Pregnancy tips in Marathi Language

मातृत्व! परमेश्वराच्या अद्भुत लीलेचा मांगल्याचा चमत्कार! आई होणे ही भावनाच इतकी मंगल आणि उत्कंठापूर्वक असते की त्यापलीकडे काहीच सुचू शकत नाही. त्या वेळी गर्भवतीच्या मनात अनेक शंकांचा कल्लोळ, एक अनामिक हुरहूर असते. कोणाशी तरी हितगुज करावेसे वाटते. प्रत्येक दिवस एक वेगळाच अनुभव घेऊन येतो. जरी चार चौघींकडून ह्याबद्दल माहिती करून घेतली, तरीही प्रत्येक स्त्रीचे अगदी प्रत्येक बाळंतपण वेगळे असते.

एक नवीन जीव जन्माला घालणे हे जितके आनंदाचे तितकेच जोखमीचे पण असते. त्या गायनाकोलोजीस्टची खरोखर कमाल असते की त्या किती अवघड बाळंतपण सहज करून आईच्या चेहर्यावर सार्थकतेचा आनंद पाहतात. हल्ली बऱ्याच होऊ घातलेल्या आया आधीच अभ्यास करतात आणि मगच गर्भधारणेचा प्लान करतात. पण अशावेळी खूप वेगवेगळे सल्ले मिळतात,त्याने घाबरून जायला होते. त्यापेक्षा व्यवस्थित प्लान करू निष्णात डॉक्टर कडे जाऊन मग ही पावले उचलावीत.

परीक्षेची पूर्व तयारी : नॉर्मली शिकलेल्या आणि उशिरा लग्न झालेल्या मुलीना आहार आणि व्यायाम ह्याबद्दल मूलभूत माहिती असतेच. पूर्वी मुली अगदी लहान होत्या तेंव्हा त्यांना माहेरी पाठवविले जायचे.. हल्ली मुलींची नोकरी आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आपली व बाळाची काळजी घेणे हे आईचे कर्तव्य ठरते. त्यासाठी काही टिप्स दिलेल्या आहेत.

१. मुल जन्माला घालण्याचा विचार केला की इथ पासूनच तुमचा अभ्यास सुरु होतो. मुलाला जन्म देण्या अगोदर आईची प्रकृती निरोगी असायला हवी. तेंव्हा आधी रक्ताच्या रुटीन टेस्ट, जीटीटी टेस्ट, थायरॉईड टेस्ट,सोनोग्राफी, पापस्मिअर टेस्ट,जेनेटिक हिस्टरी ह्या सर्व टेस्ट करून घ्याव्या. कारण कधी कधी गर्भाशयात फायब्रॉईड असले तर अपुऱ्या दिवसांचे मुल किंवा गर्भपाताचा धोका असतो. तसेच मुलीच्या आईकडे गर्भपाताची किंवा त्रासाच्या डिलीवरी चा इतिहास असेल तर त्याबद्दल खबरदारी घ्यावी. रक्तगट निगेटिव असेल तर एक इंजेक्शन घ्यावे लागते. आईला ऍनिमिया असेल तर मूल पण ऍनिमिक होऊ शकते.

२. मुलीला किंवा तिच्या घरच्यांना डायबिटिस किंवा ब्लड प्रेशर चा त्रास असेल तर त्यासाठी आधी ह्या दोन्ही वर उपाय योजना करावी लागते. कारण डिलीवरी च्या वेळी ब्लड शुगर किंवा ब्लड प्रेशर वाढले तर मूल आतमध्ये गुदमरते.

३. एकदा ही पूर्व तयारी झाल्यानंतर आपण बाळाच्या स्वागतासाठी सिद्ध झालात. आता आहाराचा प्रथम विचार करायचा. मुलाच्या वाढीसाठी फॉलिक ऍसिड,आयर्न, विटामिन्स, आणि खनिजे,मुख्यत: कॅल्शियम ह्यांची नितांत गरज असते. त्यामुळे मुलाची मज्जासंस्था आणि बौद्धिक वाढ चांगली होते. अर्थात ह्याचा डोस डॉक्टरांच्या सांगण्या प्रमाणेच घ्यायचा. कारण जास्त आयर्न घेणे पण वाईट असते. त्यासाठी डॉक्टर काही विटामीन आणि मिनरलच्या गोळ्या लिहून देतात. त्याचबरोबर आहारात पण फळे [सी विटामीन साठी], पाले भाज्या आणि सलाड चा समावेश करावा. मात्र पपई किंवा उष्ण फळे खाऊ नये. तसेच आहारात कुळीथ अजिबात खाऊ नये.

४. बोअर झालात? मग सोपा उपाय म्हणजे प्री नेटल क्लास मध्ये प्रवेश घ्या. तेथे तुमच्या सारख्याच सगळ्या मुली असतील. मग हसत खेळत गप्पा माराव्या. हलका व्यायाम किंवा योग करावा. योग क्रियांमध्ये दीर्घ श्वसन, आणि कमरेच्या वरच्या भागाचे व्यायाम करा. त्याने प्रसूती सुलभ होते. फार दमछाक करू नका. वजन वाढले तरी नंतर कमी करता येते.

५. वजनावर लक्ष ठेवा. डॉक्टरांकडे दर महिन्याला तपासणीस जा. तेथे बाळाची योग्य ती वाढ होते आहे की नाही हे तपासले जाते. तसेच बाळाचे वजन वाढते आहे का आणि ते प्रमाणाबाहेर वाढत नाही ना ते बाघितले जाते. तसेच तिसर्‍या महिन्यानंतर बाळाची हालचाल जाणवते का ते तपासले जाते.

६. आपल्याकडे डोहाळे जेवण तसेच पाश्चात्यांकडे बेबी शॉवर असे प्रकार हे मातेने भरपूर आणि पौष्टिक खावे म्हणून केले जातात. ते खरेच चांगले आहे. त्या वेळी मातेला मानसिक आनंद मिळतो तसेच सुका मेवा फळे आणि दुधाचे पदार्थ भरपूर खायला देतात जे बाळाच्या वाढीस योग्य असते. आईचे मन जितके प्रसन्न राहील तितके चांगले. कारण बाळ फक्त शारीरिक नाही तर मानसिक रित्या सुदृढ झाले पाहिजे. शक्य असल्यास एखादी परीक्षा द्यावी.

७. ह्या दिवसात आंबट आणि नमकीन खावेसे वाटते. पण ते बाहेर कुठेही खाऊ नये. कारण ते अस्वच्छ असते त्याने बाळाला जन्मा नंतरची कावीळ होते. त्यापेक्षा घरगुती खावेत.

८. एकदा पोट वाढायला लागले की सैल कुडता सलवार घालावे,तसेच झोपताना पण सैल गाऊन घालावा. उंच टाचेच्या सँडल्स घालू नये. सपाट चपला घालाव्या आणि पाय सुजले असतील तर जरा मोठ्या नंबरच्या घालाव्या.

९. ब्यूटी पार्लरमध्ये कुठल्याही केमिकलची ट्रीटमेंट घेऊ नका तसेच सौना बाथ घेऊ नका. त्याने बाळाला त्रास होईल. उष्णतेपाशी फार काळ राहू नका.

१०. शक्यतो हालचाल करीत रहा पण खूप कष्टाची कामे, जड वजन उचलणे, शिडीवर चढणे, गर्दीच्या बस किंवा ट्रेनमध्ये घुसणे असे करू नका. हालचाल करण्यासाठी जेवल्या नंतर फिरायला जावे.

११. जर काही कारणाने गर्भाशयाची पिशवी चे तोंड उघडत असेल तर आणि शिरोडकर स्टीच ने बंद केले असेल तर खूप काळजी घ्या. बेड रेस्ट सांगितली असेल तर श्वसनाचे हलके व्यायाम मार्गदर्शनाखाली करा.

१२. शक्यतो नॅचरल प्रसूती होईल असे व्यायाम आणि खाणे पिणे ठेवा. कारण नॅचरल प्रसूतीच्या मुलांमध्ये चांगली प्रतिकार शक्ती असते. हलके ,सुपाच्य आणि वजन वाढणार नाही असे खाणे खाल्याने बाल पण सुदृढ होईल. खूप जड आहार घेतला तर गॅसेस होऊन कळा येतात आणि त्या व बाळंतपणाच्या कळा ह्यात फरक कळत नाही.

१३. कुठल्याही कारणाने स्त्राव सुरु झाला किंवा बाळाची हालचाल मंदावली, तर ताबडतो डॉक्टरांकडे जा.