Paus Padla Nahi Tar Essay in Marathi Language

Paus Padla Nahi Tar Composition : पाऊस पडला नाही तर निबंध

मानवी जीवन हे पाण्यावर अवलंबून आहे. आपल्या जीवनात पाण्याचे खूप मोठे स्थान आहे. आपल्यालाच काय तर ह्या पृथ्वीतला वरच्या प्रत्येक सजीवाच्या आयुष्यासाठी पाणी हा घटक खूप महत्वाचा आहे. म्हणूनच म्हटले आहे की पाणी हेच जीवन आहे. पाण्याचा साठा करून ठेवण्यासाठी किंवा पृथ्वितला वरील पाणी पुरवण्यासाठी पाऊस खूप महत्वाचा आहे. त्यासाठी जरुरी आहे की पाऊस वेळेवर आणि भरपूर प्रमाणात पडला पाहिजे. पृथ्वीवरील गोड्या पाण्याचे मुख्य स्त्रोत पाऊस आहे. आणि असा हा सर्व सजीवांच्या जीवनासाठी आवश्यक असणारा पाऊस जर पडलाच नाही तर ?? बहुतेक, आपले मानवी जीवनच नव्हे तर संपूर्ण सजीव सृष्टीच कोलमडून जाईल!

आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. भारतातील शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असते आणि जर एखाद्यावेळी पाऊस पडला नाही तर त्या भागात अतिशय दुष्काळ पडू शकतो आणि मानवाचे जीवन कठीण होऊन जाईल. अशा वेळेस पाऊस न पडल्यामुळे आपल्या पुढे अन्नाच्या समस्ये सोबतच तहान भागवण्याची समस्या देखील उभी राहील. सर्व काही कठीण होऊन बसेल.

पाऊस पडला नाही तर नद्यामध्ये, तलावांमध्ये किंवा विहिरींमध्ये पाणी कुठून येणार? नद्या, विहिरी, तलाव हे सारे ओस पडून जातील. म्हणूनच दरवर्षी पाऊस पडणे फार आवश्यक आहे. पाऊस नाही तर मानवी जीवन नाही. पाण्याविना पशु-पक्ष्यांना पण खूप यातना सोसाव्या लागतील.

शेतकऱ्याचे सर्व जीवन पावसावर अवलंबून असते. भर उन्हाळ्यात जमिनीची मशागत करून तो पाऊस येण्याची चातकासारखी वाट पहात असतो. पाऊस पडला नाही तर शेतकऱ्याने कितीही श्रम केले, कितीही घाम गाळला तरीही गवताचे एक पाते देखील उगवू शकणार नाही. जर ही परिस्थिती काही वर्षे राहिली तर अन्न-धान्याचा भयानक तुडवडा निर्माण होईल, महागाई प्रचंड वाढेल. गरीब माणसे, पशु-पक्षी बिना अन्नाचे तडफडून मरून जातील. अश्या भयाण परिस्थितीची आपण कल्पना देखील करू शकत नाही.

पाऊस पडला नाहीतर जमिनीत पाणी मुरणार नाही. जमिनीतील भूजल लवकरच संपून जाईल. जमिनी पाण्याविना सुकून त्यात भेगा पडतील. झाडे मरून जातील, व वनस्पतींवर अवलंबून असणारे सर्व पशु-पक्षी बिना अन्न-पाणी मरून जातील. हळूहळू सर्व जीवनच नष्ट होऊन जाईल आणि पृथ्वी इतर ग्रहांप्रमाणे मातीचा एक निर्जीव गोळा बनेल. आकाशातून सुंदर निळी-हिरवी दिसणारी ही पृथ्वी भकास आणि मलूल दिसू लागेल.

धरतीवर पाऊस पडणे ही एक चक्र क्रिया आहे. धरतीवरील पाण्याचे बाष्पिभवन होऊन त्याचे ढग तयार होतात व काही कालावधीनंतर ते ढग थंड होऊन पाऊस पडतो. जर का तलाव, नद्या, विहिरींमध्ये पाणीच नसेल तर पाऊस कुठून पडणार. पाऊस पडला नाहीतर फक्त मानवी जीवन किंवा पशुपक्ष्यांचीच हानी होणार नाही तर झाडे झुडपे पण सुकून जातील. आपल्या धरतीवरील सारी जंगले नाहीशी होतील. काही वर्षातच सगळी हिरवळ गमावून बसेल हि पृथ्वी! आपली हरीभरी धरतीमाता सुकून ओसाड होऊन जाईल.

पाऊस पडण्याआधी मोर नाचायला लागतात, कोकिळा गाण म्हणते. पण जर का पाऊस झाला नाही तर, आपल्याला मोर नाचताना दिसणार नाही व कोकिळा पण गाणे म्हणताना ऐकू येणार नाही. पाऊस पडला नाही तर पावसावर असंख्य कविता लिहिणाऱ्या कवींना प्रेरणा कुठून मिळणार? आपल्याला सर्वाना माहित आहे की इंद्रधनुष्य हे पावसाळयातच पाहायला मिळते. जर पाऊस पडला नाही तर आपल्याला सुंदर इंद्रधनुष्य कसे पाहायला मिळेल. लहान मुलांना इंद्रधनुष्य पाहण्याची फार आवड असते. पाऊस पडला नाही तर तो मुलांना दिसू शकणार नाही.

पाणी आपल्या जीवनात जसे अत्यावश्यक आहे तसेच पाणी अजून एक मोलाचे काम करते ते म्हणजे वीजनिर्मिती. जर का पाऊस पडला नाही तर वीजनिर्मिती पण होणार नाही. विजेचा उपयोग आपल्याला प्रत्येक ठिकाणी होतो – मोठमोठे कारखाने, उद्योग, हॉस्पिटल, शाळा महाविद्यालय इत्यादी. आणि पाऊस न पडल्यामुळे हे सर्व उद्योग, शाळा, महाविद्यालये बंद पडतील. माणसाचा कमवण्याचा स्त्रोत संपून जाईल आणि जगभरात बेकारी निर्माण होईल. माणसांचे जगणे मुश्कील होऊन जाईल.

पावसाचे जसे इतके सारे फायदे आहेत आणि तो आपल्यासाठी जसा अत्यावश्यक आहे तसेच त्याचे काही वाईट परिणाम देखील आहेत. जसे की, पाऊस जर अती प्रमाणात झाला तर पूर येऊ शकतो व त्यामुळे गावच्या गाव वाहून जाऊ शकते. पिकांचा नाश होऊ शकतो. पण ह्या सगळया समस्या परवडतील कारण यावर उपाय करता येऊ शकतात. पण जर पाऊस पडला नाही तर आपल्याकडे कुठलाही अन्य पर्याय उरणार नाही. पाण्याचे आपल्या आयुष्यात खूप महत्वाचे स्थान आहे. म्हणून पाऊस हा पडलाच पाहिजे.

पाऊस पडण्यासाठी आपल्याला निसर्गाचे पालन व रक्षण करावे लागणार. म्हणूनच म्हंटले आहे की वन है तो जल है और जल है तो कल है. आपण सर्वांनी दर वर्षी एक तरी झाड लावले पाहिजे आणि त्याची निगा राखली पाहिजे. वेळेवर पाऊस पडणे हि एक नैसर्गिक क्रिया आहे. ही क्रिया वेळेवर व्हावी म्हणून आपल्याला निसर्ग जोपासावा लागेल. तसेच पावसाच्या पाण्याचा साठा वेळोवेळी केला पाहिजे व पाणी जपून वापरले पाहिजे, कारण एखाद्या वर्षी पाऊस कमी झाला किंवा पाऊस पडला नाही तर काही प्रमाणात आपण पाण्याच्या समस्येला तोंड देऊ शकतो.

‘झाडे लावा झाडे जगवा आणि जीवन वाचवा’!.

Save Water Essay in Marathi, Panyache Mahatva; Save Water Quotes Slogans