Skip to content

Surya Mavala Nahi Tar Essay in Marathi || सूर्य मावळला नाही तर Nibandh

surya mavala nahi tar nibandh

Surya Mavala Nahi Tar

सूर्य मावळला नाही तर निबंध

अख्या जगाला स्वत: जळत राहून प्रकाश, उष्णता, अन्न आणि स्वास्थ्य देणाऱ्या सूर्याला ह्या परोपकाराचा फोलपणा जाणवला आणि त्याने ठरविले की मानवाला त्याच्या कृत्याची शिक्षा देण्यासाठी सतत प्रखर ऊन आणि प्रकाश द्यावा तर काय होईल?…

बापरे कल्पनाच करवत नाही काय भयंकर उत्पात घडेल त्याची. आपल्याला लहानपणीच्या कवितांमध्ये सूर्याला मित्र म्हणून संबोधिले होते. आपल्याला अगदी अंगवळणी पडले आहे की सूर्य सकाळी पूर्वेला उगवतो आणि संध्याकाळी पश्चिमेला मावळतो. उगवतीवर त्याचा लाल गोळा वरवर सरकू लागला की आपली दिनचर्या सुरु होते. प्रत्येक प्राणीमात्रा आपल्या उदरनिर्वाहासाठी बाहेर पडतात. दिवसभर पोटासाठी वणवण करून सूर्याच्या मावळतीकडे बघत बघत घरी येतात आणि तो मावळला की ते पण कामकाज आवरून झोपी जातात. दिवस कामासाठी आणि रात्र झोपण्यासाठी हे गणित आपल्या डोक्यात इतके पक्के बसलेले आहे की त्या ठराविक वेळेला डोळे उघडतातच आणि ठराविक वेळेला जांभया येतातच.

अपवाद फक्त रात्रपाळी आणि आयटी च्या लोकांचा. त्यांना बिचाऱ्यांना “या निशा सर्व भूतांना “ म्हणत जगावे लागते. पण असे खूप थोडे मानव आणि कांही निशाचर. जवळ जवळ 90% प्राणिमात्रांची दिनचर्या पूर्णपणे सूर्याच्या उगवण्या आणि मावळण्यावर अवलंबून आहे. अशावेळी सूर्याने असा भयंकर निर्णय घेतला तर अख्या जगाचे काय होईल?

प्रथम सूर्य जर मावळलाच नाही तर उत्तर व दक्षिण ध्रुवाच्या सारखे सहा महिने दिवस आणि सहा महिने रात्र अशी परिस्थिती अनुभवावी लागेल. म्हणजे कोणाला झोपतच येणार नाही हे एक. आणि दुसरे म्हणजे रात्र नसल्याने सगळे काम करीत राहतील आणि दमून जातील. त्यातच दिवस रात्र सूर्याच्या उन्हाचा त्रास सहन करावा लागेल. सुरुवातीला प्राणी व वनस्पतींना देखील बरे वाटेल पण नंतर उष्णतेने सगळे काळ्या रंगाचे होतील. मग वर्णविद्वेष वगैरे वादविवाद होणार नाही.

पण अतीच झाले तर अति उष्णतेने ते तडफडायला लागतील. पाण्याचे साठे आटायला लागतील. तहानेने पशू पक्षी व्याकूळ होतील.सगळ्या जगाचे पाणी आटून गेले तर जीवसृष्टीच राहणार नाही आणि चंद्र आणि मंगळासारखा आपला पृथ्वी हा ग्रह देखील कोरडा खडखडीत होईल. कारण दिवस रात्र उष्णतेमुळे झाडे पाण्यावाचून मरतील आणि हवेतील ऑक्सिजन पण नष्ट होईल .तसेच पुन: ऑक्सिजन निर्मिती झाडे नसल्याने होणार नाही. झाडे मेली तर पक्षी पण मारतील आणि त्याच्यावर जगणारे पशू पण मरतील. त्या पशुना खाणारी हिंस्र जनावरे एक तर माणसांवर हल्ले करतील नाहीतर ती पण मरतील.

सध्या आपल्या ग्रहावर तीन चतुर्थांष पाणी आहे. उत्तर आणि दक्षिण ध्रुव पृथ्वीच्या कलत्या आंसमुळे सूर्याचा कधी सहा महिने पूर्ण समोर येतात तर कधी सहा महिने पूर्ण पाठ दाखवतात. दक्षिण ध्रुवावर वस्ती नाही पण उत्तर धृव आणि त्याच्या जवळचे देश म्हणजे नॉर्वे, अमेरिकेतील अलास्का प्रांत, ग्रीनलॅंड, स्वीडन आणि सायबेरिया हे सर्व देश किंवा त्यांचे कांही भाग सहा महिने पूर्ण अंधारात आणि सहा महिने पूर्ण उजेडात काढतात. सहा महिन्यांचा दिवस असल्याने ते सर्व लोक मानसिक अस्वस्थतेचे शिकार होतात.अंधारामुळे शरीरात मेलातोनीन नावाचे द्रव्य, जे झोपण्याच्या पद्धतीत बदल करतात, ते वाढतात आणि कमी झोपे मुळे माणसे मनोविकारांना बळी पडतात.तसेच अति उजेडामुळे सेरोतोनीनची कमतरता येते आणि मूड बिघडतो आणि लोक संशयी, अवसानघातकी आणि दारुडे होतातात.

अशा प्रकारची अवस्था सर्व जगाची होईल. तेथे दिवसाच्या प्रकाशाने डोळे भगभगु नये म्हणून लोक तळघरात ठिय्या मारून बसून राहतात. जर सूर्य मावळलाच नाही तर सगळ्यांना तळघरात बसून राहावे लागेल आणि कधीपर्यंत ते सांगता येणार नाही. म्हणजे अवकाशावरती असलेल्या इंग्लिश सिनेमांमधील अवकाश यात्रींसारखी सगळ्यांची जीवनशैली, राहणे आणि खाणे बदलेल. शास्त्रज्ञ पाण्याविना राहण्याचे तंत्र निर्माण करतील किवा पाणी तयार करावयाचे तंत्र विकसित करतील पण प्रत्येकी पाण्याच्या वापरावर निर्बंध राहतील.

त्याहून हि मोठा धोका आहे.तो म्हणजे सूर्याच्या निरंतर प्रखर उष्णतेने बर्फ वितळण्याचा! आत्ताच ग्रीन हाउस इफेक्ट मुळे आणि ओझोन चा पडदा फाटल्यामुळे बर्फ प्रचंड प्रमाणात वितळण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे आणि महासागरात वादळे आणि नद्यांना पूर येण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजे आपल्या पुराणात सांगितल्याप्रमाणे एका युगाचा अंत होतांना जलप्रलय होतो, तसा जलप्रलय होईल आणि केवळ थोड्याच मानव आणि प्राणी जाती शिल्लक राहतील.किंवा सर्वनाश होईल.म्हणजे मानवजातीवर एक तर प्रलयाचे संकट येईल किवा उष्णतेने पाणी आटून गेल्याने दुष्काळाचे संकट येईल. म्हणजे कुठूनही जीवसृष्टी नष्ट पावण्याचे संकट येईल. जगात फारच थोडे मानव आणि प्राणी शिल्लक राहतील ज्यांना कुठलाच देश नसेल, भाषा नसेल, स्त्री-पुरुष भेद नसेल. फक्त सर्व्हायवल म्हणजे अस्तित्व हा एकाच समान मुद्दा असेल. हि एक चांगली बाजू म्हणता येईल का?

‘2012’ नावाच्या सिनेमात अशा तऱ्हेचे संकट येईल असे भाकीत केले गेले होते. त्यामध्ये जे दाखवले गेले ते केवळ निर्मात्याची आणि दिग्दर्शकाची कल्पनारम्यता नव्हती. असे होऊ शकेल ह्याची जाणीव पाश्चिमात्य शास्त्रज्ञांना आणि संशोधकांना आधीच आली असावी. जगाचे पर्यावरणाचे हाल करणे त्यांच्या डोळ्यासमोर आहे, सृष्टीचा समतोल आधीच बिघडलेला आहे. वादळे, महामारी, भूकंप, नवनवीन रोगांची व्युत्पत्ती हि सर्व ह्या संकटाची सुरुवात झाल्याची लक्षणे आहेत. अमेरिका, रशिया आणि चिन हे देश मंगळ आणि चंद्रावर वस्ती करण्यास योग्य आहे काय ह्याचे ,अंतराळयाने पाठवून संशोधन करीत आहेत. अमेरिकेमधील कांही व्यवसायिक चंद्रावरची जागा पण विकायला निघाले आहेत आणि लोक पण ती घेऊ इच्छित आहेत. ह्याचा अर्थ, समजा खरच जगबुडी किंवा कयामत किंवा वणवा झालाच तर असे प्रचंड श्रीमंत लोक आधीच पृथ्वी सोडून तेथे वस्ती करतील.

कुठल्या हि गोष्टीचा अतिरेक वाईटच. थंडीत जरी कितीही ऊन खावेसे वाटले किंवा महत्वाचे काम आहे म्हणून रात्रीचा दिवस करावासा वाटला तरी ते तिथपर्यंतच मर्यादित ठेवावे हेच खरे. गायत्री मंत्र आपण सूर्यदेवतेला तेज देण्यासाठी आवाहन करून म्हणतो. अनंत सूर्याचे तेज असलेली गायत्री माता खरोखर प्रसन्न झाली तर ते तेज आपल्याला पेलवेल का? तेंव्हा आपण सामान्य आहोत आणि देवाकडे हेच मागणे मागू की “देवा सर्वेSपि सुखी: सन्तु” बाकी तुमचे जे कार्य आहे ते असेच निर्बाधित चालू राहून सृष्टीचे चक्र व्यवस्थित चालू दे ! आणि सूर्यदेवतेला नमस्कार करून सांगू की, बाबा सूर्यदेवा तु जगाचा प्राणदाता आहेस. असा भलतासलता निर्णय नको रे बाबा घेऊ !

Click Here for the Full List of Essays on Marathi.TV

Surya Mavala Nahi Tar in Marathi Language Essays

1 thought on “Surya Mavala Nahi Tar Essay in Marathi || सूर्य मावळला नाही तर Nibandh”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *