Skip to content

Myself Essay in Marathi : My Introduction Nibandh, Short Essay on Myself

Majhi Mahiti in Marathi

Myself Essay in Marathi

मी साहिल बोलतोय!

माझे नाव साहिल सलील पाटील. मी इयत्ता आठवी ‘अ’ मध्ये शिकत आहे. मी ज्या शाळेत शिकत आहे ती शहरातील सर्वात उत्तम शाळा आहे. तिचे नाव ‘न्यू इंग्लीश स्कूल.’ आता तुम्हाला वाटेल ह्यात काय एव्हडे. हा कोण साहिल? खरय ! माझे नाव इतके मोठे नक्कीच नाही आणि मी माझी ओळख सांगण्या एव्हडा मोठा पण नाही. मग मी कोण, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना?

“आम्ही कोण म्हणून काय पुसता आम्ही असू लाडके देवाचे” असे म्हंटले आहे न? मी पण देवाचे लाडके लेकरू आहे म्हणा न!

मी आता आठवीत आहे. म्हणजे १० वि ची पूर्व तयारी ची इयत्ता. आता पासूनच शाळा आणि घराचे माझ्यावर लक्ष वाढले आहे. माझ्याकडे एक मोठा झालेला मुलगा म्हणून ते बघत आहेत. मी आता कुठे १३ वर्षाचा झालो आहे. पण खरच मी बदलतोय. मला दहावीचे टेंशन आता पासूनच वाटायला लागले आहे. माझ्या वाढदिवसाला आलेले सगळे काका आणि मावश्या आई बाबांना म्हणत होते “बघता बघता केव्हडा मोठा झाला न साहिल? बाबांच्या उंचीचा झाला आणि आता दोन वर्षांनी दहावीत जाणार. आता पासूनच अभ्यासाकडे लक्ष दे रे बाबा. तरच चांगल्या कॉलेज मध्ये प्रवेश मिळेल.” दुसरे काका म्हणाले “आता पासूनच कुठल्या साईडला जाणार ते ठरवून ठेव. म्हणजे अगदी शेवटी अभ्यासाचे ओझे होणार नाही.” मी मग खरच आपल्या ‘career’ बद्दल विचार करू लागलो.

मी, माझा मोठा भाऊ अनिल आणि आई – बाबा असे आम्ही कुटुंबात चारच जण आहोत. त्याला हल्ली ‘न्युक्लीयर फॅमिली’ असे म्हणतात. पण आमचे हे छोटेसे कुटुंब अगदी सुखी आहे. बाबा इंजिनियर आणि आई शाळेत शिक्षिका आहे. दादा कॉलेज मध्ये आहे. आम्ही सर्व सकाळी ब्रेकफास्ट करून बाहेर पडतो, आई सगळ्यांचे डबे देते. आईने आम्हाला लहानपणापासूनच स्वत:ची कामे स्वत: करायला शिकविले असल्याने कोणीही आरडा ओरड, गोंधळ न करता वेळेवर घराबाहेर पडतो. शाळा झाली कि संध्याकाळी थोडा अभ्यास, मग मित्रांसोबत गप्पा मारायला मी बाहेर निघतो. रात्री जेवण झालं कि आई बरोबर सिरिअल्स बघणे किंवा ‘कॉम्पुटर’ वर शाळेचा काही प्रोजेक्ट पूर्ण करणे असा माझा रोजचा दिनक्रम.

बाबांना कामानिमित्त बाहेरगावी जावे लागते. मग आमच्या घरात दादा मोठा माणूस असतो. सगळ्या जबाबदाऱ्या तोच पार पडतो. मी शेंडेफळ असल्याने लहानपणापासूनच तो माझी काळजी घेतो. आम्ही दोघे पाळणाघरात वाढलेले असल्याने आम्हाला आपली कामे आपण कशी करावी, तसेच दुसऱ्याशी कसे जुळवून घ्यावे हे परिस्थितीने आपोआप शिकविले. दादाचा समजूतदारपणा आणि बाबांचा मोठेपण माझ्यात आणण्याचा मी प्रयत्न करतो आहे. ते माझे आदर्श आहेत. पण अजून पर्यंत तरी माझ्यावर कुठली जबाबदारी पडलीच नाही. त्यामुळे सध्या तरी मी खुशालचेंडू आहे. हो आई मला लाडाने “चेंडू” म्हणूनच हाक मारते. कारण मी थोडासा गोलमटोल आहे. मात्र आता मला थोडे गंभीर व्हायला पाहिजे नाही का? मला आता जिम मध्ये जायला हवे. म्हणजे दादासारखी पिळदार बॉडी बनवता येईल.

लहानपणापासून मी तसा बुटका होतो, पण ह्याच वर्षी माझी उंची खूप वाढली. आणि चेहरा पण थोडा बदलला. माझा आवाज पण थोडा घोगरा झाला आहे. मी आईला सांगितले तर ती म्हणाली “अरे मुलगे मोठे झाले की मिशी फुटते आणि आवाज पण घोगरा होतो.” आई शिक्षिका असल्याने ती सांगते ते बरोबरच असते. मला अजून उंची हवी आहे असे तिला म्हंटले तर तिने सायकलिंग, बारवर कसरत आणि रनिंग करायला सांगितले.

१३व्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही सगळे बोलत असताना आई म्हणाली “साहिल, काका म्हणतात ते खरे आहे. तू आता आठवीत गेला म्हणजे तुला आता ठरवायला हवे तुला पुढे जाऊन काय व्हायचे आहे आणि ते ध्येय कसे सध्या करायचे आहे.” बापरे! मला खरच वाटायला लागले की ही माझ्यावर जबाबदारी आहे की मी ठरवायचे मला कोण व्हायचे. खरच! कोण होणार मी? दादाच्या १२ वि नंतर ही चर्चा झाली होतो म्हणून मला बरेच माहित होते. पण सुचेना यातील कोणता पर्याय निवडू – डॉक्टर, इंजिनियर, की शिक्षक, की अंतराळवीर, क्रिकेटियर, बॅडमिंटन पटू, धावपटू, निवेदक, अभिनेता, शास्त्रज्ञ, की लष्करात…जायचे तर कुठे? नेव्ही, आर्मी, की एअर फोर्स? कलाकार व्हायचे तर कोण? गायक, वादक की संगीतकार? मला जर सिविल सर्विस ला जायचे तर कुठे? कलेक्टर, आयपीएस कमिशनर, फॉरेन सर्विस की फॉरेस्ट सर्विस? शेतकरी व्हायचे तर मला काय करावे लागेल? आणि जर सगळे करतात तसे कम्प्यूटर इंजिनियर होऊन अमेरिकेला जाऊ? की प्रकाश बाबा आमटे ह्यांचा युवक बिरादरी मध्ये जाऊन समाज सेवा करू? बापरे! प्रचंड गोंधळ झाला डोक्यात आणि मला सगळ्याच गोष्टी कराव्याश्या वाटू लागले.

कधी मला सचिन सारखे फलंदाज व्हावे वाटले, कधी विश्वास नांगरे पाटील सारखे धाडसी इन्स्पेक्टर व्हावे, कधी अभिजीत सावंत सारखे इंडियन आयडॉल व्हावे, कधी जयंत नारळीकर व्हावे, तर कधी मार्क झुकरबर्ग (जेंव्हा वर्गात कमी मार्क मिळतात) कधी जॉन अब्राहम तर कधी रणवीर सिंग (त्याच्यासारखे नाक प्लास्टिक सर्जरी ने मोठे करता येईल का?) तर कधी हॉलिवूड चा नायक. जेंव्हा कोणत्याही यशस्वी पुरुषाची कथा टी. वी. शाळेत किंवा घरी बोलली जाते तेंव्हा लगेच मला वाटते की मी पण तेच करावे. तस पाहायला गेले तर मला सर्वच गोष्टी जमतात पण थोड्या थोड्या. बाबा आणि माझा मित्र पक्या पण म्हणतो की मी, “Jack of all and master of none” आहे.

बाबा आणि माझ्या वर्ग शिक्षिका तनु टीचर म्हणतात की “आपण फक्त त्यांना यश मिळालेले बघतो, त्यामागे त्यांची किती वर्ष तपस्या असते हे कुणालाच माहित नसते आणि त्यात इंटरेस्ट पण नसतो. तुला जर खरच कुणीतरी यशस्वी पुरुष व्हायचे असेल तर आता पासूनच त्या गोष्टीवर ध्यान दे. माहितगारांकडून पूर्ण माहिती घे. आणि महत्वाचे म्हणजे तुला खरोखर त्यात इंटरेस्ट आहे की कुणीतरी करते आहे म्हणून तू करतोस हे तपासून बघ. ह्या साठी नरेंद्र जाधवांचे ‘आमचा बाप आणि आम्ही’ हे पुस्तक वाच. त्यात त्यांनी म्हंटले आहे की आपल्यातला राजहंस आपणच शोधायचा असतो. म्हणजे बदकांच्या कळपात जावे लागत नाही.”

एव्हडे बौद्धिक ऐकल्यावर मी आमच्या ग्रुप मधल्या पक्या, शिऱ्या, श्री, जान्हवी, सिया, मनप्रीत, कुमार स्वामी, सगळ्यांना विचारले, तर तेही माझ्यासारखेच चक्रावलेले होते. पक्या आर्मी मध्ये जाणार म्हणाला, शिऱ्या कम्प्युटर इंजिनियर, श्री शास्त्रज्ञ होणार म्हणाला, जान्हवी ला कॅन्सर स्पेशालीस्ट व्हायचे आहे तर मनप्रीत ब्युटीक्वीन होऊन नंतर मॉडेल आणि अॅकट्रेस व्हायचे आहे. मी खूप विचार केला अगदी डोक्याचा भुगा होईपर्यंत आणि एकदम प्रकाश पडला, मला गाड्यांची भयंकर आवड आहे. मी त्याच क्षेत्रात करियर करेन. ऑटोमोबाईल इंजिनियर होऊन मी एक गॅरेज काढीन आणि तेथे लोकांना त्यांच्या आवडीप्रमाणे गाडीत बदल करून देईन. ठरले!

आईला आणि बाबांना सांगितले तर त्यांनाही आनंद झाला की मी काहीतरी हटके करीत आहे आणि स्वत:चा बिझनेस काढत आहे हे खूप चांगले आहे. त्याने अजून चार माणसांना रोजगार पण मिळेल. बाबांनी त्यांच्या ओळखीच्या गॅरेज वाल्याकडे पाठवीन म्हणून सांगितले. आता मला आतापासूनच अभ्यासाला लागून चांगले मार्क मिळवून शिकायला हवे न? नाहीतर थ्री इडियट सारखे व्हायचे. कारण आता तर माझ्या आयुष्याला वळण लागणार आहे.

Click Here for the Full List of Essays on Marathi.TV

Short Essay on Myself in Marathi Language Wikipedia

2 thoughts on “Myself Essay in Marathi : My Introduction Nibandh, Short Essay on Myself”

  1. Your essay is very lengthy and no one would like to read it because myself is in 6 lines, 5 lines or max to max 10 lines, and I have never seen such a big introduction of ourself. You should have made it small and according to everyone, so people would read it. !!!???

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *