Dahlia Marathi Mahiti

Dahlia Flower Information in Marathi, डेलिया फुलाची माहिती

Dahlia Flower Information in Marathi

Dahlia Flowers – डेलिया फुला विषयी माहिती

  • डेलिया किंवा डेहलिया हे सूर्यफुलाच्या कुळातील एक सुंदर फुल आहे. ‘डाह’ नावाच्या एका वृक्ष तज्ञाच्या स्मृतीप्रित्यर्थ ह्या फुलांचे नाव डेहलिया असे ठेवण्यात आले होते.
  • या फुलाच्या अप्रतिम सौंदर्यामुळे उद्यानाची शोभा वाढवण्यासाठी ह्या फुलांची रोपे लावली जातात. मोठ्या आकाराचे, वेगवेगळ्या रंगाचे व वेगवेगळ्या रूपाचे हे फुल अनेक रंगात आढळून येते. या फुलाच्या जवळपास ५०,००० हून अधिक प्रजाती अस्तित्वात आहेत.
  • समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशातील वातावरण ह्या फुलांसाठी खूपच पोषक ठरत असल्याकारणाने ही फुले मुख्यतः मेक्सिको किंवा मध्य अमेरिकेत जास्त प्रमाणात घेतली जातात.
  • १५२५ साली ह्या फुलांची मेक्सिकोमध्ये नोंद केली गेली. मेक्सिकोमधील स्थानिक लोक त्याकाळी ह्या रोपांचा अन्न म्हणून वापर करत असत. ह्यासाठी डेलियाच्या फुलांची लागवड देखील केली जायची. डेलिया हे मेक्सिकोचे राष्ट्रीय फुल आहे.
  • १७८९ मध्ये मेक्सिको शहरातील बागेतून वनस्पतींचे काही भाग माद्रिदच्या रॉयल गार्डनमध्ये पाठवण्यात आले व त्यानंतर १-२ वर्षातच तेथे डेलियाची रोपे तयार करण्यात आली. त्यानंतर इटली, जर्मनी, इंग्लंड अशा विविध देशात ह्या फुलांचे साम्राज्य पसरले. भारतात देखील ह्या रोपांची लागवड बारा महिने घेता येते व भारतात मुख्यतः डेलिया पिन्नाटा जातीच्या प्रकारांची लागवड केली जाते.
  • डेलियाची फुले गोलाकार असतात व त्यांना अनेक पाकळ्या असतात. ह्या रोपांना उन्हात ठेवल्यास चांगली मोठी फुले येतात व सावलीत असलेल्या रोपांना छोटी फुले येतात, पण छोटी असो वा मोठी ही फुले असतात मात्र आकर्षक.
  • डेलियाची फुले लाल, पांढऱ्या, पिवळ्या, जांभळ्या अशा अनेक रंगामध्ये आढळतात. काही फुलांमध्ये तर दोन किंवा अनेक रंगांची आकर्षक रंगसंगती आढळून येते. ही आकर्षक असली तरी गंधहीन असतात.
  • डेलियाच्या प्रजातीचे वॉटरलिली, एनिमोन, कार्लेट, फिमब्रीएट, डेकोरेटिव्ह, बॉल, पामपॉन, कॅक्टस व सेमी कॅक्टस सारख्या अनेक वर्गांमध्ये वर्गीकरण करता येते. यामधील डेकोरेटिव्ह ह्या प्रजातीची फुले बहुसंख्य प्रमाणात आढळतात कारण या फुलांना अनेक पाकळ्या दाटीवाटीने रचलेल्या असतात व त्यामुळे ही फुले खूपच सुंदर दिसतात.
  • डेलिया ही वनस्पती कंद असेलेली व झुडूप ह्या प्रकारातील आहे. काही रोपे एक वर्षच जगतात आणि फुले आल्यानंतर सुकून जातात तर काही प्रजाती मात्र बरीच वर्षे जगतात. ही रोपे सामान्यतः एक ते पाच फुटापर्यंत वाढू शकतात. पाने संयुक्त व समोरासमोर असतात.
  • या फुलांचा आकार सुमारे ५ ते १५ सेमी पर्यंत असतो, परंतु २५ ते ३० सेमी व्यास असलेली काही मोठ्या फुलांची कलमे देखील तयार करण्यात यश आलेले आहे. याची फळे कोरडी व थोडीशी आयताकृती किंवा अंडाकृती असतात आणि एका बाजूला सपाट असून टोकाला गोलाकार असतात. डेलियाच्या फळांमध्ये एकच बी असते. या बियांपासून, वाळविलेल्या कंदापासून किंवा कलम करून डेलियाची लागवड केली जाते.
  • वेगवेगळ्या रंगांच्या डेलियाच्या फुलांची रोपे एका रांगेत लावून बागेची शोभा वाढवता येते. त्याचप्रमाणे घर व ऑफिसमध्ये सजावटीसाठी देखील या फुलांचा वापर होतो. आजही मेक्सिकोमधील ओक्सेकन पाककृतींमध्ये याच्या मोठ्या गोड कंदांचा वापर केला जातो. तसेच मध्य अमेरिकेमध्ये डेलियाच्या भाजलेल्या कंदांचा अर्कापासून विशिष्ट पेय बनवले जाते. शिवाय मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेची चाचणी करण्यासाठी डेलियाच्या कंदातून काढलेल्या इन्युलीन या नैसर्गिक शर्करेचा वापर केला जातो.

Dahlia Flowers Wikipedia Language

1 thought on “Dahlia Flower Information in Marathi, डेलिया फुलाची माहिती”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *