Skip to content

Request Letter in Marathi, Vinanti Patra Lekhan | Request Format PDF

Request Letter Patra Marathi

Request Letter in Marathi

Patra Lekhan : Example 1 – Checkbook Passbook Request Letter in Marathi Language

प्रति,
बँक व्यवस्थापक,
मा. बँक ऑफ महाराष्ट्र,
शिवाजीनगर, पुणे.
दिनांक – १७.०२.२०२०.

विषय :- नवीन चेकबुक आणि पासबुक मिळणे बाबत

महोदय,

मी आपल्या बँकेचा एक जुना खातेधारक असून २०१० पासून माझे चालू खाते आपल्या बँकेच्या शिवाजीनगर शाखेमध्ये आहे. माझा कपड्यांचा व्यापार आहे आणि त्यासाठी लागणारे सर्व व्यवहार हे आपल्या बँकेच्या खात्यातूनच होतात. माझे सर्व व्यवहार हे सरकारी नियमानुसार कॅशलेस असतात आणि म्हणूनच मला सतत बँक व्यवहार करावे लागतात.

कॅशलेस व्यवहारामुळे माझे अधिक काम हे चेक द्वारे होत असते, त्यामुळे मला चेक ची आवश्यकता सतत भासत असते. सध्याचे असणारे माझे चेकबुक हे फक्त २५ चेक चे आहे आणि आता त्यामध्ये ५ हुन कमी चेक बाकी राहिले आहेत. त्यामुळे या अर्जाद्वारे मी तुम्हाला नवीन चेकबुक मिळावे यासाठी विनंती करत आहे, जेणेकरून लवकरात लवकर नवीन चेकबुक मिळाले तर माझे व्यवहार थांबणार नाहीत. तसेच याबरोबर मी तुम्हाला अधिक चेक असणाऱ्या चेकबुकची मागणी करू इच्छितो, ज्यामध्ये १०० किंवा त्याहून अधिक चेक असावेत. तसे झाल्यास आपल्या दोघांसाठी जास्त योग्य असेल ज्यामुळे आम्हला सतत आपल्याला विनंती करून त्रास द्यायची गरज भासणार नाही आणि आमचे व्यवहारही थांबणार नाहीत.

अधिक चेक असणाऱ्या चेकबुक साठी काही वेगळ्या प्रक्रियेची गरज असल्यास किंवा अधिक कागदपत्रे लागत असल्यास कृपया आम्हाला कळवावे, आम्ही ते सर्व लवकरात लवकर आपल्याला पुरवू.

माझी दुसरी विनंती ही अधिक पानांच्या पासबुक साठी आहे, चेकबुक प्रमाणेच पासबुकची देखील आम्हाला नितांत आवश्यकता असते चालू खाते असल्यामुळे आम्हाला सतत पासबुक अपडेट ठेवावे लागते. आमचा व्यापार असल्यामुळे व्यवहाराशी संबंधित असणाऱ्या सर्व गोष्टी आम्हाला अगदी नीट आणि सर्व व्यवहार स्वच्छ ठेवणे गरजेचे असते. या सर्व गोष्टींमध्ये पासबूकचा खूप मोठा वापर आणि मदत आम्हाला होते. सर्व व्यवहार कॅशलेस आहेत म्हणून तर पासबूकला अति महत्व आहे.

आमचे सध्याचे असणारे पासबुक हे आता संपत आलेले असून चेकबुक प्रमाणेच जास्त पानांचे असणारे पासबुक मिळावे यासाठी मी तुम्हाला विनंती करत आहे. जेणेकरून आमचा सर्व व्यवहार नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होईल. यासाठी देखील आणखी काही प्रक्रियेची गरज असल्यास कळवावे.

दोन्ही गोष्टी लवकरात लवकर मिळाव्यात अशी आशा करतो, आपल्या सकारात्मक उत्तराची आशा करतो.

नाव – श्री. प्रमोद प्रभाकर शुक्ल
खाता क्रमांक – ५२६३९८७०००२५३२८
ध्वनी क्रमांक – ८९५६८५६२३५
ई-मेल – Pramshuks92838221@searchisvs.com

आपला विश्वासू,
प्रमोद प्र. शुक्ल

Example 2 – Letter to Principal in Marathi / Request Letter to College Format

प्रति,
मा. प्राचार्य
वि. भू. कामत महाविद्यालय,
कोल्हापूर.
दिनांक – १०.०२.२०२०

विषय :- महाविद्यालयात विविध नवीन साहित्य मिळणे बाबत

महोदय,

मला आपणास कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे कि, आपल्या महाविद्यालयातले अनेक विद्यार्थी कला, क्रीडा, खेळ अनेक क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहेत. सर्वच स्पर्धांमध्ये अत्यंत उत्स्फूर्त सहभाग घेऊन विविध स्तरावर ते आपल्या महाविद्यालयाचे नाव उंचावत आहेत. अनेकांनी तर जिल्हा स्तर, विभागीय स्तर आणि राज्य स्तरावर आपली पताका उंचावली आहे. सर्वच क्षेत्रात अव्वल असणारे आपल्या जिल्ह्यातील आपले महाविद्यालय हे एकमेव आहे.

हे सर्व यश मिळवताना आपल्या महाविद्यालयातून पुरवल्या जाणाऱ्या सर्व सुविधांचा विद्यार्थ्यांना होणार लाभ खूप मोठा आहे आणि त्यांच्या यशात या सुविधांचा हात आहे. जसे खेळाडूंसाठी खेळाचे साहित्य, उत्तम रित्या सांभाळलेले आपले खेळाचे मैदान, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयातली पुस्तके, अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका आणि आपली प्रयोगशाळा अशा अनेक सुविधांमधून विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि साधने मिळत आहेत. या सर्व सुविधा आम्हाला उपलब्ध करून दिल्या याबद्दल सर्व विद्यार्थ्यांकडून मी आपले आभार मानतो.

परंतु या बरोबरच महाविद्यालयाचा विद्यार्थी सचिव म्हणून या अर्जाद्वारे मी आपले लक्ष काही बाबींकडे वेधू इच्छितो. आपल्याकडे सुविधा आहेत परंतु त्यामध्ये काही साधनांची आता आवश्यकता भासू लागली आहे. आपल्या महाविद्यालयातले विद्यार्थी आता अनेक पातळीवर नाव कमावू लागले आहेत आणि आता त्यांची बौद्धिक, शारीरिक पातळी उंचावू लागली आहे त्यामुळे आपल्याला देखील त्याप्रमाणे सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे असे आम्हाला वाटते, म्हणूनच त्या आपण आम्हाला उपलब्ध करून द्याव्यात अशी आम्ही विनंती करत आहोत.

इतर महाविद्यालयाच्या स्पर्धेत आपल्या महाविद्यालयाचे नाव कायम राखण्यासाठी आपल्याला खेळात सुद्धा अव्वल राहणे गरजेचे आहे. आपला क्रिकेटचा संघ अतिशय उत्तम कामगिरी करत आहे आणि उपलब्ध असणाऱ्या क्रिकेटच्या सामानात सराव करून त्यांनी आंतर महाविद्यालय स्पर्धेत विभागीय स्तरावर धडक मारली आहे. परंतु पुढे जाण्यासाठी त्यांना अजून एक उच्च दर्जाच्या क्रिकेट किट ची आवश्यकता आहे. ह्या अधिकच्या क्रिकेट किट ने खेळाडू आणखी नीट रित्या सराव करू शकतात व आपला संघ राज्यस्तरावर नक्कीच विजयी होईल याच मला खात्री आहे.

तसेच आपल्या ग्रंथालयात असणारी अभ्यासक्रमाची काही पुस्तके जुन्या आभ्यासक्रमची आहेत आणि आता अभ्यासक्रम बदललेला आहे त्यामुळे सध्याच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असलेल्या पुस्तकांची आता आपल्याला गरज आहे. सामान्य ज्ञानाशी संबंधित अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्यामुळे त्यावरील पुस्तकांची असणारी उपलब्धी कमी पडत आहे, तरी अजून पुस्तके उपलब्ध व्हावीत ही विनंती ज्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक आणि आताची असणारी पुस्तके फायद्याची ठरतील.

रसायनशास्त्रात विविध प्रयोग करून काहीतरी नवीन करण्याचे ध्येय असणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांकडे आपण लक्ष केंद्रित करावे असे मला वाटते. सध्या उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून त्यांनी अनेक आविष्कार केले आहेत, तसेच विविध विज्ञान प्रदर्शनात यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे. जर त्यांना आधुनिक साहित्य उपलब्ध झाले तर ते नक्कीच आपले नाव अजून पुढे घेऊन जातील. तसेच सर्व साहित्य हे काचेचे असल्यामुळे ते नीट ठेवण्यासाठी आपल्याला काही भक्कम स्टॅन्ड आणि कपाटाची आवश्यकता आहे ज्यामुळे त्यांचे नुकसान होणार नाही.

आपल्या महाविद्यालयात गरजेच्या असणाऱ्या सर्व साहित्याची यादी या पात्रांसोबत जोडलेली आहे, आणि त्याचे वर्गीकरणही केलेले आहे. तरी ही सर्व साधने आम्हाला लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावीत अशी मी नम्रतापूर्वक आपल्याला विनंती करतो.

आपला विश्वासू सचिव,
सुहास कुलकर्णी.

Request Letter Format

1 thought on “Request Letter in Marathi, Vinanti Patra Lekhan | Request Format PDF”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *