Skip to content
Home » Essay in Marathi Language » Paryavaran Essay in Marathi | Environment Project in Marathi, Nibandh

Paryavaran Essay in Marathi | Environment Project in Marathi, Nibandh

paryavaran project in marathi

Paryavaran Essay in Marathi

Paryavaran / Environment Project in Marathi : पर्यावरण निबंध

आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व गोष्टी जसे कि झाडे, प्राणी, पशु, पक्षी, डोंगर, नद्या, वारा, भूमी ह्या सर्व म्हणजेच पर्यावरण. पण आपल्या आयुष्यात पर्यावरणाचे एवढे महत्व का आहे? कारण माणसाने कितीही प्रगती केली तरी कितीही उच्च झाला तरी आपण सर्व सुद्धा या पर्यावरणाचाच एक भाग आहोत. आपण असा भाग आहोत जो पर्यावरणाची रक्षा सुद्धा करण्यास समर्थ आहोत आणि नष्ट करण्यास सुद्धा. पण दुर्दैवाची गोष्ट हि आहे कि, आपल्यातील बरेच जण पर्यावरणाची रक्षा करण्यापेक्षा कळत नकळत हानीच करत असतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा कि आपणही याच पर्यावरणाचा एक भाग आहोत व पर्यावरणासोबतच आपण हळूहळू नकळत आपलाही विनाश करत आहोत.

आपण पृथ्वीवरच का राहतो? इतर ग्रहांवर का नाही? याचे कारण आहे कि आपल्या सौरमालेतील सर्व ग्रहांपैकी फक्त पृथ्वीवरच राहण्यायोग्य पर्यावरण आहे. सौरमाला काय आपल्या आजूबाजूच्या, आपल्या माहितीतील सर्व ग्रहांपैकी फक्त पृथ्वीवरच असे पर्यावरण आहे. कित्येक वर्षे, अनेक शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत पण कोणीही आजतागायत असा ग्रह शोधू शकले नाही कि ज्यावर माणूस वस्ती करू शकतो. खोलवर विचार करून बघा; आपल्याला एखादे घर नाही आवडले, किंवा तिथे काही प्रोब्लेम्स असतील जसे कि पाणी पुरवठा होत नाही, वीज नाही तर आपण दुसरे घर घेऊ शकतो पण आपल्या पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधने संपली किंवा दुषित झाली तर आपण दुसऱ्या ग्रहावर राहायला जाऊ शकतो का? नाही ना. म्हणूनच आपल्याला आपल्या पृथ्वीची काळजी घेतली पाहिजे. इथल्या पर्यावरणाला जपले पाहिजे. नाहीतर आपला पुढच्या पिढीसाठी आपण खूप मोठी संकटे निर्माण करून ठेऊ ज्यासाठी ती पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही.

आधुनिक तंत्रज्ञान येण्यापूर्वी लोक अतिशय साधेपणाने आयुष्य जगत होते. जास्त लोभ नव्हता, जास्त हाव नव्हती. पण जस जशी माणसाची प्रगती होत गेली तस तशी माणसाने दुसऱ्यापेक्षा वरचढ होण्याची स्पर्धा सुरु केली. प्रगतीच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास करायला सुरवात केली. पर्यावरणाचे संतुलन बिघडवण्यास माणसाची हाव हे सर्वात मोठे कारण आहे. आपण आज ज्या प्रकारे जगतो आहोत ज्याप्रकारे पृथ्वीवरील सिमीत असलेली संसाधने झपाट्याने संपवतो आहेत ही भविष्यातील एका मोठ्या संकटाची नांदी आहे. ह्या संकटाची सुरवात झालेली आहे हे आपल्याला बातम्या बघताना समजू शकेल. कमी होत जाणारी पाण्याची पातळी, पावसाची अनियमितता, वाढणारा दुष्काळ, वारंवार येणारी वादळे हे सर्व पर्यावरणाच्या असंतुलांचे परिणाम आहेत. माणसे जंगलतोड करून शहरे वसवू लागल्याने जंगलातील प्राण्यांचे आयुष्य धोक्यात आले आहे. गेल्या काही दशकात अनेक प्राणी जाती दुर्मिळ झाल्या आहेत किंवा नष्ट झाल्या आहेत.

प्रदूषण हा पर्यावरणासाठी खूप मोठा धोका आहे व हे प्रदूषण फक्त मानवच करतो आणि मोठ्या प्रमाणावर करतो. प्रदूषणाचे परिणाम माहित असूनही प्रदूषण कमी करण्यासाठी आपण कोणतेच ठोस पाउल उचलत नाही. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पुरविण्यासाठी कारखाने वाढत चालले आहेत. हे कारखाने हवेत अनेक प्रकारचे अनैसर्गिक वायू सोडतात ज्यामुळे दिवसेंदिवस वायू प्रदूषण वाढत चालले आहे. आपण जर गच्चीवर उभे राहून दूरवर नजर टाकली तर आपणास लांबच्या इमारती किंवा टेकड्या खूप धूसर दिसतात, पण जर एखाद्या गावाला जाऊन दूरवर पाहिल्यास दूरचे डोंगरही स्पष्ट दिसतात. यावरून आपणास समजू शकते कि शहरात किती मोठ्या प्रमाणवर वायू प्रदूषण आहे. कारखाने फक्त वायू प्रदूषणच करतात असे नाही तर ते जलप्रदूषण हि खूप मोठ्या प्रमाणावर करतात, त्याचमुळे शहरातील नद्या, खाड्या किनारे यामधील पाणी नितळ न दिसता काळे दिसते. प्रदूषण फक्त कारखानेच नाही करत तर सामान्य माणसेही प्रदूषण करण्यात मागे नाहीत. आजकाल बऱ्याच लोकांच्या कडे गाड्या असतात. काही जणांकडे एकापेक्षा जास्त गाड्या असतात. छोट्या छोट्या अंतरावर जाण्यासाठी गाड्या वापरल्या जातात. गाड्यांच्या अतिरिक्त वापरामुळे पेट्रोल, डीझेल सारखी मौल्यवान संसाधने तर संपतातच पण प्रदूषण सुद्धा होते.

पर्यावरणाला वाचविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. कारण आपण पूर्णपणे पर्यावरणावर अवलंबून आहोत. सर्वात सोपा उपाय म्हणजे वृक्षतोड थांबविणे व जास्तीत जास्त झाडे लावणे. झाडे लावल्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल व पर्यावरणाचा ऱ्हास कमी होईल. शहरांमध्ये सुद्धा झाडे लावण्यासाठी जागा ठेवली गेली पाहिजे व शाळांच्या मदतीने तिथे झाडे लावून विद्यार्थ्यांना झाडांचे संगोपन करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे; यामुळे येणारी पिढी पर्यावरणाबाबत जागरूक राहील. तसेच वाहनांमुळे होणारे प्रदूषण सुद्धा कमी करण्यावर भर दिला पाहिजे. थोड्याच अंतरावर जायचे असेल तर पायी चालत जावे किंवा सायकलचा वापर करावा. शक्य तेथे बस व रेल्वेच्या वापरावर भर द्यावा ज्यामुळे प्रदूषण कमी करण्यास मदत होईल. कारखान्यांवर सुद्धा प्रदूषणसंबधी कारवाई केली गेली पाहिजे आणि योग्य पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले गेले पाहिजेत. जेव्हा पृथ्वीवरील सर्व देश, या देशातील सर्व लोक पर्यावरणाबाबत जागरूक होतील तेव्हाच आपली पृथ्वी पुन्हा एकदा सुजलाम, सुफलाम होईल.

Click Here for the Full List of Essays on Marathi.TV

Paryavaran Sanrakshan in Marathi Language Wikipedia

Paryavaran Pradushan in Marathi : Nature my Friend Essay in Marathi / Few Lines

10 thoughts on “Paryavaran Essay in Marathi | Environment Project in Marathi, Nibandh”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *