Skip to content
Home » Essay in Marathi Language » Mazi Sahal Essay in Marathi, Aamchi Sahal, Me Keleli School Picnic

Mazi Sahal Essay in Marathi, Aamchi Sahal, Me Keleli School Picnic

Aamchi Sahal Essay in Marathi Language Nibandh

Mazi Sahal Essay in Marathi Language

Aamchi Sahal Essay in Marathi : समुद्रकिनारी सहल निबंध

घाटावर राहणाऱ्या लोकांना समुद्राचे एक अनामिक आकर्षण असते. त्याचा अथांगपणा गावाच्या नदीत पाहायला मिळत नाही. त्याचे क्षितिजापर्यंत पसरलेले गूढ अस्तित्व आणि आणि किनाऱ्यावर आदळणाऱ्या फेसाळ लाटा एक हुरहूर लावून जाते. त्यामुळे आयुष्यात एकदा तरी समुद्रकिनारी राहावे आणि त्याच्या लाटांमध्ये डुंबावे अशी प्रत्येकाला इच्छा असते. त्यामुळे आम्ही तीन कुटुंबांनी गुहागरला एका मैत्रिणीचे घर होते तिकडे जायचे ठरविले.

कोकणात जायचे म्हंटले की सगळ्यांना उत्साह येतो आणि कधी कुठे वाचलेल्या वर्णनाची प्रत्यक्ष अनुभूती घ्यायला मिळणार म्हणून मनात मांडे खाणे सुरु होते. गोमू माहेराला जाते हो नाखवा, हिच्या घोवाला कोकण दाखवा हे गाणे गात अशी आमची सहल ठाण्याहून कोकणात निघाली. शहर मागे मागे पडत गेले. हळूहळू पनवेल नंतर ठाणे जिल्हा जाऊन रायगड जिल्हा सुरु झाला आणि कोकण खुणा दिसायला लागल्या. तसे ठाणे-मुंबईत पण नारळी पोफळीची झाडे आहेत. वसईला पण गोव्याचा आभास होतो पण इथला निसर्ग आणि ती झाडे काही वेगळीच छटा लेऊन उभी होती. जणू आपली लांब लांब पाने हलवून आम्हाला येवा कोकण आपलाच असो असे म्हणत आमचे स्वागत करीत आहेत असे वाटत होते.

इथे एक लक्षात आले की, कोकणात जाणारा मुख्य रस्ता एकदम साफ होता. जणू आता कोणीतरी झाडून गेल आहे. रस्त्याच्या बाजूला मोठी घेरेदार आंब्या फणसाची झाडे दोन्ही बाजूनी नैसर्गिक कमान करून उभी होती. मैल अर्ध्या मैलावर एक चंद्रमौळी घर आणि स्वच्छ अंगणात तुळशी वृंदावन दिसत होते. कुठेही कचरा नसल्याने त्यवर पोसले जाणारे माशा, डास, कुत्री ह्यांचा पसारा नव्हता. त्यामुळे जातानाच खऱ्या अर्थाने निसर्गाच्या कुशीत जात आहोत असे वाटले.

कोकणी मनुष्य काटकसरी आहे त्यामुळे वस्तू जुनी झाली म्हणून फेकून देण्याचा माज त्यांच्याकडे नसावा. आम्ही उन्हाळ्यात गेलो होतो तरी वातावरण आल्हाददायक होते.आणि हो ! रस्त्यावर चक्क आंबे पडले होते छान पिकलेले आणि गारसलेले, पण कोणी त्यांच्यावर तुटून पडत नव्हते. फणसाला चक्क लहान मुलाच्या हाताला लागतील एवढ्या उंचीवर रसाळ फणस लागले होते. खावी का असा विचार आला आमच्या मनात पण ड्रायव्हरने लगेच सांगितले “हे बरक्या फणसाचे झाड आहे. तुम्हाला तो फणस खाता येणार नाही. घशात अटकेल. उगीचच मोह नको” तेंव्हा आम्हाला कळले की फणसाच्या दोन जाती आहेत. कापा आणि बरका. कापा म्हणजे जो आपण नेहमी खातो तो! बरका म्हणजे नुसता गिळायचा, बरका!

वाटेत मातीच्या हॉटेलवर थांबलो. आणि मस्त थंडगार पन्हे, ताक, कोकम सरबत अशा रुचकर पेयांने मन तृप्त करून घेतलं. शेणाने स्वच्छ सरविलेल्या जमिनीवर हातपाय ताणून बसलो आणि त्या चंद्रमौळी कौलारू घरात आतमध्ये आंबोळ्या करणे चालू होते तेंव्हा विचारले की आम्हाला पण मिळतील का? तेंव्हा अगत्याने घरमालक कम हॉटेल मालकाने “होय” असा होकार दिला.मग काय! तिथेच भरपूर नाश्ता केला आणि निघालो.

गुहागर हे पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे कारण इथे प्रत्येकाच्या घरापुढे त्यांचा स्वत:चा समुद्रकिनारा आहे. त्यामुळे येथील लोकांनी घराचेच टुरीस्ट ¬हाउस केलेले आहे. चौसोपी घराच्या लहान लहान खोल्या काढून त्या ते भाड्याने देतात. मैत्रिणीचे घर होते म्हणून आम्हाला फार त्रास नाही पडला. नाहीतर ‘सिझन’ मध्ये इथे बुकिंग फुल असते.

घरी गेल्याबरोबर कोकम सरबताने आमचे स्वागत झाले. इथे प्रत्येक घरचे कोकम सरबत वेगळ्या चवीचे असते. जेवणाची वेळ झालीच होती म्हणून आधी पोटोबा करून घेतला आणि लगेच घराच्या पाठीमागेच समुद्राच्या लाटांची खळखळ कानी आली. आम्ही ताबडतोब तिकडे धावलो. अगदी चार पावले चालून जात नाही तर काठाची मऊ ,लुसलुशीत वाळू पायाला गुदगुल्या करायला लागली. आणि समोर अथांग सागर! एकदम मंत्रमुग्ध झाल्यासारखे वाटले. ‘अॅलीस ईन वंडरलॅंड’ मधल्या अॅलीस सारखी अचानक समोर नवीन जग खुले झाल्यासारखे वाटले.

उंच उंच नारळीच्या झाडांमधून नागमोडी वाटेने आम्ही समुद्रकिनारी गेलो. वॉव! एकदम निरव शांतता, फक्त समुद्राच्या गाजेचा घनगंभीर उफाळता आवाज आणि दुसरे काही नाही. लाटांचा तो गूढ खळाळता आवाज मोहिनी घालणारा होता. असा आवाज आमच्या नदीला पूर आला की यायचा. आम्ही पुढे गेलो. अगदी आतपर्यंत गेलो, पाण्यात शिरलो. ज्यांना पोहता येत होते ते पोहायला गेले आम्ही किनाऱ्यावर लाटांच्या गुदगल्या झ्लात बसलो, हो अगदी फतकल मारून पाण्यात बसलो.कारण चौपाटी सारखे कोणी बघायला नव्हते. अगदी खाजगी बीच असल्याने मनमुराद पाण्यात खेळलो. पाण्याबरोबर शिंपले येत होते त्यातून नाजूक कलाकुसर केलेले शिंपले गोळा केले. रंगीत खडे गोळा केले. तितक्यात एक खेकडा आडवा आडवा चालत चालत आला आणि आमची दाणादाण उडाली कारण आम्हाला वाटले पाण्यात बसल्यावर ते आमच्या अंगावर चढले तर. मग त्या घरातील काही माणसांनी आम्हाला आश्वस्त केले की ते आमच्या वाटेला नाही जाणार. हो, आम्ही कुठे खेकडे खातो? मग आम्हाला कशाला पकडतील? पण भयंकर मोठे होते खेकडे.

एव्हाना संध्याकाळ होत आली होती आणि क्षितिजावर सूर्य हळूहळू डुबू लागला होता. जसा जसा तो खाली जात होता तसा तसा मोठा लाल गोळा दिसत होता आणि लाटांवर लाल रंगांची उधळण करीत होता. आता समुद्राचा पण आवाज काहीसा शांत वाटत होता. फक्त किनाऱ्यावर आपटणाऱ्या लाटांचा आवाज येत होता. पुढची लाट आपटली की मागे सरत होती आणि मागची तिच्यापेक्षा मोठा आवाज करीत पुढे येत होती. आणि फेसाची झालर पसरत होती.

हे बघताना मला स्वामी कादंबरीतील उतारा आठवला ज्यात माधव्रराव पेशवे रमाबाई ला म्हणतात, “प्रियकर सागराची धरतीला न मिळता येणारी हतबलता आणि आतुरता बघ. त्या सागराच्य वेदना बघ.” ते मला मनोमन पटले. जड अंत:करणाने आम्ही परत फिरलो. रात्री मुद्दाम मऊ भात म्हणजे काय ते पाहावे म्हणून तोच करायला सांगितला. सुंदर वासाचा मऊ भात, आमटी, तूप आणि लिंबाचे लोणचे असे सात्विक पण रुचकर जेवलो आणि रात्री समुद्राची गाज ऐकत झोपलो. सकाळी पुन्हा समुद्रावर मनसोक्त हुंदडलो, आणि मग जड अंत:करणाने परतीच्या प्रवासाला निघालो. पण सारखे वाटत होते समुदा बोलावतो आहे. मग ठरविले दर्याकीनारे बंगलो जरी नाही मिळाला तरी वर्षातून एकदा समुद्राला भेटायाल जायचे.

Click Here for the Full List of Essays on Marathi.TV

Me Keleli Sahal :: My Picnic Essay in Marathi, School Picnic Composition

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *