Importance of Marathi Language in Marathi

मराठी भाषा दिन : माझी मराठी कौतुके ,अमृताशीही पैजा जिंके

“सैराट” ह्या सिनेमाने १०० कोटी रूपयांचा धंदा केला आणि साऱ्या भारताचे लक्ष मराठी भाषेकडे वळले. तो पर्यंत बहुतेक लोक “मराठी आती नाही” म्हणून आपल्याला मुद्दाम हिंदी अथवा इंग्लीश मध्ये बोलायला लावत होते. आत्ता परवाची गोष्ट … एका कॉल सेंटरला फोन केला आणि भाषेच्या पर्यायात मराठी सांगून सुद्धा तो मला म्हणाला “हिंदी में बात किजीये”. मला सर्व कहाणी परत हिंदी मध्ये सांगावी लागली. अशी वाईट स्थिती का यावी आपल्या इतक्या समृद्ध भाषेला? आपल्याला आपली भाषेचा काहीच अभिमान नाही आहे का? का आपली अस्मिता, अभिमान गळून पडला आहे? की आपण आपल्या पूर्वजांचे नाव सांगायला लायक नाही आहोत?

तसे पाहायला गेलो तर हल्ली पूर्वजांच्या नावावरच शेखी मिरवत राजकारणाचा धंदा जोरात चालला आहे. त्यांच्या मोठ्या मोठ्या बोर्ड वर त्यांच्यापुढे आपले फोटो लावून, त्यांच्या नावाने ढोल ताशे बडवून, मिरवणुका, वर्गणी काढून समारंभ साजरे केले जात आहे, ते सुद्धा कशासाठी…तर एखाद्या गल्लीतील नगरसेवक ते आमदार ह्या प्रवासासाठी! सगळे काही उथळ आणि बेगडी झाले आहे. असेच सुरु राहिले तर एक पुरोगामी आणि सुसंस्कृत राज्याची आपली ओळख पुसली जाऊन एक मागासलेले, दहशतवादी राज्य अशीच आपली ओळख निर्माण होईल.

मराठीची थोर परंपरा

“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी” असे फक्त गाणे म्हणायचे. आणि व्यवहारात ८० ते ९० टक्के इंग्लीश बोलायचे. ह्या पार्श्वभूमीवर काही इतर राज्यांचे उदाहरण घ्या … तुम्ही जर दक्षिण भारताच्या सहलीला गेलात तर तिथे कोणीही तुमच्याशी तुमच्या भाषेत तर सोडाच हिंदी भाषेत पण बोलणार नाही. आपल्याला नारळ पाणी मागायचे तर ‘कोकोनट वाटर’ सांगावे लागते. आपल्याला आधी आपण मराठी आहोत हेच सांगायला लाज वाटते. “मी शिवाजीराजे भोसले बोलतोय” ह्या सिनेमात ह्यावर चांगलेच प्रबोधन केले आहे. सिनेमात काम मिळण्यासाठी पंजाबी नाव घेण्याची गरज काय ? जेथे सिनेमाची सुरुवात दादासाहेब फाळके ह्या थोर मराठी कलावंताकडून झाली, जेथे नूतन, सुलोचना, दुर्गा खोटे, चिटणीस भगिनी, उर्मिला मातोंडकर, माधुरी दीक्षित ह्यांनी सिने सृष्टीत आपले मनाचे स्थान निर्माण केले तेथे ही स्थिती?

मराठी भाषेला एक थोर परंपरा आहे. ती अतिशय जुनी भाषा आहे, तिचे मूळ संस्कृत असले तरी तिच्यावर इंडो-आर्यन, इंडो-इरानियन आणि द्रविडीयन भाषेचा साज चढून ती आणखी समृद्ध झाली आहे. तिचा मुळचा गोडवा आणखी वाढला आहे. महाराष्ट्रासहित जेथे जेथे मराठ्यांनी पराक्रम गाजवून प्रदेश पादाक्रांत केले तेथे तेथे मराठी बोलली जाते. दक्षिणेला बेळगाव, तंजावर, हैदराबाद, होळकरांनी जिंकलेला मध्यप्रदेश, गोवा, गुजरात, दमन, दिव, दादरा, नगर हवेली आणि छत्तिसगड इतक्या ठिकाणी ही भाषा बोलली जाते.

मराठी…एक समृद्ध भाषा

राजाश्रय मिळाला की कला बहरतात. त्यामुळे राजांमुळे मराठीमध्ये भविष्य, औषधी, पुराण, वेद ह्यांचे साहित्य निर्माण झाले. वेदांचे, नळ दमयंती स्वयंवर, गीता ह्यांचे मराठी म्हणजे प्राकृत भाषेत भाषांतर होऊन सामान्य जणांना ह्यांची ओळख झाली. चक्रधर स्वामी, ज्ञानेश्वर, ह्यांचे योगदान मोठे आहे. तसेच नामदेव एकनाथ, मुकुंदराज आणि तुकाराम ह्यांनी प्रचंड साहित्य निर्माण करून सामान्य लोकांना ज्ञान देण्याचे कार्य केले.

जसे राज्यकर्ते बदलले तशी मराठी भाषा नवा साज ल्यायला लागली. त्याच्यावर पर्शियन, उर्दू, हिंदी इत्यादी भाषांचे संस्कार झाले. मोडी लिपी जाऊन देवनागरी लिपी आली. वामन पंडित, रघुनाथ पंडित, मुक्तेश्वर, मोरोपंत, ह्यांनी काव्य लिहिली आणि होनाजी बाळा आणि राम जोशी ह्यांनी लावण्या लिहिल्या.

गंमत म्हणजे एका ब्रिटीश मिशनरीने, विलियम कॅरे ह्याने मराठी शब्दार्थ लिहिला आणि कॅप्टन जेम्स थॉमस आणि थॉमस कॅन्डी ह्याने १८३१ मध्ये मराठी ते इंग्लिश डिक्शनरी तयार केली. त्याच काळात साहित्यिकांची मांदियाळी सुरु झाली. लोकमान्य टिळक, आगरकर, ह.ना.आपटे,, रा.ग.गडकरी, कुसुमाग्रज, ग.दि. माडगूळकर, गोविंदाग्रज, विष्णुशास्त्री चिपळूणकर, महात्मा फुले, न.ची. केळकर, ना. सी. फडके, प्र. के. अत्रे, वि.स. खांडेकर, पु.ल. देशपांडे, मामा वरेरकर, देवल, आणि किर्लोस्कर ह्यांनी लेख, काव्यसंग्रह, नाटके, कादंबर्या लिहून मराठी भाषा खूप समृद्ध केली. ह्याच वेळी ब्रिटीश सत्ते विरुद्ध ह्या लेखकांनी आपल्या साहित्याद्वारे जन जागृती केली, संगीत नाटके, त्यातील गीत हि त्यावेळच्या भारताच्या परिस्थिती वर अवलंबलेली होती. स्वात्यंत्रवीर सावरकरांनी तर आपल्या धगधगत्या लेखणीने कितीतरी क्रांतिवीर निर्माण केले. आजही त्यांची गीते ऐकल्यावर स्फुरण चढते. ग.दि.मांचे ‘गीत रामायण’ म्हणजे वाल्मीकिच्या तोडीचे सुमधुर असे काव्य होते.

कितीतरी सांगता येतील असे थोर साहित्यिक आपल्या मराठीत आहेत. नवीन लेखकांमध्ये जी. ए. कुलकर्णी, रत्नाकर मतकरी, श्री.न.पेंडसे, पु.भा. भावे, रणजीत देसाई, शिवाजी सावंत, शास्त्रीय लेखक जयंत नारळीकर, विनोदी लेखक अ.वा.वर्टी, वि.आ.बुवा, चिं.वि. जोशी, दलित लेखक, नामदेव ढसाळ, जोगेंद्र कवडे, दया पवार, राजा ढाले इत्यादींनी खूपच समृद्ध केली.

मराठी भाषेत वर्हाडी, मालवणी, कोंकणी, अहिराणी असे कितीतरी प्रकार आहेत. त्यांची एक अनोखी गोडी आहे. त्या भाषांची बोलण्याची वेगळीच लय आहे आणि अफाट शब्द भंडार आहेत. असे असतांना आपण हि परंपरा विसरलो आहोत असे वाटते. जरी हल्लीच्या सिनेमाना कथानक तगडे मिळत आहे तरी लेख निबंध ह्यातील भाषेचा गोडवा आणि रचनेतील श्रीमंती कुठे तरी हरवली आहे असे वाटते. ग.दि. . मांच्या प्रासादिक लेखणीची कुठेच परंपरा होत नाही आहे. कारण हळूहळू आपण वाचन संस्कृती विसरलो आहोत, जे कांही आहे ते “सोशल मिडिया” वरून उसने घेण्याकडे प्रवृत्ती वाढली आहे.

नोकरी धंद्यासाठी इंग्लीश चांगले यावे म्हणून हल्लीची आणि या आधीची पिढी इंग्लीश मीडियम मधून शिकली. त्यांचाच शब्दसंग्रह तोकडा असेल तर पुढच्या पिढीला ते काय शिकविणार. एकदा असाच इंग्लीश मीडियम वाला मुलगा मला मराठीच्या कौतुकाची शेखी मिरवायला लागला. मी फक्त त्याला “एकसमयावच्छेदेकरून” एव्हडे एका दमात म्हणायला सांगितले तर त्याची बोबडी वळली. १००% साक्षरता असलेल्या केरळातला नारळ वाला पण मलयालम मनोरमा वाचत असतो, दुसरा दाक्षिणात्य दिसला की लगेच मातृभाषेत बिनदिक्कतपणे बोलायला लागतात पण आपण मात्र आपल्या साहित्यापासून दूर चाललो आहोत.

हेय सगळं थांबवायला यासाठी आपण काय करू शकतो? आपण जसे शाळांमध्ये अवांतर डेविड कॉपेरफिल्ड सारखी पुस्तके ठेवतात तसेच मराठीची पण अवांतर अभ्यासाला पुस्तके ठेवावी. बालवयात वाचलेली पुस्तके आयुष्यावर खूप परिणाम करतात. लायब्ररीमध्ये मराठी पुस्तके ठेवावी. जुनी मासिके चांदोबा सारखी पुन्हा चालू करावी आणि कॉमिक्स सुरु करावी. आजच्या लेखकांनी बाल साहित्य वाढवावे. म्हणजे हे वाचून आजच्या मुलांमधून पण सावरकर, खांडेकर, दया पवार जन्माला येतील. येता जाता रिक्षावाला, गल्लीतला चहावाला ह्याच्याशी आवर्जून मराठीतच बोला. मराठी चित्रपट, नाटकं पैसे खर्च करून बघा, ज्याने आपल्या मराठी कलावंतांना अधिक वाव मिळेल.

आपली भाषा टिकवण्याची जबाबदारी आपल्या वरच आहे …नाहीतर “मी तुला कॉल करते, तू त्यांच्याशी डिस्कस कर” असेच मराठी काही दिवसात ऐकायला लागेल. आणि Facebook, WhatsApp आहेच.. LOL, OMG वगैरे लिहायला.

Marathi Bhasha Divas Greetings, Status, Nibandh