Skip to content
Home » Tips Information in Marathi » Autobiography of a Flower in Marathi | फुलाचे आत्मवृत्त ( मनोगत )

Autobiography of a Flower in Marathi | फुलाचे आत्मवृत्त ( मनोगत )

fulache manogat mahiti

Autobiography of a Flower in Marathi Language

फुलाचे आत्मवृत्त : महत्व

सकाळी राहुल आपल्या घरामध्ये खेळत असतो, खेळता खेळता त्याचा बॉल घरातल्या बाल्कनीमध्ये जातो जिथे पुष्कळ झाडांच्या कुंड्या ठेवलेल्या असतात. त्यातील बऱ्याच झाडांवर फुलं आलेली असतात, मनमोहक अशी रंगेबिरंगी गुलाबाची, जाई-जुईची सर्वच टवटवीत उमललेली असतात. राहुल बॉल आणायला तिकडे धावतो आणि अचानक त्याला आवाज येतो, “हॅलो राहुल, माझे नाव ख़ुशी आणि मी एक फुल आहे!”

राहुल इकडे तिकडे बघतो तर त्याला कळते कि गुलाबाच्या झाडावरील एक छान लाल गडद फुल त्याच्याकडे बघून आनंदाने डुलत असते.
राहून आश्चर्याने तिकडे बघत राहतो आणि ते लाल गुलाब बोलू लागते…”तू मला नक्कीच ओळखत असशील. कुठे ना कुठे कधी ना कधी आपली भेट झालेली असेल. कधी पूजेच्या ताम्हणात, कधी पुष्पगुच्छामध्ये, कधी घरातल्या कुंडीमध्ये तर कधी बागेमध्ये खेळताना तिथल्या झाडावर. मी एक फुल आहे आणि माझी अनेक रूप आहेत, गुलाब, मोगरा, कमळ, चाफा, जरबेरा, लिली अशा अनेक नावानी तुम्ही मला ओळखता. विविध कार्यक्रमांमध्ये माझा वापर केला जातो. हल्ली सजावटीसाठी म्हणून तर खूप मोठ्या प्रमाणात माझा वापर होतो. लग्न समारंभामध्ये, एखाद्या नवरीच्या दागिन्यांमध्ये एक ना अनेक उपयोग आहेत माझे! माझ्या फुलांच्या पाकळ्या करून देखील वापरल्या जातात रांगोळी काढण्यासाठी किंवा अंगावर उधळण्यासाठी.

आजपर्यंत तुम्ही माझी अनेक रूप बघितलेली असतील पण आज मी तुम्हाला माझे हे रूप उलगडून दाखवणार आहे. एका झाडावर माझा जन्म कसा होतो, कळीपासून फुलापर्यंत माझा प्रवास कसा आहे हे सर्व मी आज सांगणार आहे. तुझ्या घरातल्या या बाल्कनीमध्ये सुंदर अशा गुलाबाच्या झाडावर माझा जन्म झाला. जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा मी अतिशय छोटीशी लहान आकाराची गुलाबाची कळी होते. तेव्हा माझा रंग संपूर्ण हिरवा होता आणि मी एका फांदीवर होते. हवेची झुळूक येई तशी मी डोलत असे, काही काळ मी याच अवस्थेमध्ये होते. हळूहळू माझा आकार वाढू लागला आणि मी एक फुगीर कळी बनले. रोज मी तुला इथून खेळताना बघत असे आणि मला अत्यंत आनंद होत असे. तुझी आई रोज माझ्या झाडाला पाणी देते म्हणजेच मला अन्नाचा पुरवठा करत असते. माझा जन्म आणि बदलणारे रूप बघून तर तिला खूप आनंद होत असतो. माझे मित्र मधमाशी, भ्रमर हे रोज मला भेटायला येत असतात आणि बाहेर काय काय चालू आहे ते मला सांगत असतात. बाहेरची दुनिया कशी आहे हे ऐकून मला मोठी गंमत वाटत असते. कधी कधी तर त्यांच्या पंखांवर बसून बाहेर फिरून यावे असे देखील मला वाटते.

संध्याकाळ झाली कि मी झोपत असते पण तू लवकर का नाही झोपत? कित्ती तरी वेळ तुम्ही सर्व टीव्ही बघत असता मला त्याचा त्रास होतो. मी लवकर झोपते आणि लवकर उठते बघ मी कशी टवटवीत आहे. सकाळी सकाळी पडणारे दवबिंदूचे थेंब काही क्षण माझ्यावर विश्रांती घेतात तेव्हा काय मोहक क्षण असतो तो. थंड हवेची झुळूक मन प्रसन्न करून टाकते. मग सूर्योदय होतो तेव्हाचे क्षण तर कित्ती सुंदर असतात. सूर्याचे किरण माझ्या अंगावर पडतात तेव्हा तर मला खूप प्रफ्फुल्लीत वाटते. उगवत्या सूर्यासोबतच रोज माझे रूप बदलत असते, आता हळू हळू मी उमलत होते. माझ्या पाकळ्या आता हळुवार उमलत होत्या. मी थोडीशी लालसर आणि थोडी हिरव्या रंगाची दिसत होते, सर्वच माझे कौतुक करत होते.

माझ्या उमलत्या रुपा सोबतच मला भेटायला येणारे मित्र पण वाढत होते. भुंगा, मधमाशा माझ्याजवळ अगदी गर्दी करत होते. माझा सुगंध त्यांना आकर्षित करत होता म्हणून ते अगदी लांबून माझ्याकडे येत होते. माझ्यामध्ये असणारा मधुर मध त्यांना गोळा करायचा असतो असे ते मला सांगत होते. आता मी कळीपासून फुलापर्यंतच्या प्रवासातल्या शेवटच्या टप्प्यात आली आहे आणि मी खूप आनंदी आहे. ज्या साठी माझा जन्म झाला होता ते रूप आता मला मिळत आहे. इथे बागेमध्ये असणाऱ्या बाकी झाडांशी आणि फुलांशी माझी खूप छान गट्टी जमली आहे. आम्ही रोज गप्पा मारत असतो, त्यामध्ये मला कळले कि आमचा जन्म मनुष्याच्या सुद्धा आधी झालेला आहे, आमची मूळ जन्मभूमी कोणती ते मात्र कुणाला नेमकं माहिती नाही पण अरबी लोकांमुळे आमच्या प्रजाती भारतात आल्या असे मी ऐकले. मुघल, प्राचीन रोम मधील लोक हे सर्वच गुलाबाच्या फुलांचे खूप शौकीन होते म्हणे, त्यांनी त्यांच्या घराच्या, महालांच्या साभोवताली मोठ मोठ्या गुलाबांच्या बागांचे उद्यान थाटलेले असायचे ज्यांची ते विशेष काळजी घेत असत. गुलाबाच्या पाकळ्या उकळून त्यापासून बनविलेले अत्तर म्हणजे अगदीच खास असते. सर्व सण समारंभ शुभ प्रसंगांमध्ये माझ्या अत्तराचे विशेष स्थान असते आणि त्यावेळेस सर्वांच्या अंगावर माझे अत्तर शिंपडले जाते. गुलाबाची फुले देऊन सर्वांचे स्वागत केले जाते.

आमच्या अनेक प्रजाती आहेत जवळजवळ सर्व जगामध्ये आमच्या सर्वच प्रजाती प्रसिद्ध आहेत आणि विशेष म्हणजे संपूर्ण जगामध्ये सर्वात प्रथम पसंतीचे फुल म्हणून आमचा क्रमांक प्रथम लागतो. सर्व जगामध्ये गुलाब हे अतिशय लोकप्रिय आहे. ठीक ठिकाणी आमच्या फुलांचे प्रदर्शन भरवले जाते, त्यापासून विविध कलाकृती केल्या जातात आणि ते बघण्यासाठी लोक अत्यंत गर्दी करत असतात. या गोष्टी ऐकून तर मला खूपच अभिमान वाटत आहे कि मी या झाडावर जन्माला आले.

आमच्या रंगामध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत म्हणजे लाल, गुलाबी, पांढरा, पिवळा हे रंग तर आहेतच पण आता तर म्हणे २ रंग एकत्र असणारे पण फुल आहे, एकाच झाडाला दोन रंगाचे फुल येते अशा पण प्रकारची गुलाबाची झाडे आहेत म्हणे. कित्ती आकर्षक दिसत असतील. म्हणूनच आम्हाला फुलांचा राजा असे म्हटले जाते. सर्वांचा लाडका आणि आवडता.

मी काल टीव्हीवर बघितले कि भारताचे पूर्व पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुले आणि गुलाबाची फुले खूप आवडायची आणि त्यांच्या शर्टला नेहमी गुलाबाचे फुल लावलेले असायचे, कित्ती शोभत होते ते फुल त्यांना.

आता मी पण संपूर्ण फुलामध्ये रूपांतरित झालेली आहे, कळीपासून आता फुल…तुझ्या ताईने तर तिच्या फोन मध्ये माझे कित्ती तरी फोटो काढले आहेत. आता मला उद्याची प्रतीक्षा आहे जेव्हा तुझी आई मला अलगद तोडून घेईल आणि देवाच्या पूजेमध्ये मूर्तीवर वाहण्यासाठी वापरेल आणि तेव्हाच माझ्या जीवनाचे सार्थक होईल.”

Vrukshache Manogat

Marathi Nibandh Essay on Flowers / Fulache Manogat Atmavrutta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *