Skip to content

Nirop Samarambh Information in Marathi | Farewell Speech on Send off

School Speech Marathi

Farewell Speech in Marathi

Speech on Send Off in Marathi : निरोप समारंभाचे भाषण

माननीय मुख्याध्यापिका, माझे सर्व गुरुजन आणि माझ्या मित्र मैत्रिणीनो,

आज आपला…म्हणजेच..आर के जोशी विद्यालय च्या १०वी तुकडीचा शाळेतला शेवटचा दिवस! बघता बघता भुर्रकन उडून गेलं हे शेवटच वर्ष! आपण आता माध्यमिक शिक्षण पूर्ण करून एक जबाबदार व्यक्ती बनण्यास जात आहोत. ह्यापुढे काय करायचे हे ज्याने त्याने ठरविले असेलच. आपण आता दाही दिशांना पांगणार आहोत. एका नव्या क्षितिजाला गवसणी घालणार आहोत. आपल्यापैकी कोणी कॉलेजला जाऊन पदवी प्राप्त करतील, कोणी डॉक्टर, कुणी इंजिनियर, कुणी शास्त्रज्ञ, कुणी कलाकार, कुणी उद्योजक होतील. आपल्याला पंख फुटले असे आपले आई, बाबा आणि गुरु हे अभिमानाने सांगतील. एका मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यांनी आपल्याला जगाच्या बाजारात पाठविले आहे. त्या आधी आपण एक १०वी ची अत्यंत महत्वाची परीक्षा देणार आहोत. त्यामध्ये आजपर्यंत जे शिकलो त्याचा कस लागणार आहे.

पूर्वी मुलगा आठ वर्षाचा झाला की त्याला गुरूगृही पाठवत. तेथे तो सगळी शास्त्रे आणि विद्या शिकून परीक्षा देऊन मग स्वगृही परतायचा. गुरु त्याला त्याच्याजवळ असलेली सर्व विद्या द्यायचा. आपल्यालाही आपल्या शाळेतल्या गुरुजनांनी त्यांच्या कडे असलेले सर्व ज्ञान दिले आहे. आपल्याला ह्या शाळेने गुरूगृही असल्यासारखेच आपले मानले आहे. आर के जोशी विद्यालय ही आपली दुसरी आईच आहे. असे म्हणतात की पहिला गुरु आई असते आणि दुसरा नंबर आपल्या गुरूचा असतो. आपले आपल्या शाळेने जे संगोपन केले, जे संस्कार केले ते इतर कुठेही मिळाले नसते.

मला आज प्रकर्षाने आठवतो आहे तो आपल्या शाळेचा पहिला दिवस…आपण सगळे शाळेत जायचे म्हणून खूप उल्हासित होतो. तो गणवेश, बूट, टाय, आणि स्कूल बस ह्यांचे खूप आकर्षण होते. पण शाळेत शिरतांना मात्र आईचा हात सोडून टीचरचा हात धरून वर्गात जातांना रडू फुटले होते. पाहिले तर सगळ्या वर्गात तार स्वरात सगळेच भोकाड पसरून रडत होते तेंव्हा बाईंनी इतक्या हळुवारपणे सगळ्यांना गप्प केले. नक्कीच त्यांची धावपळ झाली होती पण थोडक्यातच रडण्याचा कार्यक्रम आटोपला. तेंव्हापासून ह्या शाळेशी आमचे अतूट नाते जमले. आपल्या शाळेतील गुरुजन इतक्या हसतमुखाने आणि आपुलकीने समजावतात की आपले रडणे, आपले प्रोब्लेम कुठल्या कुठे पळून जातात. दरवर्षी इतकी मुले त्यांच्या हाताखालून जातात, पण त्यांना सगळ्यांची नांवे, सगळ्यांच्या सवयी तोंडपाठ असतात. खरच त्यांना इतकी माया कुठून येते?

जसे मोठे होत गेलो तसे तर शाळा इतकी आवडायला लागली की घरी करमेना. दोस्त मंडळी जमली. स्नेहबंधन निर्माण झाले. शाळेचे पटांगण, लायब्ररी, बाग, फुले, माळीदादा, शिपाईदादा, मावशी, सगळ्या टीचर ह्यांच्याशी छान नाते जुळले.

आपल्या आर के जोशी विद्यालयचे खरे वैशिष्ठ म्हणजे ह्या शाळेने अभ्यासाबरोबर खेळ आणि अभिनय, वक्तृत्व, धाडसी व्यक्तिमत्व निर्माण ह्या सर्वांमध्ये आपल्याला प्रवीण केले. म्हणूनच ह्या शहरात आपल्या शाळेचे नाव “मुलांच्या सर्वांगीण विकासाची शाळा” असे लोकं घेतात.

आम्हाला आता पुढच्या प्रवासाला जातांना अभिमानाने आमच्या शाळेचे नाव घ्यायला आवडेल. आम्ही इथे लहानाचे मोठे झालो, आता आमचे जहाज जीवनाच्या मोठ्या शाळेत प्रवास करील. पण बरोबर शाळेने दिलेल्या ज्ञानाची शिदोरी असेल. बंदरावरच्या दीपस्तंभांप्रमाणे इथे मिळालेली शिकवण आम्हाला मार्ग दाखवेल. आम्ही नक्कीच असे काम करू ज्यायोगे आर के जोशी विद्यालयची मान उंचावेल.

आज शाळा सोडताना पहिल्या दिवसासारखे भोकाड तर नाही पसरवता येत पण अश्रु तर नक्कीच आले आहेत. ह्या मायाळू आईचा हात सोडून अश्रू पुसून, जीवन सागरात प्रवेश करीत आहोत. आमच्या पाठीशी तुमचे आशीर्वाद नक्कीच असतील ही खात्री आहे. धन्यवाद.

Click Here for the Full List of Essays on Marathi.TV

Farewell Speech by Students of Class 10 in Marathi / Few Lines

Nirop Samarambh Marathi Kavita / निरोप समारंभाचे भाषण Nibandh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *