Mi Chitrakar Jhalo Tar

Mi Chitrakaar Zalo Tar Essay in Marathi | Nibandh मी चित्रकार झालो तर

Mi Chitrakaar Zalo Tar Essay in Marathi Langauge

Mi Chitrakar Zalo Tar : मी चित्रकार झालो तर

पु.ल.देशपांडे ह्यांनी अपूर्वाई मध्ये म्हंटले होते की फोटोग्राफी हि त्यांच्यावर रुसलेली कला आहे. तशीच माझ्यावर रुसलेली कला म्हणजे चित्रकला. अगदी लहानपणापसून ते आत्तापर्यंत ती कला त्रास देते आणि मान खाली घालायाल लावते. अगदी लाईन सुद्धा सरळ काढता येत नाही तिथे रेखाचित्राची गोष्टच नको.

मला रांगोळी काढणाऱ्या बायकांचे खूप कौतुक वाटते की कुठेही शिकलेल्या नसतांना त्या इतक्या सुंदर आणि समरूप रेषा काढतात. मला तर महिरप पण जमत नाही. उजवीकडची जास्त गोल तर डावीकडची चपटी. वस्तुचित्रे ओळखूच येत नाही. डबा काढला तर चौरंग दिसतो आणि हवेच्या दाबाच्या प्रयोगाप्रमाणे दहा ठिकाणी वाकलेला दिसतो. जीवशास्त्राच्या तासात (biology) तर माझी खूपच भंबेरी उडते कारण मी काढलेले प्राणी वर्गात सगळ्यांच्या हास्याचा विषय होतात. मी काढलेला बेडूक हसरा दिसतो तर उंदीर रागावलेला दिसतो.
खरच..मला कधी चित्रकला येईल आणि मी पिकासो, लियोनार्डो डा विन्सी सारखा, सावंत बंधुंसारखा वॉटर कलरची उत्तम निसर्गचित्रे काढतो असे होईल का ??. असे म्हणतात की कला ही उपजतच असते, पण कठोर प्रयत्न केले तर साध्य होऊ शकते.

मी चित्रकार झालो तर प्रथम निसर्गचित्रे काढीन. कारण निसर्गाइतके काहीच सुंदर नाही. व्ही.शांताराम ह्यांच्या सिनेमातील एका गाण्यात हे सुंदर वर्णन केले आहे, “हरी भारी वसुंधरा पे नीला नीला ये गगन, के चुपके बादलो की पालकी उडा रहा पवन, दिशाएँ देखो रंगभारी, चमक राही उमंग भरी, ये किसने फुल फुल पे किया सिंगार है, ये कौन चित्रकार है ,ये कौन चित्रकार|” मला अशी सुंदर चित्रे काढायची आहेत. मला खळाळत्या गंगेचे हिमालयाच्या रांगांतून वाहतांना चित्र काढायचे आहे, मला ऋषीसारखे ध्यानस्थ बसलेल्या पर्वतांच्या रांगांचे चित्र काढायचे आहे. संथ जलाशयात उमललेल्या कमलांचे आणि सूर मारणाऱ्या पक्षाचे चित्र काढायचे आहे. प्रचंड वेगाने पडणाऱ्या धबधब्याचे आणि त्यातून उडणार्या फेसाळ लाटांचे चित्र काढायचे आहे. महाराष्ट्रातील उलट्या कोसळणाऱ्या धबधब्याचे चित्र काढायचे आहे.

मला समुद्र देखील खूप मनाला भावतो. मला कोकणात जाऊन सूर्यास्ताच्या वेळेचा समुद्र काढायचा आहे, तो लाल सूर्याचा गोळा, त्याचे पाण्यावर पडलेले प्रकाशाचे प्रतिबिंब आणि लाटांनी हिंदकळणारी सोनेरी रंगांची पखरण हे सगळ मला चित्र रूपांनी जिवंत करायचे आहे. सावंत बंधूंनी जसे देश विदेशात आपल्या चित्रकलेने नाव कमावले तसे मला आपली देशातील सौंदर्य सगळ्या जगाला दाखवायचे आहे. तसेच मला विदेशात जाऊन “नायगारा फॉल्स” आणि आल्प्स पर्वातावरील सौंदर्य पण चित्रित करायचे आहे. पण हे सगळ कठीण आहे. मग मी फुला पानांपासून सुरवात करीन. प्रथम शिकून घेतल्यावर मी व्हॅली ऑफ फ्लॉवर येथील नयनरम्य बागांचे चित्र काढीन.

मला ज्या प्राण्यांचे चित्र काढावेसे वाटते ते म्हणजे घोडा आणि वाघ. घोड्याच्या स्नायूंचे हुबेहूब चित्र काढणे हे कौशल्याचे काम आहे म्हणे. तरीही यापेक्षा वाघाच्या चेहऱ्यावरील ताठा आणि क्रूरतेचे हुबेहूब चित्र काढणे कठीण आहे. तसेच म्हाताऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या पण काढणे कठीण आहे. मी त्यासाठी जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश घेऊन माझे शिक्षण पूर्ण करीन आणि ही सर्व चित्रे सगळ्यांपेक्षा माझ्या वेगळ्या पद्धतीने काढीन की ती हुबेहूब वाटली पाहिजे. त्यासाठी मी हल्लीच्या 3-D तंत्रज्ञाचा उपयोग करीन. मला चित्रकला जमली तर मी 3-D आणि अनिमेशन पण शिकेन आणि त्यातून चांगले कॅरक्टर तयार करीन.

मी चित्रकार झालो तर मोनालिसा सारखे एक तरी गूढ चित्र काढीन, जे जगात प्रसिद्ध होईल. अजंठा लेण्यातील चित्रे पुन्हा रंगवीन आणि मूळ स्वरुपात आणीन. जिथे जिथे हा इतिहासकालीन वारसा आक्रमण कर्त्यांनी विद्रूप केला आहे तिथे मी त्याचे पुनर्वसन करीन.

मला आर के लक्ष्मण किव्हा बाळासाहेब ठाकऱ्यांसारखा व्यंगचित्रकार पण व्हायला आवडेल कारण ती सुद्धा एक लुप्त होऊ चाललेली कला आहे. पण मला मॉडर्न आर्ट मध्ये तितका रस नाही. कारण सामान्य माणसांना त्यातून आनंद मिळत नाही आणि बहुतेकांना मॉडर्न आर्ट समजतच नाही. मला माझ्या कलेने लोकांना आनंद द्यायचा आहे. म्हणून मी वास्तववादी चित्रे म्हणजे गरिबी, मरण, उदास माणसे, सामाजिक शोषण अशी चित्रे नाही काढणार. जे नेहमीच दिसते ते दाखवण्यापेक्षा सर्व सामान्य माणसांना स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जायला मला आवडेल.

मी चित्रकार झालो तर मोठ्या थोर व्यक्तींची चित्रे काढीन. त्यांचे हुबेहूब चित्र काढून त्यांना अजरामर करीन. आज आपल्या देशातील थोर व्यक्तींची चित्रे कोणी फ्रेंच माणसाने काढलेली आहेत, तर कोणी पोर्तुगीज लोकांनी काढलेली आहेत. त्यामुळे आपल्याला निदान कळते तरी की शिवाजी महाराज कसे दिसत होते, राणी लक्ष्मीबाई कशा दिसत होत्या. मी मादाम तेरेसा ह्यांचे सुरकुत्यांच्या जाळ्यातून दिसणारे पवित्र आणि निर्मल हास्य मला चित्रित करायचे आहे. आता हे दुसऱ्यावर अवलंबून नको.

हल्ली आपल्या देशातील मोठ्या लोकांचे मेणाचे पुतळे सुद्धा लंडन मधील मादाम तुसा म्युझियम मध्ये बघायला मिळतात. मी चित्रकारी बरोबर मूर्तीकला पण शिकेन आणि माझे स्वत:चे म्युझियम तयार करीन. मला मुर्तीकलेत पण रस आहे. ती जर मला चांगली आली तर माझ्यासारख्या राष्ट्रप्रेमी लोकांना घेऊन मी मोगल आक्रमणात भंगलेल्या सुंदर शिल्पांचे पुनरुज्जीवन करेन. त्यामुळे आपल्या देशात प्रवाशांची संख्या पण वाढेल आणि पर्यटनाला गती मिळेल.

चित्रकलेचा शेवटचा टप्पा म्हणजे स्वत:चे चित्र! ते तर मी काढीनच, पण इतके विनोदी चित्र कोणी काढले असे लोकांनी विचारायला नको म्हणून थांबलो, इतकच!

Click Here for the Full List of Essays on Marathi.TV

Composition Essay on मी चित्रकार झालो तर

Marathi Nibandh Mi Chitrakaar Zalo Tar

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *