Skip to content

My Brother Essay in Marathi | Majha Bhau Essay in Marathi, Nibandh

brother in law meaning in marathi

My Brother Essay in Marathi

माझा भाऊ निबंध

मेरे भैया, मेरे चंदा मेरे अनमोल रतन| तेरे बदले में जमाने की कोई चीज नाही.”

आम्ही दोन बहिणी आणि आम्हाला एकच भाऊ. एकुलता एक असल्याने खूप लाडका आहे. दादा मोठा असल्याने आम्हा बहिणींवर खूप दादागिरी करतो आणि प्रेम पण तितकेच करतो. त्याच्या वाटेला जितके प्रेम आई आजी, बाबा देतात तितकेच किंबहुना त्याहून अधिकच प्रेम तो आम्हाला देतो. आमची थट्टा मस्करी पण करतो. आम्ही पण त्याला सोडत नाही. विशेषत: आमच्या मैत्रिणी आल्या की मग आम्ही त्याला खूप चिडवतो. कारण तो त्यांच्यावर इम्प्रेशन मारतो.

दादा खूप उंच, गोरा आणि देखणा आहे. त्याच बरोबर जिम मध्ये जाऊन आणि योग करून त्याने उत्कृष्ट शरीर यष्टी बनवली आहे. त्यामुळे कोणीही त्याच्याकडे बघतच राहतात. त्याला लष्करात जायचे होते पण आजीने जाऊ दिले नाही. तरीही त्याचा धाडशी स्वभाव कमी होत नाही. नदीच्या पुरात पोहणे, मारामारी चालू असेल तर मध्ये पडणे, ती सोडवणे असे त्याचे उद्योग चालू असतात. अन्यायाची त्याला खूप चीड आहे. तसेच तो खूप रागीट पण आहे. त्यामुळे कुठे अन्याय झाला तर तो पेटून उठतो आणि त्या व्यक्तीला शिक्षा करूनच येतो.

एकदा आम्ही सिनेमाला गेलो होतो तेंव्हा मागचा माणूस लांब पाय करून बसला होता. दहा वेळा सांगितले पण तो ऐकेना. शेवटी दादाने त्याचे दोन्ही पाय धरले आणि उभा राहिला. तो माणूस दाणकन खाली आपटला. सगळे बघायला लागले. शेवटी तो माणूस मान खाली घालून निघून गेला. असेच आमचा शेजारी बायकोला मारीत होता. दादा धडकन तिकडे गेला आणि त्या माणसाची गच्ची पकडून म्हणाला, बाई माणसावर हात टाकायला लाज नाही वाटत? तो पण दादाच्या अवताराकडे बघून गप्प बसला.

पण असे असले तरी दादा दयाळू पण आहे. त्याच्या एका गरीब मित्राला युनिफोर्म आणि पुस्तके नव्हती तर त्याने त्याचा एक युनिफोर्म आणि त्याच्या पॉकेटमनीतून त्याला पुस्तके घेऊन दिली. आणि आता हे दरवर्षी चालू आहे. आमच्या घरी जर कुणी गरीब विद्यार्थी आले तर त्यांना शिक्षणासाठी आम्ही मदत करतो. त्याच्यावर पण हेच संस्कार आहेत. त्याला खूप मित्र आहेत. तिथे पण तो त्याच्या गुणांमुळे लाडका आहे. त्याच्या कॉलेज च्या शिक्षकांचा पण तो लाडका. कॉलेज मध्ये अनेक स्पर्धा जिंकल्यामुळे दादाला खूप कप आणि ढाली मिळाल्या आहेत.

स्पोर्ट्समन दादा :

दादा खूप खेळांमध्ये चॅम्पियन आहे. बॅडमिंटन, क्रिकेट, चेस अशा खेळांमध्ये तो खूप निपुण आहे. तो आंतरकॉलेज तसेच आंतरदेशीय क्रीडा स्पर्धामधून यशस्वी होऊन आला आहे. त्याचे प्रिन्सिपल म्हणतात ह्याने आमच्या महाविद्यालयाचे नाव रोशन केले आहे. दादा पट्टीचा पोहणारा आहे. आमच्या गावात नदीवर पोहायला जातो आणि पूला वरुन पुराच्या पाण्यात उडी मारून पोहतो. एक दोनदा त्याने बुडत असलेल्या मुलांना वाचवले आहे. धाडस त्याच्या नसानसांतून भरले आहे.

बांका प्रसंग :

एकदा आम्ही मुंबईला गेलो होतो. परत येताना आमची गाडी चुकली आणि आम्हाला प्लॅटफॉर्म वरच थांबावे लागले. रात्रीचा प्रसंग होता. बरोबर पुरुष माणूस तोच एकटा होता. आई, मावशी आणि काकू ह्यांच्या अंगावर सोन्याचे दागिने होते. आणि बरोबर किमती सामान पण होते. अचानक 10/12 मुले तोंडाला फडके बांधलेले असे आमच्यासमोर उभे राहिले. त्यांनी दादाच्या छातीवर सुरा रोखला आणि “जे असेल ते काढा” असे सांगितले! दादाने त्याचा हात धरला आणि मारामारी सुरू करणार इतक्यांत नशिबाने पोलीस आले. त्यामुळे लुटेरे पळून गेले. आम्ही सगळे घाबरलो होतो पण ह्या प्रसंगात सुद्धा दादा अजिबात डगमगला नव्हता. त्या दिवशी राखी पोर्णिमेचा खरा अर्थ कळला!

दादा राखी पोर्णिमेला कुठेही असला तरी घरी येतो. आम्हा बहिणींना खूप छान छान भेटी आणतो. बरोबर ज्या मित्रांना बहिणी नसतात त्यांनाही घेऊन येतो. त्यामुळे ती मुले पण आमच्याकडून राखी बांधून घेतात. अशा तर्हेने दर वर्षी आमच्या मानलेल्या भावांची संख्या वाढतेच आहे. कुठलाही आनंद एकट्याने भोगायचा हे त्याला अजिबात आवडत नाही. अगदी लहानपणापासून चॉकलेट आणले तरी सगळ्यांना एक तुकडा देवून मग तो स्वत: खातो.

जरी त्याला चॉकलेट आवडत असले तरी ते तो जास्त खात नाही. आम्हालाही खाऊ देत नाही. बाकी इतर खाण्या पिण्याच्या बाबतीत मात्र तो एकदम खवय्या आहे. त्याला बाहेर मिळणारे सर्व पदार्थ घरी करून पाहिजे असतात. गोडापेक्षा त्याला तिखट जास्त आवडते. आणि सर्व पदार्थ त्याला आईच्याच हातचे आवडतात. तो स्वत: पण खूप छान चहा, आमलेट वगैरे करतो. दिवाळीच्या फराळाला तो आईला चकल्या व अनारसे तळायला मदत करतो. आम्हाला पण काम करायला लावतो. अशी कधी पार्टी असली की त्याचा उत्साह उतू जातो. वरती म्हणतो चवीने खाणार त्याला आई देणार“

असा आहे माझा दादा ! आजी त्याला द्वारकेचा खांब म्हणते. आई त्याला कुलदीपक म्हणते. आणि आम्ही त्याला आमचा आदर्श मानतो.

Click Here for the Full List of Essays on Marathi.TV

Essay on My Brother in Marathi Wikipedia Language

Majha Dada / Maza Bhau Essay in Marathi / Nibandh / Composition

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *