Skip to content

Ghadyal Naste Tar Essay in Marathi | Nibandh घड्याळ नसते तर निबंध

marathi lekh clock

Ghadyal Naste Tar Essay in Marathi

घड्याळ नसते तर निबंध

काल आमची सखुबाई मला विचारात होती” ताई किती वाजले?” मी म्हंटले “अग, तुला घड्याळ पण कळत नाही? कुठल्या काळात वावरते आहेस?”ती म्हणाली” ताई ,आमचं काहीही बिघडत नाही घड्याळ नसले तरी. आम्ही सुर्वेनारायण (सूर्य नारायण)उगवला कि कामाला लागतो आणि मावळला कि झोपी जातो. मग कशाला घड्याळ लागेल? “तिने मलाच वेड्यात काढले. “पण मग कामावर कशी वेळेवर जाते सगळी कडे?” मी पण हट्टाला पेटले. “अवं ताई, आमचं ठरलेलं असत एव्हड्या कामाला एव्हडा येळ. मग बरोबर जमत. ” टाइम मॅनेजमेंट शिका हिच्याकडून. खरंच मी पण विचार करू लागले, काय झाले असते जर घड्याळ नसते तर?हिचं कांही अडत नाही, पक्ष्यांचं काही अडत नाही, आमच्या डॉगीला बरोबर कळत फिरायला जायची, खायला द्यायची वेळ. मग अडते कुणाचे? का आम्ही घड्याळाकडे बघत बघत धावपळीचे जीवन जगतो?
आमची पिढी नुसता कल्पना विलास करत बसत नाही. प्रत्येक गोष्टीचे pros आणि cons बघूनच आपले मत ठरवतो.

मग विचार केला pros काय आहे?घड्याळ नसते तर आपल्याला कुठलीच गोष्ट वेळेवर करता आली नसती. सगळे जग थांबून गेले असते. बसेस,रेल्वे,विमाने धावली नसती किंवा खूप मोठा गोंधळ उडला असता आणि बसेसच्या, रेल्वेच्या आणि विमानांच्या टक्करी होऊन खूप मोठी प्राणहानी झाली असती. आणि कुणी कुणाला वेळेवर भेटले नसते. त्यामुळे दोन जीवांचे, दोन व्यक्तीचे, दोन राष्ट्रांचे नाते तुटले असते. युद्ध झाले असते. शास्त्र काहीच विकसित झाले नसते. एका नॅनो सेकंद मध्ये उडणारा कृत्रिम उपग्रह, मध्य रेल्वे सारखा पच्चीस मिनिट देरिसें आ रही है अशी अनाउन्समेंट करीत उडला असता आणि अवकाशात स्फोट होऊन पृथीवर आदळला असता. विश्वाचे कुठलेच कोडे उलगडत आले नसते.

विकास नाही म्हणजे नोकरी नाही आणि ऑफिस नाही म्हणजे कुणीही आमच्या सखुबाई सारखे केव्हाही ऑफिस ला आले असते आणि गेले असते. काहीच काम झाले नसते. मग भा.रा.तांबेंच्या कवितेसारखे ‘सूर्य उगवतील चंद्र झळकतील, तारे आपुला क्रम आचरतील” असे पाषाण युग अवतरेल. तेथे दिवस रात्रीला काही अर्थच उरला नसता. मग आठवडे नसते, महिने नसते आणि वर्ष पण नसते.

विमानाने मुंबई हुन इंग्लंड अमेरिकेला जाताना आपले घड्याळ मागे करावे लागते. पण जर घड्याळच नसते तर विमानाचं उडले नसते. आणि सगळे विश्व दुरावत गेले असते. ग्लोबल म्हणजे काय कुणालाच कळले नसते. प्रत्येक वेळेला सूर्य, तारे किंवा झाडाच्या सावलीवरून कुठली घटिका चालू आहे हे बघावे लागले असते. पावसाळ्यात तर ते हि नाही. म्हणजे चार महिने सगळे घरात. हो आणि घटिका वरून आठवले. घटिकापात्रात कीडा अडकला आणि मुहूर्त टळला म्हणून लीलावतीचे लग्न झाले नाही. आणि भास्कराचार्यानी तिला महान गणिती बनविले. घटिकापात्र म्हणजे त्यावेळचे घड्याळच की! ते नसते तर लीलावती सुखी संसारी बाई झाली असती आणि भारत एका महान गणितज्ञ महिलेला मुकला असता.

आता cons बघू. घड्याळ नसते तर आपण पूर्वीसारखे शांत ,निरामय जीवन जगलो असतो. धावपळ नाही, गडबड नाही. उशीर झाला म्हणून शिक्षा नाही. उशीर झाला म्हणून बस ,रेल्वे ,लोकल चुकणे नाही. त्यामुळे होणार मनस्ताप नाही, त्या अनुषंगाने येणारे ब्लडप्रेशर नाही. हार्ट अटॅक नाही. स्ट्रेस नाही. माणूस विज्ञान शिकला. त्याने शोध लावले. आश्चर्य जनक शोध लावले. अफाट विश्वाचे कोडे उलगडले. अणूच्याहि आतील नॅनो कण शोधले. त्यातून कुठल्याही आजारावर औषधे शोधली. अवघड शस्त्रक्रिया केल्या. पण ह्यातून काय साधले ? लोकांचे प्राण वाचले की बॉम्ब ने लोकांचे प्राण घेतले? तेही घड्याळ लावूनच ना? जग जवळ आले पण स्पर्धा पण तितकीच वाढली.

सुखाच्या मागे धावताना आपण घड्याळाचे किती गुलाम झालो आहोत हे लक्षातच आले नाही. उर फुटेस तोवर धावून आपण शेवटी काय कमावतो? वेळेवर पोहोचायचे म्हणून किती जण लोकल, बस खाली सापडून मरतात? पंगु होतात. कालगणना कालही होती आणि आजही आहे. पूर्वी सूर्याच्या सावलीवरून काल मोजायचे हे आपण जंतरमंतर ,दिल्ली येथे पाहीले आहे. त्यावरून गणिती पद्धतीने आपल्या ऋषि मुनींनी अवकाशाची लांबी रुंदी, ग्रहांचे अंतर, प्रदक्षिणेला लागणार वेळ, ग्रहणे ह्याचा आजच्या काळाशी तोडीस तोड शोध लावलाच होता न? मग का आपण एव्हडे गुलाम झालो त्या टिकटिक वाजणाऱ्या यंत्राचे.

हेच मला म्हणायचे आहे. यंत्राचे गुलाम न होता यंत्राला गुलाम करा. मग ते यंत्र असले काय अन नसले काय!

Click Here for the Full List of Essays on Marathi.TV

Composition Ghadayal Naste Tar Marathi Wikipedia Language

1 thought on “Ghadyal Naste Tar Essay in Marathi | Nibandh घड्याळ नसते तर निबंध”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *