Rashtriya Ekatmata Marathi Nibandh

National Integrity Essay in Marathi | Rashtriya Ekatmata Importance

National Integrity Essay in Marathi Langauge

राष्ट्रीय एकात्मता- काळाची गरज

“पंजाब सिंध गुजरात मराठा द्रविड उकल वंग विन्ध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधी तरंग ” आपण राष्ट्रगीत गाताना ह्या ओळींनी आपले उर अभिमानाने भरून येते. तसेच ऐ मेरे वतन के लोगो ह्या गीतातील, “ कोई शीख कोई जाट मराठा कोई गुरखा कोई मद्रासी, सरहदपर मरनेवाला हर वीर था भारतवासी, जो खून गिरा परबत पर वो खून था हिंदुस्तानी ” असे म्हणतो तेंव्हा आपल्याला माहित असते की, “परचक्र येतसे जेंव्हा चौदांची एकाच जिंव्हा.” सगळ्यांनाच भारत हा आपला देश आहे हे वाटत असते. परदेशी गेल्यावर भारतीय भेटला की आपण ताबडतोब त्याच्याशी बोलायला जातो. असे आहे तर मग हे दंगे धोपे, हा हिंसाचार का घडतात ? का आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला ग्रहण लागते? झुंडीला डोके नसते. त्यांना फक्त रक्तपात करायचा असतो आणि त्यांच्या डोळ्यात सूडाचा, हिंसेचा अंगार इतका भडकलेला असतो की त्यात किती निष्पाप जीवांचा बळी जातो हे त्यांच्या ध्यानात येत नाही.

पुरातन काळापासून भारत हा एक सहिष्णू, जातीभेद प्रांत भेद न मानणारा देश म्हणून प्रसिद्ध आहे. आर्यांची संस्कृती, गौतम बुद्ध, भगवान महावीर, गुरु नानक, ह्या सर्व धर्म संस्थापकांनी धर्माच्या शिकवणीत अहिंसेला प्रथम स्थान दिलेले आहे. आठ तत्वांमध्ये अहिंसा, अपरिग्रह, सचोटी ह्यांना अंगीकारण्यास सांगितले आहे. पैगंबरांनी हि त्यांच्या अनुयायांना भूतदया शिकविली आहे. भगवान येशू तर हिंसेला सामोरे जाऊन क्रुसावर खिळ्याचे प्रहर सोसून मेले. तरी सुद्धा ते म्हणत होते की, “देवा हे लोक काय करीत आहेत त्यांना काळात नाही. त्यांना क्षमा कर” मग इतक्या संस्कृती नांदत असतांना मधेच का हि माणसे एकमेकांच्या जीवावर उठतात?

प्रथम भारतात इतक्या जाती जमाती कशा आल्या ह्याचा विचार करू. पूर्वी भारतात फक्त द्रविड संस्कृती होती. त्यानंतर वायव्य खिंडीतून सतत आक्रमण होत राहिले आणि हे आक्रमण करणारे आपल्या संस्कृतीचे अवशेष सोडून गेले. तसे तसे धर्मात बदल होत गेले. नंतर चेन्गीज्खानापासून धर्मावर आक्रमण व्हावयास लागले. जेता नेहमी जीत्यांच्या संस्कृतीवर आक्रमण करतो. तसे बाबर, अहमदशहा अब्दाली, अल्लाउद्दिन खिलजी ह्यांनी क्रूरतेचा कळस करीत हजारो हिंदूंना बाटवून सत्ता प्रस्थापित केली. त्यानंतर भारताचा बराचसा उत्तर भाग मुसलमानी अमलाखाली आला. त्यांनी दक्षिणेत पण प्रसार करण्यास सुरुवात केली पण शिवाजी महाराजांमुळे तो तेथेच थांबला. तरीही हैदराबाद, म्हैसूर इथे मुसलमानी राजवट आलीच. ह्याचे कारण हिंदू राजांमध्ये असलेला एकीचा अभाव. जगाला भारत सोन्याची खाण होती आणि आहे. म्हणून तेथील लोकांना गुलाम करून घेऊन दौलत लुटायला युरोप पण पुढे सरसावला. आणि ईशान्य-पूर्व राज्ये, गोवा, खाली केरळ, मद्रास येथे त्यांनी लोकांना बाटवून ख्रिस्चन धर्माची दीक्षा दिली. त्यामुळे भारतात धर्माधिष्ठित राज्ये निर्माण झाली.

पण महात्मा गांधी ह्या अलौकिक पुरुषाने ह्या सर्व लोकांना एकत्र आणले आणि इंग्रजांचे राज्य उलथून टाकले तेही अहिंसेच्या मार्गाने. तोपर्यंत हिंदू मुस्लीम खांद्याला खांदा लाऊन लढले, लाठ्या खाऊन मेले पण त्यावेळच्या नेत्यांनी पाकिस्तान वेगळा काढला आणि हिंदू मुस्लीम रयतेचा बटवारा झाला. त्यात हजारो निष्पाप जीवांचे बळी गेले. हिंसाचाराचा आगडोंब उसळला. माणुसकीला काळिमा लागेल अशा दंगली आणि हत्या झाल्या. त्याची भळभळती जखम आजही सिंधी आणि पंजाबी लोकांच्या उरात वाहते आहे. ह्यावर किती सिनेमे आणि सिरियल्स निघाल्या. जसे तमस,शेजारी, गदर इत्यादी. ते पहिले की ‘नरेच केला हिन किती नर’ हि उक्ती आठवते. श्री.ना. पेंडसेंच्या एल्गार कादंबरीत लेखकाच्या घरी शेजारचा मुस्लीम मुलगा दंग्यात बळी जाऊ नये म्हणून त्याची आई ठेवते आणि अंगाई म्हणताना म्हणते,” अवघा प्रकाश लोपला ,अंतरीच्या दीपा तेल घालीन रक्ताचे, घर रक्षी दुर्गा देवी इकबलचे ” अशी आहे उदात्त आपली संस्कृती. पण हा जातीय हिंसाचार फक्त मुस्लीम हिंदू असा नाही तर ख्रिश्चन हिंदू असा पण होतो. आणि परकीयांना आपल्या घरातील दुहीचा फायदा मिळतो.

हि झाली एकात्मतेला लागलेली जातीय कीड! ह्यात प्रांतीय वाद शिरला की आणखीनच परिस्थिती गंभीर होते.स्वातंत्र्य नंतर आपली स्थिती ब्रिटिशांनी सगळ लुटून नेल्यामुळे डबघाईला आली होती. त्यामुळे आणि नंतरच्या राजवटीमुळे काही प्रांत अविकसित राहिले. लोकसंख्येच्या मानाने अपुरा पुरवठा असल्याने ते समृद्ध राज्यांमध्ये स्थलांतरित झाले. त्यावरून परप्रांतीय आणि स्थानिक हा वाद सुरु झाला कारण त्यांच्या मुळे स्थानिकांचा रोजगार बुडला. आणि कुठेही होणारे वाद हे मुख्यत: अस्तित्वाची लढाई असते. त्यावरून त्यांच्यावर हल्ले होऊ लागले. मुंबई मध्ये भय्ये आणि बिहारी तर बंगाल, आसाम मध्ये बांगलादेशी. 26 जानेवारीला कितीही एकात्मतेचे गोडवे गाईले तरी मुळात प्रत्येक आपली जात धर्म आणि प्रांत ह्याच बाबीत अडकला आहे.त्यामुळे आपल्या राष्ट्रीय एकात्मतेला ग्रहण लागले आहे. दक्षिणी लोकांना हिंदीचे वर्चस्व नको आहे. ते काहीही झाले तरी हिंदी मध्ये त्यांच्या राज्यात बोलत नाही. आपल्याला एकतर इंग्लिश नाहीतर त्यांच्या भाषेत बोलावे लागते. हिंदी लोक मराठी बोलत नाही[येते तरी] ईशान्य पूर्व चे लोक आपल्याला चीनच्या जवळचे समजतात. तर काश्मीरचे लोक आपल्याला पाकिस्तानचे जवळचे समजतात. केरळ, गोवा, वसईचे ख्रिश्चन आपल्याला प्युअर कथालिक समजतात. अशी हि सरमिसळ आहे.

ह्यावर अमेरिकेचे किंवा इंग्लंडचे उदाहरण घेतले पाहिजे. ह्या देशांमध्ये जवळ जवळ सर्व जगातील निर्वासित, किंवा कामानिमित्त आलेले लोक आहेत. जेंव्हा एखादा सामना असतो तेंव्हा तिथला भारतीय किंवा पाकिस्तानी असला तरी इंग्लंड किंवा अमेरिकेलाच जिंकून देतो. कारण एकदा तिकडे गेल्यावर ते पूर्ण पणे अमेरिकन किंवा ब्रिटीश होतात. त्यांना शिस्तच तशी लावली जाते. पण आपल्याकडे मात्र असे होत नाही कारण आपण उदारमतवादी आहोत. तरीही ह्या काळ्या ढगाला चंदेरी किनार आहे. आपल्याकडे अती उच्च आणि अती नीच लोकांमध्ये हा दुजाभाव नाही आहे. अलिशान घरांमधील उच्चभ्रू लोक आणि झोपडपट्टीतील गरीब लोक जातीभेद मानत नाही. त्यांच्या आंतरजातीय विवाह पण होतात. एखादे संकट आले तर त्यांच्याकडून एकात्मतेचे उत्कृष्ट प्रदर्शन होते. तसेच नवीन पिढी हि देश विदेशात जाऊन आली आहे आणि ती चांगला विचार पण करते. त्यांच्यात जात, प्रांत इत्यादी चा विचार न करता मैत्री होते आहे. ग्लोबल कनेक्शन आणि सोशल मिडिया मुळे ते आपल्या देशाच्या सन्मानाबद्दल जागरूक झाले आहेत. क्रिकेटमध्ये सगळ्या भारताचे खेळाडू असतात पण टीम स्पिरीट दाखवून आज बलाढ्य संघ झाला आहे.

एकाच गोष्टीचे वाईट वाटते की युवा पिढी इतकी समजदार असताना काही नेते मंडळी आपल्या क्षुद्र स्वार्थासाठी त्याना भडकावून एकात्मतेमध्ये विघ्न आणीत आहेत. त्यामुळे भडकलेले युवक मोर्चे, दगडफेक करून आपले दैनंदिन जीवन विस्कळीत करतात आणि विकासाची गती, ज्यामुळे त्यांना रोजगार मिळणार आहे ती कुंठीत करतात. आणि आपल्याच पायावर धोंडा पडून घेतात. नेत्यांचे काहीही वाकडे होत नाही. सामान्य माणूस मात्र बळी जातो. आता पुन्हा एका महात्मा गांधींची ह्यांना एकत्र आणण्यासाठी गरज आहे.

हे जेंव्हा घडेल तेंव्हा खरच आपला भारत देश महान होईल आणि महासत्ता होईल.

Click Here for the Full List of Essays on Marathi.TV

Composition Essay on National Integrity Importance in Marathi Wikipedia

Rashtriya Ekatmata Din Divas Speech / Marathi Nibandh National Unity

1 thought on “National Integrity Essay in Marathi | Rashtriya Ekatmata Importance”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *