Skip to content

IIT Information in Marathi || आय आय टी माहिती

IIT Marathi Information

IIT Information in Marathi

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी- एक उज्ज्वल भवितव्य

 • मनोहर पर्रीकर, रघुराम राजन, नारायण मूर्ती, सुंदर पिचाई ह्या दिग्गजांच्यात काय समान आहे की त्यांना जगात एव्हढा मान सन्मान मिळाला? तर ते आय आय टीचे (IIT) माजी विद्यार्थी आहेत.
 • आय आय टी ही एक स्वायत्त शिक्षण संस्था आहे ज्यात मुलांना टेक्नॉलॉजीचे उच्च शिक्षण मिळते. येथून मुले बी.टेक होतात आणि त्यांचे शिक्षण पूर्ण होण्याच्या आत त्यांच्या पुढे लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या पायघड्या घालून उभ्या असतात.
 • संपूर्ण देशात आय आय टीच्या २३ स्वायत्त शाखा आहेत आणि त्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अधिपत्याखाली आहेत. ह्या २३ शाखांमध्ये एकूण सुमारे १२००० विद्यार्थी प्रवेश घेतात. पण हे एव्हढे सोपे नाही. त्यासाठी संपूर्ण भारतातून त्यांना प्रवेश परीक्षा घेऊन निवडले जाते. ही परीक्षा जेईई म्हणजे Joint Entrance Examination – Advanced ह्या नावाने ओळखली जाते. त्यातून तावून सुलाखून पास झालेले विद्यार्थी एकदा आय आय टी मध्ये दाखल झाले की त्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा मार्ग खुला झाला समजावे.

काय आहे आयआयटी?

 • १९४६ मध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर व्हॉईसरायचे सल्लागार सर जोगेंद्र सिंग यांनी एक कमिटी स्थापन केली जी युद्धानंतर औद्योगिक विकास हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करीत होती. त्यानुसार १९५१ मध्ये पहिली भारतीय तंत्रज्ञान संस्था प.बंगालमध्ये खरगपूर येथे स्थापन झाली. नलिनी रंजन सरकार ह्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या ह्या २२ सदस्यांच्या कमिटीने भारतात ठिकठिकाणी अशा तंत्रज्ञान संस्था निर्माण कराव्या अशी शिफारीश केली आणि १९५६ मध्ये पार्लमेंट मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅक्टचे बील पास केले. त्यानुसार आयआयटी ही स्वायत्त संस्था असून त्यास Institute of National Importance हा दर्जा देण्यात आला आहे. त्यानंतर चार मुख्य शहरात म्हणजे १९५८ मध्ये मुंबईत, १९५९ मध्ये मद्रास आणि कानपूर आणि १९६१ मध्ये दिल्ली येथे आयआयटीची स्थापना झाली.
 • विद्यार्थ्यांच्या सत्याग्रहामुळे १९६० मध्ये गौहत्ती आसाम येथे आयआयटीची स्थापना झाली. क्षेत्रीय असमतोल होऊ नये म्हणून २००३ मध्ये जास्त आयआयटीची स्थापन करण्याचे ठरले. त्याप्रमाणे रुरकी विद्यापीठाचे रुरकी आयआयटी झाले. एस.के जोशी समितीनुसार २००३, नोव्हेंबर मध्ये ५ संस्थांचे आयआयटी मध्ये रूपांतर झाले. अतिशय कठोर निष्कर्ष लावून ७ संस्था निवडण्यात आल्या. ११व्या पंच वार्षिक योजनेद्वारा ८ राज्यांमध्ये आयआयटीची स्थापना झाली. बनारस हिंदू विद्यापीठाला पण सदस्य बनविण्यात आले.
 • २०१५ -१६ मध्ये अजून सहा आयआयटी स्थापन झाल्या. अशा रीतीने सध्या भारतात २३ आयआयटी संस्था आहेत.

आय आय टींचे राज्य निहाय वर्गीकरण आणि प्रवेश देण्यासाठी असलेल्या मुलांची आणि मुलींची संख्या खालील प्रमाणे :-

 • आयआयटी वाराणसी – १०९१
 • आयआयटी धनबाद – ९१२
 • आयआयटी भिलाई – १२०
 • आयआयटी भुवनेश्वर – ३५०
 • आयआयटी मुंबई – ९६३
 • आयआयटी दिल्ली – ८५१
 • आयआयटी धारवाड – १२०
 • आयआयटी गांधीनगर – १८१
 • आयआयटी गोवा – ९०
 • आयआयटी गुवाहाटी – ६४५
 • आयआयटी हैद्राबाद – २८५
 • आयआयटी इंदोर – २६०
 • आयआयटी जम्मू – १५०
 • आयआयटी जोधपुर – २४०
 • आयआयटी कानपूर – ८३१
 • आयआयटी खरगपूर – १३४२
 • आयआयटी मद्रास – ८४६
 • आयआयटी मंडी – १८२
 • आयआयटी पलक्कड – १६०
 • आयआयटी पटना – २२५
 • आयआयटी रुरकी – ९७५
 • आयआयटी रोपड – २८०
 • आयआयटी तिरूपती – १८०
 • एकूण आयआयटी जागा – ११२७९

आय आय टी माहिती :

 • आयआयटी ही केंद्र शासनाद्वारे अनुदानित असल्याने भारत सरकारच्या मानव विकास संसाधन मंत्रालयाने मुलींच्या प्रवेशात वाढ व्हावी म्हणून मुलींसाठी वाढीव राखीव जागा ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व आयआयटीच्या सर्वोच्च पदी राष्ट्राध्यक्ष अभ्यागत म्हणून असतात आणि त्यांच्या खालोखाल कौन्सिल, संचालक सदस्य, उप-संचालक, डीन, विभाग आयुक्त कौन्सिल, विद्यार्थी कौन्सिल, होस्टेल व्यवस्थापक आणि शिक्षक अशा पायऱ्या असतात.
 • प्रत्येक आयआयटीचे वार्षिक अनुदान ९० ते १३० करोड रुपये असते. सहा विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असतो.
 • आयआयटी मागास वर्गीय आणि विकलांग विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप पण देते. अभ्यासक्रम प्रत्येक आयआयटीचा त्यांच्या धोरणानुसार असतो. त्याला लागणारी पुस्तके आणि अध्यापनाच्या सी. डी. मिळतात. बाकी धोरणे प्रत्येक विद्यापीठाचे एक सिनेट असते ते ठरवितात. म्हणजे प्रत्येक आयआयटीची स्वायत्तता जपली जाते. मार्क क्रेडिट तत्वानुसार दिले जातात.
 • आयआयटी मध्ये कॉम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, यात बी.टेक. आणि बायो टेक्नोलोजी, एन्व्हायरमेंट, इकोनॉमिक्स, डिझाइन आणि एरोनॉटिक्स यात पदवी प्राप्त करता येते. येथे डबल डिग्री पण करता येते. तो ५ वर्षांचा कोर्स असतो. तसेच MSC आणि PHD पण करून संशोधन करता येते. त्यासाठी GATE [ Graduate Aptitude Test in Engineering] ही परीक्षा द्यावी लागते. ह्या बरोबर विद्यार्थ्यांना प्रथम वर्षात सर्व विषय शिकावे लागतात आणि NSC किंवा NCC मध्ये भाग घ्यावा लागतो किंवा स्पोर्ट मध्ये भाग घ्यावा लागतो. तसेच व्यवस्थापनाचे पण धड़े गिरवावे लागतात.

परीक्षा व आय आय टी मधले आयुष्य :

 • बारावी सायन्स मध्ये कमीत कमी ७५% गुण मिळालेल्यांना मेन्स परीक्षेसाठी अर्ज करता येतो. प्रवेशासाठी हे मार्क धरले जात नाही. मागास वर्गीयांसाठी ही टक्केवारी ६५% आहे. पहिल्या २,४५,००० विद्यार्थ्यांनाच अॅडव्हांस परीक्षेसाठी बसता येते. त्यासाठी ११ वी आणि १२ वी अश्या दोन वर्षात हा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो.
 • परीक्षेमध्ये गणित, फिजिक्स, केमिस्ट्रीवर आधारित बारीक बारीक प्रश्न विचारले जातात. जेणेकरून तुम्ही किती सूक्ष्मतेने अभ्यास केला आहे ते कळते. हे सरावानेच जमते. विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.
 • प्रवेश मिळाल्यावर चार वर्षे होस्टेलला रहावे लागते. मुलांना एकटे वाटू नये म्हणून विविध खेळ आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. प्रत्येक संस्थेचे वेगळे कार्यक्रम असतात आणि कोर्स संपायच्या आत त्यांना त्यांच्या विषयाप्रमाणे आणि योग्यतेप्रमाणे नोकरी मिळते.
 • IIT कानपूर येथील तीन विद्यार्थ्याना १.४ कोटी वार्षिक पगाराची ऑफर आली आहे तर काहींना ४३ लाख. काही मुले संशोधन करतात किंवा उच्च शिक्षणासाठी परदेशात जातात. आंतरराष्ट्रीय गुणानुक्रमानुसार आयआयटी मुंबई १६२व्या क्रमांकावर आहे. खालोखाल दिल्ली १७२व्या क्रमांकावर आहे. तरीही आयआयटीचे माजी विद्यार्थी आणि सन मायक्रोसिस्टीमचे संस्थापक श्री विनोद खोसला ह्यांच्या मते आयआयटीचा कठीण अभ्यासक्रम हा MIT, हार्वर्ड आणि प्रिन्स्टन ह्या विद्यापीठांचा मिळून एकत्र आहे. त्यामुळे आयआयटीने परीक्षेचा आराखडा बदलला. तरीही आयआयटी ही ब्रेन ड्रेन, मुलांच्या आत्महत्या, कोचिंग क्लासेस इत्यादी विषयांमुळे चर्चेत राहिली आहे.

IIT Wikipedia Essay Nibandh in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *