलांचा नयनरम्य प्रदेश दिसतो. किल्ल्यच्या पश्चिम दिशेला जरीमरी देवीचे देऊळ आहे. किल्य्यावरील शिवाजीमहाराजांच्या देवळाच्या मंडपात महाराजांची बैठी प्रतिमा आहे जी इतर कुठल्याही किल्ल्यावर आढळत नाही. सिंधुदुर्ग किल्ल्याचे दुसरे वैशिष्ट्य असे की दर बारा वर्षांनी शिवराजेश्वर येथे रामेश्वराची पालखी येते.
 • इंग्रजानी हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर येथे थोडी नासधूस करून किल्ल्याला नुकसान पोहचवले. किल्यांच्या बांधणीसाठी वापरलेला चुना आजही दृष्टीस पडतो. या किल्ल्यावर २२८ फूट उंचीचा मराठ्यांचा भगवा ध्वज आणि ध्वजस्तंभ होता. जो समुद्रातून दूरवरूनही सहज दिसत असे व त्याला पाहून कोळी लोक मासेमारीसाठी गेले की खडकापासून लांब राहत असत.
 • हा भगवा ध्वज १८१२ सालपर्यंत फडकत होता. आजही काही लोक येथे वस्ती करून राहतात. १९६१ साली मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण या किल्ल्याच्या तटाची दुरुस्ती करून घेतली होती. मराठा साम्राज्याची व वैभवाची साक्ष देत हा जलदुर्ग अरबी समुद्रात दिमाखात उभा आहे.